The unanointed emperor of voice is famous radio announcer Amin Sayani, who passed away
आवाजाचे अनभिषिक्त सम्राट प्रसिद्ध रेडियो उद्घोषक अमीन सयानी कालवश
मुंबई : बहनों और भाईयों अशी साद रेडियोच्या श्रोत्यांना घालणारे प्रसिद्ध रेडियो निवेदक अमीन सयानी यांचं आज मुंबईत हृदयविकारानं निधन झालं. ते 91 वर्षांचे होते. आकाशवाणी आणि रेडियो सिलोनच्या माध्यमातून त्यांचा आवाज भारतीय उपखंडाच्या घराघरात पोहोचला होता. मृदू, प्रभावी आवाज आणि लयबद्ध निवेदनाने त्यांनी रेडियो निवेदनाच्या क्षेत्रात मानदंड निर्माण केला.
20 फेब्रुवारी 2024 रोजी सायानी यांना हृदय विकाराचा झटका आल्याने त्यांना मुंबई येथील एका रुग्णालयात दाखल करण्यात आले, परंतु तेथेच त्यांची प्राणज्योत मावळली.
21 डिसेंबर 1932 रोजी मुंबईत जन्मलेले अमीन सयानी हे पिढ्यानपिढ्या घराघरात ओळखले जाणारे नाव होते, त्यांनी आपल्या मधुर आवाजाने आणि आकर्षक शैलीने प्रेक्षकांना मोहित केले. त्यांनी आपल्या कारकिर्दीची सुरुवात इंग्रजी-भाषेतील प्रसारक म्हणून केली आणि देश स्वतंत्र झाल्यानंतर त्यांनी हिंदी भाषेत निवेदन करण्यास सुरुवात केली.
बिनाका गीतमाला हा त्यांचा चित्रपटसंगीताचा कार्यक्रम आकाशवाणीच्या विज्ञापन प्रसारण सेवेच्या विविध भारती वाहिनीवर तब्बल चार दशकांहून अधिक काळ गाजला. 1951 मधे रेडीयो निवेदक म्हणून काम सुरु केल्यापासून सयानी यांनी 54 हजाराहून अधिक कार्यक्रमांना आणि19 हजाराहून जास्त जाहिरातींना आवाज दिला. आवाजातला जिव्हाळा आणि सादरीकरणातलं नाविन्य हे त्यांचं वैशिष्ट्य होतं.
साध्या सोप्या भाषेत संभाषण आणि उद्घोषणा करण्याच्या शैलीने त्यांच्या व्यावसायिक प्रसारणाच्या दीर्घ कारकीर्दीत त्यांना मदत झाली. यासाठी इ.स. 2007 मध्ये त्यांना नवी दिल्लीच्या प्रतिष्ठित हिंदी भवनाने “हिंदी रत्न पुरस्कार” देऊन सन्मानित केले.
एस कुमार का फिल्मी मुकदमा, सॅरिडॉन के साथी शालिमार सुपरलॅक जोडी, चमकते सितारें महकती बातें, संगीत के सितारों की महफिल, असे अनेक पुरस्कृत कार्यक्रम त्यांनी सादर केले. एड्सबाधितांची कहाणी सांगणारी स्वनाश ही नभोनाट्य मालिकाही त्यांनी सादर केली होती.
याशिवाय अनेक महत्त्वाच्या कार्यक्रमांच्या सूत्रसंचालनाची जबाबदारी त्यांनी पार पाडली होती. भारतीय रेडियो कार्यक्रम परदेशात पाठवणारे ते पहिले निर्यातदार होते. बीबीसी, रेडियो एशिया यासह अनेक परदेशी रेडियो कंपन्याबरोबरही त्यांनी काम केलं. केंद्रसरकारने 2009 मधे त्यांना पद्मश्रीने सन्मानित केलं होतं. याखेरीज अनेक पुरस्कार त्यांना मिळाले होते.
अमीन सयानी यांच्या निधनाबद्दल आकाशवाणीने शोक व्यक्त केला आहे. त्यांना श्रद्धांजली वाहताना ऑल इंडिया रेडिओने म्हटले आहे की, “सर्वात तेजस्वी सादरकर्त्यांपैकी एक, अमीन सयानी यांचे निधन झाले आहे. ते बिनाका गीतमाला या रेडिओ शोचे प्रतिष्ठित सादरकर्ते होते. त्यांच्या आत्म्याला शांती लाभो
प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी अमीन सयानी यांच्या निधनाबद्दल दुःख व्यक्त केलं आहे. अमीन सयानी जी यांनी भारताच्या प्रसारण क्षेत्रात क्रांती घडवून आणण्यात महत्त्वाची भूमिका बजावली आहे आणि त्यांच्या कार्याद्वारे त्यांनी श्रोत्यांशी एक अतिशय खास स्नेहबंध जोपासला आहे, असे मोदी यांनी म्हटले आहे.
