Agriculture related activities in school curriculum should be implemented effectively
शालेय अभ्यासक्रमातील कृषी संबंधित उपक्रमांची प्रभावी अंमलबजावणी करावी – शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर
मुंबई : कृषी घटकाचे महत्त्व लक्षात घेता शालेय अभ्यासक्रमामध्ये कार्यानुभव विषयांतर्गत कृषी घटकांचा समावेश करण्यात आलेला आहे. या विषयातील उपक्रमांची प्रभावी अंमलबजावणी करण्याचे निर्देश शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी सर्व क्षेत्रीय अधिकारी व शाळांना दिले आहेत.
भारत हा कृषीप्रधान देश असून शेती हा भारतीय अर्थव्यवस्थेचा कणा आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना शालेय शिक्षणात कृषी विषयाचे ज्ञान मिळाल्यास त्यांच्या मनावर शेती विषयाचे महत्त्व ठसवले जाऊन शेती विषयाची जाण असणारी उद्याची उज्वल व जागृत पिढी निर्माण होईल व ग्रामीण समाजाशी त्यांची नाळ जोडली जाईल. पर्यायाने यातूनच राष्ट्रप्रेम निर्माण होऊन शेती व शेतीवर आधारित व्यवसाय व उद्योगधंदे अधिक कुशलतेने केले जातील. रोजगाराच्या संधी उपलब्ध होतील व जीवनमान उंचावण्यास मदत होईल या उद्देशाने शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी कृषी विषय हा पाठ्यक्रमात लक्षणीय स्वरुपात समावेश करण्याचा निर्णय घेतला.
शालेय स्तरावर कृषी असा स्वतंत्र विषय नसला तरी कार्यानुभव विषयांतर्गत कृषी घटकांचे ज्ञान पूर्वीपासूनच शालेय अभ्यासक्रमामध्ये समाविष्ट आहे. परसातील बागकाम, कुडीतील लागवड, फळ प्रक्रिया, पशुपालन, मत्स्य व्यवसाय, सुलभ शेती, खाद्यपदार्थ निर्मिती इत्यादी क्षेत्रांतर्गत इयत्तानिहाय उपक्रम राबविले जात आहेत. तसेच समाजोपयोगी उत्पादक कार्य, वृक्षारोपण व निगा, काही शाळांमध्ये शेती व फळबागा इत्यादी उपक्रम सुरू आहेत.
सर्व प्राथमिक, उच्च प्राथमिक (इयत्ता पहिली ते आठवी) शाळांमध्ये कार्यानुभव विषयाचे अध्ययन अध्यापन केले जात असून कार्यानुभव विषयांतर्गत विद्यार्थ्यांच्या आवडीनुसार उपक्रम राबवले जात आहेत.
इयत्ता नववी ते बारावीसाठी नॅशनल स्कील्स क्वालिफिकेशन फ्रेमवर्क (एनएसक्यूएफ) अंतर्गत विद्यार्थ्यांच्या आवडीनुसार कृषी विषय असलेल्या शाळांमध्ये तसेच व्यावसायिक अभ्यासक्रम असलेल्या शाळांमध्ये कृषी संदर्भातील आशयाचे अध्ययन अध्यापन केले जात असून अनुषंगिक उपक्रम राबविले जात आहेत.
इयत्ता 11वी व 12वी स्तरावर विद्यार्थ्यांना विज्ञान शाखेमध्ये कृषीच्या अनुषंगाने कृषीविज्ञान व तंत्रज्ञान, पशुविज्ञान व दुग्धव्यवसाय, पीक शास्त्र, मत्स्यपालन तंत्रज्ञान, गोड्या पाण्यातील मत्स्यव्यवसाय, उद्यानविद्या शास्त्र आदी स्वतंत्र वैकल्पिक विषय निवडण्याची संधी उपलब्ध असल्याची माहिती राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेचे संचालक राहूल रेखावार यांनी दिली आहे.
Hadapsar News Bureau
हडपसर न्यूज ब्युरो
hadapsarinfomedia@gmail.com
हे ही अवश्य वाचा
विद्यापीठाच्या माजी विद्यार्थीनीला ‘उत्कृष्ट नाविन्य पूर्ण शैक्षणिक कामगिरी पुरस्कार’
One Comment on “शालेय अभ्यासक्रमातील कृषी संबंधित उपक्रमांची प्रभावी अंमलबजावणी करावी”