101 Handover of Antiquities to Archaeological Survey of India
101 पुरातन वस्तू भारतीय पुरातत्व सर्वेक्षण विभागाकडे सुपूर्द.
सीमाशुल्क विभागाने जप्त केलेल्या 101 पुरातन वस्तूंच्या भारतीय पुरातत्व सर्वेक्षण विभागाकडे हस्तांतरण समारंभाचे केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून भूषवले अध्यक्षपद
चोरीला गेलेल्या दुर्मीळ कलाकृती आणि पुरातन वस्तू विविध देशातून पुन्हा भारतात आणल्या जातील यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी पाठपुरावा करत आहेत- केंद्रीय अर्थमंत्री
बंगळूरु, भोपाळ, भुवनेश्वर, दिल्ली, गुवाहाटी, मुंबई आणि पुणे या सात ठिकाणी एकाच वेळी हस्तांतरण समारंभाचे आयोजन
मुंबई सीमाशुल्क विभाग 3 ने एएसआय मुंबई परिमंडळाकडे सोपवले मध्ययुगीन काळातील पाच खंजीर आणि एक दुर्मीळ दमास्कस पोलादाचा घडीचा चाकू
मुंबई/नवी दिल्ली : सीमाशुल्क विभागाने जप्त केलेल्या पुरातन वस्तू भारतीय पुरातत्व सर्वेक्षण विभागाकडे हस्तांतरित करण्याच्या समारंभाचे केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आज नवी दिल्लीतून दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून अध्यक्षपद भूषवले. केंद्रीय अप्रत्यक्ष कर मंडळ आणि सीमाशुल्क विभागाने(सीबीआयसी) या कार्यक्रमाचे आयोजन केले होते. बंगळूरु, भोपाळ, भुवनेश्वर, दिल्ली, गुवाहाटी, मुंबई आणि पुणे या सात ठिकाणी एकाच वेळी हस्तांतरण समारंभाचे आयोजन करण्यात आले
जप्त करण्यात आलेल्या एकूण 101 पुरातन वस्तूंचे प्रदर्शन आणि विशेष काळजी घेण्यासाठी त्यांचे हस्तांतरण भारतीय पुरातत्व सर्वेक्षण विभागाकडे विविध ठिकाणी कार्यरत असलेल्या सीमाशुल्क विभागाच्या पथकांकडून करण्यात आले. या 101 पुरातन वस्तूंपैकी काही वस्तू गोवा येथे राष्ट्रीय सीमाशुल्क आणि सीजीएसटी संग्रहालय धरोहर येथे प्रदर्शित करण्यात येणार आहेत.
जप्त केलेल्या या पुरातन वस्तूंचे सीमाशुल्क विभागाकडून एएसआयकडे हस्तांतरण होत असताना, केंद्रीय अर्थमंत्र्यांनी सांगितले की, चोरीला गेलेल्या दुर्मीळ कलाकृती आणि पुरातन वस्तू विविध देशातून पुन्हा भारतात आणल्या जातील यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी पाठपुरावा करत आहेत. यासाठी द्विपक्षीय वाटाघाटी केल्या जात असतात.
अलीकडच्या काळात अऩेक कलाकृती आणि पुरातन वस्तू परत आणण्यात आल्या आहेत आणि जप्त केलेल्या या 101 पुरातन वस्तूंद्वारे सीमाशुल्क विभाग भारताच्या समृद्ध इतिहासामध्ये योगदान देत आहे.
पुरातन वस्तूंच्या हस्तांतरण कार्यक्रमाचा भाग म्हणून मुंबई सीमाशुल्क झोन 3 ने मुख्य आयुक्त प्राची स्वरुप यांच्या उपस्थितीत एएसआय मुंबई परिमंडळाकडे मध्ययुगीन काळातील पाच खंजीर आणि एक ब्रिटिश कालीन दमास्कस पोलादाचा घडीचा चाकू सोपवला. एएसआय मुंबई परिमंडळाच्या अधीक्षक पुरातत्ववेत्ता शुभा मजुमदार यांनी या वस्तूंचे आतापर्यंत सांभाळकर्ते असलेले सीमाशुल्क अधीक्षक राधेश्याम नंदनवार यांच्याकडून समारंभपूर्वक या वस्तू स्वीकारल्या.
2003 आणि 2004 मध्ये अधिकाऱ्यांनी दाखवलेल्या दक्षतेमुळे हे पुरातन खंजीर आणि घडीचा चाकू जप्त करण्यात आले होते. भारतातून फ्रान्सला टपाली निर्यातीच्या माध्यमातून पुरातन वस्तूंची निर्यात करणाऱ्या काही टोळ्या सक्रीय असल्याची गुप्तचरांकडून माहिती मिळाली होती. अतिशय दक्षतेने केलेल्या कारवाईमुळे 2003 मध्ये हे पाच खंजीर परदेशात जाण्यापासून रोखणे शक्य झाले होते आणि ते जप्त करण्यात आले.
त्यानंतर 2004 मध्ये ब्रिटिश कालीन दमास्कस घडीचा चाकू जपानमधून आयात केला जात होता आणि यामध्येही याच टोळीचा हात होता. ही पुरातन वस्तू देखील अशाच प्रकारे अडवण्यात आली आणि जप्त करण्यात आली.
हे पाच खंजीर मध्ययुगीन कालखंडातील असून त्यावर मीनाकरी शैलीत पानांचे नक्षीकाम आहे. त्यांच्या मुठी फुलांच्या नक्षीने सजवलेल्या असून त्यांना प्राण्यांच्या डोक्याचे आकार आहेत आणि त्यावर माशांच्या खवल्यांची सजावट आहे. यापैकी एका खंजीराची मूठ काळ्या रंगाच्या मौल्यवान रत्नांनी बनवलेली आहे. त्यांच्यावर असलेल्या आच्छादक म्यानांवर कोफ्तगिरी शैलीची सजावट असून आतली बाजू चांदीने मढवलेली आहे.
ब्रिटिशकालीन चाकू घडीचा चाकू असून तो दमास्कस पोलादाने बनवलेला आहे. त्याला लाकडी मूठ आहे आणि त्याचे म्यान तपकीरी रंगाच्या चामड्यापासून बनवलेले आहे, अशी माहिती मुंबई सीमाशुल्क झोन 3 च्या मुख्य आयुक्तांनी दिली.
भारतीय सीमाशुल्क आणि भारतीय पुरातत्व सर्वेक्षण (एएसआय) अनेक दशकांपासून साहित्य, कलाकृती, मूर्ती, चित्रे, नाणी इत्यादी आपल्या पुरातन वस्तूंचे जतन आणि संवर्धन करण्यासाठी सहकार्य करत आहे. पुरातन वस्तू आणि कलाकृती खजिना कायदा, 1972 च्या तरतुदींनुसार पुरातन वस्तूंच्या अनधिकृत निर्यातीवर बंदी आहे.
Hadapsar News Bureau
हडपसर न्यूज ब्युरो
hadapsarinfomedia@gmail.com
One Comment on “101 पुरातन वस्तू भारतीय पुरातत्व सर्वेक्षण विभागाकडे सुपूर्द”