Former Chief Minister and former Lok Sabha Speaker Manohar Joshi passed away
माजी मुख्यमंत्री आणि लोकसभेचे माजी सभापती मनोहर जोशी यांचं निधन
…म्हणून दिला होता मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा
राजकारणातला सुसंस्कृत चेहरा हरवला – गडकरी
मुंबई : शिवसेनेचे ज्येष्ठ नेते, माजी मुख्यमंत्री आणि लोकसभेचे माजी सभापती मनोहर जोशी यांच्या पार्थिवावर आज दुपारी मुंबईत दादर इथल्या स्मशानभूमीत शासकीय इतमामात अंत्यसंस्कार केले जाणार आहेत. 21 फेब्रुवारी रोजी त्यांना अस्वस्थ वाटू लागल्याने हिंदुजा हॉस्पिलमध्ये ॲडमिट केले होते. त्यांना हृदयविकाराचा झटका आल्याचे निदान झाल्याने त्यांच्यावर अतिदक्षता विभागात उपचार सुरू होते. तिथेच त्यांनी आज पहाटे अखेरचा श्वास घेतला.
मनोहर जोशी यांना याआधी ब्रेन हॅमरेजचा त्रास झाला होता. त्यांच्या मेंदूत रक्तस्त्राव झाला होता, अशी माहिती रुग्णालय प्रशासनाकडून देण्यात आली होती. त्यावेळी जवळपास महिनाभर जोशी यांच्यावर रूग्णालयात उपचार करण्यात आले होते. त्यानंतर त्यांना रूग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला होता. काल त्यांना ह्रदयविकाराचा झटका आल्याने त्यांना रूग्णालयात दाखल करण्यात आलं. तेथेच त्यांची प्राणज्योत मालवली.
मनोहर जोशी यांचा जन्म २ डिसेंबर १९३७ला रायगड जिल्ह्यातल्या नांदवी या गावी झाला. महानगरपालिकेत दोन वेळा नगरसेवक, तीन वेळा विधानपरिषद सदस्य, मुंबईचे महापौर, दोन वेळा विधानसभा सदस्य, विधानसभेतील विरोधी पक्षनेते, मुख्यमंत्री, केंद्रीय अवजड आणि सार्वजनिक उद्योग मंत्री, लोकसभा सभापती, राज्यसभा खासदार अशा विविध राजकीय भूमिकेत ते दिसले.
१९६७ मध्ये त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला. आपलं संपूर्ण राजकीय आयुष्य त्यांनी शिवसेना पक्षासाठी वेचलं. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे निकटवर्तीय असलेल्या जोशी यांचा शिवसेना संघटित करण्यात मोठा वाटा होता. १९९५ मध्ये शिवसेना- भाजप युती राज्यात सत्तेवर आल्यानंतर ते राज्याचे पहिले बिगर-काँग्रेस मुख्यमंत्री झाले. वयाच्या ७२ व्या वर्षी त्यांनी शिवसेनेवर विश्लेषणात्मक अभ्यास करुन पीएच.डी. पूर्ण केली. त्यांना डॉ. डी. वाय. पाटील विद्यापीठाकडून सन्मानार्थ डी. लिट. ही मानद पदवी मिळाली.
मराठी तरुणांना स्वयंरोजगारासाठी कौशल्य विकास प्रशिक्षण मिळून ते स्वतःच्या पायावर उभे राहावेत यासाठी त्यांनी ‘कोहिनूर’ ही तांत्रिक आणि व्यावसायिक प्रशिक्षण देणारी संस्था सुरु केली. नंतर ही संस्था महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात पोहोचली. सर या नावाने परिचित असलेले जोशी यांच्याबद्दल प्रत्येकालाच आदर आणि जिव्हाळा वाटत असे.
बाळासाहेब ठाकरे यांनी शिवसेनेची स्थापना केल्यावर पहिल्या फळीतील शिवसैनिक म्हणून त्यांनी राजकीय कारकिर्दीला सुरुवात केली. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे निकटवर्तीय आणि विश्वासू म्हणून मनोहर जोशी यांची पक्षात ओळख होती. महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात त्यांना ‘जोशी सर’ म्हटलं जाई.मराठी आणि महाराष्ट्राच्या अस्मितेच्या मुद्द्यावर आक्रमक होताना, त्यांनी भाषेच स्तर आणि संयमीपणा कधीच सोडला नाही, असं त्यांच्याबद्दल त्यांचे समकालीन सांगतात.
…म्हणून दिला होता मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा
पुण्यात कर्वे रोडसारख्या प्राईम एरिआत त्यांचे जावई गिरीश व्यास यांना इमारत बांधायची होती. पण भूखंड शाळेसाठी आरक्षित होता. जेव्हा या इमारतीसंबंधीची फाईल जोशींसमोर आली तेव्हा मुख्यमंत्री मनोहर जोशी यांचे जावई गिरीश व्यास यांच्यासाठी पुण्यातील शाळेसाठी आरक्षण असलेल्या भूखंडाचं आरक्षण बदलल्याचा ठपका त्यांच्यावर ठेवण्यात आला होता. हा कथित आरोप त्यांच्यावरझाला. त्यानंतर शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी जोशी यांना चिठ्ठी पाठवत राजीनामा देण्यास सांगितले. तेव्हा तात्काळ आदेश मानत जोशी यांनी मुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिला. ही नाट्यमय घटना त्यानंतर अनेक महिने चर्चेचा विषय ठरली होती.
महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी यांच्या निधनाबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडून शोक व्यक्त
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी यांच्या निधनाबद्दल दुःख व्यक्त केले आहे. मनोहर जोशी यांनी 2002 ते 2004 या काळात लोकसभेचे अध्यक्ष म्हणून ही कार्य केले होते. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून जोशी यांनी राज्याच्या प्रगतीकरता अथक प्रयत्न केले, असे पंतप्रधानांनी म्हटले आहे. तर लोकसभेचे अध्यक्ष म्हणून जोशी यांनी संसदेचे कामकाज अधिक गतिमान करण्यासह त्यात सर्वांचा सहभाग असावा यासाठी प्रयत्न केले, असे ही पंतप्रधानांनी म्हटले आहे.
“मनोहर जोशी जी यांच्या निधनाने व्यथित झालो आहे. ते एक जुनेजाणते नेते होते ज्यांनी आपल्या आयुष्यातील अनेक वर्षे सार्वजनिक सेवेसाठी व्यतीत केली आणि महानगरपालिका, राज्य आणि राष्ट्रीय स्तरावर विविध पदांवर जबाबदाऱ्या सांभाळल्या. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून जोशी यांनी राज्याच्या प्रगतीकरता अथक प्रयत्न केले. तर केंद्रीय मंत्री म्हणून देखील त्यांचे योगदान उल्लेखनीय आहे. लोकसभा अध्यक्षपदाच्या काळात जोशी यांनी संसदेचे कामकाज अधिक गतिमान आणि सर्वसमावेशक करण्यासाठी प्रयत्न केले. चारही विधानमंडळांमध्ये काम करण्याचा बहुमान लाभलेले मनोहर जोशी त्यांच्या व्यासंगाबद्दल स्मरणात राहतील. त्यांच्या कुटुंबियांच्या आणि समर्थकांच्या दुःखात आपण सहभागी आहोत. ओम शांती.”
पंतप्रधान नरेंद्र मोदी
राजकारणातला सुसंस्कृत चेहरा हरवला – नितीन गडकरी
मनोहर जोशींच्या निधनाची वार्ता कळल्यानंतर केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी सोशल मीडियावरून आदरांजली अर्पण केलीय.
गडकरींनी त्यांच्या पोस्टमध्ये लिहिलंय की, “महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि लोकसभेचे माजी अध्यक्ष ज्येष्ठ नेते मनोहर जोशी सरांच्या निधनाचे वृत्त ऐकून अतिशय दुःख झाले. सरांच्या निधनाने महाराष्ट्राच्या राजकारणाचा सुसंस्कृत चेहरा हरवला. अतिशय नम्र, हजरजबाबी आणि महाराष्ट्र तसेच मराठी माणूस यांच्याविषयी मनापासून तळमळ असलेला नेता आपण गमावला आहे.”
गडकरी पुढे म्हणाले, “युती सरकारच्या काळात जोशी सरांच्या नेतृत्वाखाली मला काम करण्याची संधी मिळाली. कुटुंब प्रमुखाप्रमाणेच कायम त्यांचे मार्गदर्शन लाभले. ईश्वर दिवंगत आत्म्यास शांती देवो आणि त्यांच्या कुटुंबीयांना या दु:खातून सावरण्याची शक्ती देवो.”
राज्यपाल रमेश बैस यांची माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी यांना श्रद्धांजली
महाराष्ट्राचे राज्यपाल रमेश बैस यांनी राज्याचे माजी मुख्यमंत्री तसेच लोकसभेचे माजी अध्यक्ष मनोहर जोशी यांच्या निधनाबद्दल तीव्र दुःख व्यक्त केले आहे. प्रिन्सिपल मनोहर जोशी हे महाराष्ट्र राज्याच्या राजकारणातील एक धुरंधर व्यक्तिमत्व होते.
कुशल संघटक, उत्कृष्ट संसदपटू, अभ्यासू विरोधी पक्षनेते, उत्कृष्ट लोकसभा अध्यक्ष असा सार्थ लौकिक असलेल्या मनोहर जोशी यांनी प्रत्येक पदावर काम करताना आपला वेगळा असा ठसा उमटवला. कौशल्य शिक्षणाचे महत्त्व फार पूर्वीच ओळखून त्यांनी कोहिनूर संस्थेच्या माध्यमातून हजारो तरुण तरुणींना तंत्र व कौशल्य शिक्षण देण्याची व्यवस्था केली. उत्कृष्ट वक्ते, मितभाषी, शिस्तप्रिय व राजकारणातील अजातशत्रू असे त्यांचे व्यक्तिमत्व होते. त्यांच्या निधनामुळे महाराष्ट्राच्या राजकारणातील एका तत्त्वनिष्ठ नेत्याला आपण गमावले आहे. जोशी हे लोकसभा अध्यक्ष असताना आपला त्यांच्याशी घनिष्ठ परिचय झाला व तो कायम राहिला. त्यांच्या स्मृतींना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो, असे राल्यपाल श्री.बैस यांनी आपल्या शोकसंदेशात म्हटले आहे.