“अमीन सयानी जी यांच्या रेडिओवरील सोनेरी आवाजात एक जादू होती आणि आत्मीयता होती यामुळे त्यांची लोकप्रियता पिढ्यानपिढ्या होती. त्यांच्या कार्याच्या माध्यमातून त्यांनी भारतीय प्रसारण क्षेत्रात क्रांती घडवून आणण्यात महत्त्वाची भूमिका बजावली आणि त्यांच्या श्रोत्यांशी त्यांनी एक अतिशय खास स्नेहबंध जोपासला.
त्यांच्या निधनाने दु:ख झाले. त्यांचे कुटुंबीय,चाहते आणि सर्व रेडिओ प्रेमींच्या दुःखात सहभागी आहे.त्यांच्या आत्म्याला सद्गती लाभो.”
प्रधानमंत्री नरेंद्र मोदी
माहिती आणि प्रसारण मंत्री अनुरागसिंह ठाकूर यांनी ही अमीन सयानी यांना आदरांजली वाहिली आहे.
अमीन सयानी यांना राज्यपालांची श्रद्धांजली
राज्यपाल रमेश बैस यांनी प्रसिद्ध रेडिओ उद्घोषक अमीन सयानी यांच्या निधनाबद्दल दुःख व्यक्त केले आहे.
आकाशवाणी व रेडिओ सिलोनवरील आपल्या प्रदीर्घ वाटचालीत अमीन सयानी यांनी हजारो सांगीतिक कार्यक्रम व जिंगल्स द्वारे जगभरातील रसिकांची मने जिंकली. ‘बहनो और भाईयो’ ही त्यांची उद्घोषणा देखील अतिशय लोकप्रिय ठरली.
त्यांच्या अनोख्या शैलीमुळे रेडिओ सिलोनवरील गीतमाला व इतर कार्यक्रम लोकप्रियतेच्या शिखरावर पोहोचले. त्यांच्या निधनामुळे स्वातंत्र्योत्तर काळातील एक शैलीदार रेडिओ उद्घोषक व आवाजाचा जादूगार गमावला आहे, असे राज्यपाल बैस यांनी आपल्या शोक संदेशात म्हटले आहे.
जादुई आवाजाचा विनम्र निवेदक ; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची ज्येष्ठ निवेदक अमीन सयानी यांना श्रद्धांजली
ज्येष्ठ रेडिओ निवेदक अमीन सयानी यांच्या निधनाबद्दल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दु:ख व्यक्त करून, त्यांना विनम्र श्रद्धांजली अर्पण केली आहे.
शोकसंदेशात मुख्यमंत्री म्हणतात, अमीन सयानी यांच्या रसाळ शैलीतल्या निवेदनांमुळे श्रोते मंत्रमुग्ध होऊन जात. त्यांच्या जादुई आवाजाची भुरळ मागील काही पिढ्यांपासून अगदी आत्ताच्या पिढीपर्यंत देखील टिकून आहे. अमीन सयानी हे त्यांच्या आवाजाने करोडो कुटुंबातले सदस्यच झाले होते. त्यांच्या जाण्याने रेडिओच्या चाहत्यांत विनम्र असा आपला माणूस हरपल्याची भावना आहे, असे नमूद करून मुख्यमंत्र्यांनी अमीन सयानी यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली आहे.
श्रोत्यांच्या मनावर अधिराज्य गाजविणारा कलावंत हरपला – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची अमीन सयानी यांना श्रद्धांजली
ज्येष्ठ रेडीओ निवेदक अमीन सयानी यांच्या निधनाने आपल्या आवाजाने श्रोत्यांच्या मनावर अधिराज्यकरणारा कलावंत हरपला, अशा शब्दांत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी श्रद्धांजली वाहिली आहे.
उपमुख्यमंत्रीदेवेंद्र फडणवीस आपल्या शोकसंदेशात म्हणतात, आमची पिढी ही रेडीओवरील अमीन सयानी यांचा आवाज ऐकतच मोठी झाली. त्यांच्या बिनाका गीतमाला या कार्यक्रमाने अनेक विक्रम रचले. या गीतमालेतील गाण्यांबरोबरच अमीन सयानी यांचा आवाज ऐकण्यासाठी रसिक आतुरतेने या कार्यक्रमाची वाट पहात असत. त्यांनी अनेकांना आपल्या आवाजाचा वापर कसा करावा याचेही मार्गदर्शन केले. त्यांच्या आवाजामुळे, त्यांच्या निवेदनाच्या शैलीमुळे अनेकांनी आपल्या निवेदनात बदल केले. त्यांच्या निवेदनाची शैली असलेली निवेदकांची एक पिढी तयार झाली. भाषेवर प्रेम करायला त्यांनी शिकविले. त्यांच्या निधनाने एक थोर निवेदक गमावला आहे. त्यांच्या कुटुंबीयांच्या दुःखात आम्ही सहभागी आहोत. हे दुःख सहन करण्याची ताकद कुटुंबियांना मिळो, ही ईश्वरचरणी प्रार्थना!
ज्येष्ठ निवेदक अमिन सयानी यांच्या निधनाने रेडिओच्या इतिहासातील सुवर्णअध्याय संपला – उपमुख्यमंत्री अजित पवार यांची श्रद्धांजली
“रेडिओच्या आवाजाचा अनभिषिक्त सम्राट, ज्येष्ठ निवेदक अमिन सयानी यांच्या निधनाने भारतीय रेडिओच्या सांगीतिक इतिहासातील सोनेरी अध्याय संपला आहे. रेडिओ हेच माहिती व मनोरंजनाचे एकमेव साधन होते त्या काळात अमिन सयानी यांनी १९५२ ते १९९४ अशी तब्बल बेचाळीस वर्षे रेडिओवर गीतमाला सादर केली. त्यांच्या शैलीदार, रसाळ निवेदनाने रेडिओवरील गीतांची गोडी कैकपटीने वाढवली. संगीत रसिकांच्या कितीतरी पिढ्यांचे कान त्यांच्या निवेदनानं तृप्त केले. त्यांनी रेडिओवर घेतलेल्या गायक, गीतकार संगीतकारांच्या मुलाखती हा भारताच्या सांगीतिक वाटचालीचा अमूल्य ठेवा आहे. त्यांच्यासारखा निवेदक भारतीय रेडिओवर असणं आणि त्याचा आवाज ऐकायला मिळणं, हा अवर्णनीय आनंद होता. त्यांचं निधन ही भारतीय कला, सांस्कृतिक क्षेत्राची कधीही भरुन न निघणारी हानी आहे. मी अमिन सयानी साहेबांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो.” अशा शब्दांत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी ज्येष्ठ निवेदक अमिन सयानी यांच्या निधनाबद्दल दु:ख व्यक्त करुन आपल्या शोकभावना व्यक्त केल्या.
अमीन सयानींचा आवाज कित्येक पिढ्यांना आठवणीत राहील – सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी व्यक्त केली संवेदना
अनेक पिढ्यांवर आपल्या सुरेल आवाजाची मोहिनी घालणाऱ्या आणि कोट्यवधी रसिकांना खिळवून ठेवणारे ज्येष्ठ आकाशवाणी निवेदक आणि आवाजाचे जादूगार अमीन सयानी यांचे निधन प्रत्येक रसिकांसाठी दुःखदायक आहे. त्यांचा आवाज कित्येक वर्ष रसिकांच्या कानात गुंजत राहील आणि ही मोहिनी कायम राहील.” अशा शब्दात सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी ज्येष्ठ निवेदक अमीन सयानी यांच्या निधनाबद्दल दुःख व्यक्त केले आहे.
आपल्या शोकसंदेशात मंत्री श्री. मुनगंटीवार म्हणतात की, रेडिओ विश्वातील आवाजाचे जादूगार सुप्रसिद्ध रेडिओ प्रस्तुतकर्ता आणि उद्घोषक अमीन सयानी यांच्या निधनाचे वृत्त दुःखद आहे. भारतात आकाशवाणीला लोकप्रिय बनविण्यात त्यांचा महत्वाचा वाटा होता. ‛बिनाका गीतमाला’ च्या माध्यमातून प्रत्येक घराघरात त्यांचा आवाज पोहोचला होता. अलीकडेच त्यांची मुंबईतील राहत्या घरी भेट घेऊन एका दिग्गज कलाकाराचा सन्मान करण्याचे भाग्य प्राप्त झाले. रेडिओ विश्वातील बहुमूल्य योगदानाबद्दल त्यांना पद्मविभूषण, लिविंग लिजेंड अवार्ड, पर्सन ऑफ द इयर, अशा विविध पुरस्कारांनी गौरविण्यात आले आहे. त्यांच्या जाण्याने आवाजाच्या कलाविश्वात एक मोठी पोकळी निर्माण झाली आहे. ईश्वर त्यांना सद्गती देवो. त्यांच्या कुटुंबियांच्या दुःखात मी सहभागी आहे.”
Hadapsar News Bureau
हडपसर न्यूज ब्युरो
hadapsarinfomedia@gmail.com
हे ही अवश्य वाचा