राजकारण, समाजकारणातील सर्वांचे ‘सर’, सुसंस्कृत, व्यासंगी नेतृत्वाला महाराष्ट्र मुकला . मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
शिक्षणातील ‘सर’ ते लोकसभा अध्यक्ष म्हणून ‘स्पीकर सर’ अशी भारदस्त कारकीर्द असणाऱ्या महाराष्ट्र सुपुत्राला काळाने आपल्यातून हिरावून घेतले आहे, अशी शोकमग्न भावना व्यक्त करत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ज्येष्ठ नेते माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली आहे. आपल्यासाठी वैयक्तिक पातळीवर ही मोठी हानी आहे, असे नमूद करुन मुख्यमंत्र्यांनी महाराष्ट्र विकासाची चौफेर दृष्टी असलेल्या एका सुसंस्कृत, व्यासंगी नेत्याला मुकला असल्याचेही म्हटले आहे.
मुख्यमंत्री शोक संदेशात म्हणतात, ‘नगरसेवक, महापौर ते राज्याचे मुख्यमंत्री, केंद्रीय मंत्री आणि लोकसभा अध्यक्ष असा त्यांचा प्रवास राजकारण- समाजकारणात येऊ पाहणाऱ्या पिढ्यांकरिता दीपस्तंभासारखा मार्गदर्शक राहणार आहे. हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांचे ते सच्चे पाईक होते. ते शिक्षक, उद्योजक, सामाजिक कार्यकर्ते, कला-साहित्य आणि सांस्कृतिक क्षेत्रातील व्यासंगी होते. राजकीय तसेच संसदीय लोकशाही प्रणालीवर गाढा विश्वास असणारे बहुआयामी व्यक्तिमत्त्वाचे होते. आमचे सर्वांचे लाडके आणि मार्गदर्शक सर आपल्यात नाहीत ही कल्पना देखील करवत नाही. सरांच्या निधनामुळे जोशी परिवारावर, त्यांचे स्नेही, कार्यकर्ते यांच्यावर आघात झाला आहे. तो सहन करण्याची ईश्वराने या सर्वांना ताकद द्यावी, अशी प्रार्थना करून मुख्यमंत्र्यांनी ज्येष्ठ नेते, माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली आहे.
माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी यांचे योगदान महाराष्ट्र कायम स्मरणात ठेवेल – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची श्रद्धांजली
महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री, लोकसभेचे माजी अध्यक्ष मनोहर जोशी यांच्या निधनाचे वृत्त अतिशय दु:खद आहे. त्यांचे सामाजिक आणि राजकीय कार्य महाराष्ट्र कायम स्मरणात ठेवेल, अशा शब्दांत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी श्रद्धांजली वाहिली आहे. महाराष्ट्राच्या राजकीय-सामाजिक, शैक्षणिक क्षेत्रात त्यांचे योगदान कायमच स्मरणात राहिल. त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. त्यांच्या कुटुंबीयांच्या दु:खात मी सहभागी आहे.
मराठी माणसाच्या न्याय्य हक्कांसाठी लढणारा सुसंस्कृत नेता हरपला – उपमुख्यमंत्री अजित पवार .
शिवसेनेचे ज्येष्ठ नेते, माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी यांच्या निधनाने मराठी माणसांच्या न्याय्य हक्कांसाठी लढणारा सुसंस्कृत नेता काळाच्या पडद्याआड गेला आहे. त्यांच्या निधनाने महाराष्ट्राच्या राजकीय, सामाजिक, शिक्षण क्षेत्राची मोठी हानी झाली आहे, अशा शब्दात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी त्यांना श्रद्धांजली वाहिली आहे.
शिवेसेनेचे ज्येष्ठ नेते आणि खासदार संजय राऊत यांनीही मनोहर जोशींना आदरांजली वाहिली. ‘ शून्यातून विश्व निर्माण करणारे.. कडवट महाराष्ट्र अभिमानी, अखेरच्या श्वासा पर्यन्त शिवसैनिक म्हणून जगलेले, मनोहर जोशी यांना विनम्र अभिवादन!’ अशा शब्दांत त्यांनी श्रद्धांजली वाहिली.
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते संदीप देशपांडे यांनी मनोहर जोशी यांच्या निधनाबद्दल दु:ख व्य्कत करत त्यांना श्रद्धांजली वाहिली.
‘Hadapsar News Bureau
हडपसर न्यूज ब्युरो
hadapsarinfomedia@gmail.com
हे ही अवश्य वाचा
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ आणि एन.बी.आर.आय मध्ये संलग्नता करार
One Comment on “माजी मुख्यमंत्री आणि लोकसभेचे माजी सभापती मनोहर जोशी यांचं निधन”