Rising graph of Chief Minister’s Medical Aid to Indigent and needy patients
मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता कक्षाचा रुग्ण सेवेचा चढता आलेख
दुर्धर आजाराने ग्रस्त रुग्णांना गेल्या १ वर्ष ८ महिन्यात एकूण २१३ कोटी अर्थसहाय्य वितरित
२५,००० पेक्षा अधिक गोरगरीब -गरजू रुग्णांना आर्थिक मदत
मुंबई : मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता कक्षाने रुग्णसेवेत उत्कृष्ट कामगिरी करुन राज्यातील हजारो रुग्णांच्या जीवनात निरायम आरोग्याचा प्रकाश आणला आहे. या योजनेमुळे अनेक रुग्णांना जीवनदान मिळत असल्याने ही योजना आता महाराष्ट्र राज्य सरकारची महत्वाकांक्षी योजना ठरत असल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले.
गोरगरीब – गरजू रुग्णांना दुर्धर आणि महागड्या शस्त्रक्रियांसाठी मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता कक्षातून थेट अर्थसहाय्य केले जात आहे. या योजनेमुळे रुग्णांचे प्राण वाचत असल्याने मुख्यमंत्री कार्यालयात आलेला एकही रुग्ण मदतीविना वंचित राहता कामा नये याची दक्षता घेण्याचे आदेश मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी दिले आहेत.
यानुसार आपल्या सातत्यपूर्ण कामगिरीचा आलेख कायम राखत या कक्षाने गेल्या एक वर्ष ८ महिन्यात २५,००० पेक्षा अधिक गोरगरीब -गरजू रुग्णांना एकूण २१३ कोटी ७० लाख रुपयांची आर्थिक मदत वितरित केली आहे.
मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी मुख्यमंत्री पदाचा कार्यभार स्वीकारताच मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता कक्ष तत्काळ सुरू केला. मंगेश चिवटे यांची विशेष कार्य अधिकारी म्हणून नियुक्ती करून मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी या कक्षाची जबाबदारी दिली. मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता मदत मिळवण्यासाठी मंत्रालयात जाण्याचीही गरज नाही. पूर्णपणे ऑनलाईन प्रक्रिया करून वैद्यकीय मदत मिळणार असल्याचे कक्ष प्रमुख मंगेश चिवटे यांनी सांगितले. यासाठी 8650567567 या टोल फ्री क्रमांकावर कॉल करून थेट आपल्या मोबाईलवर अर्ज मिळविता येईल.
मुख्यमंत्री श्री. शिंदे यांच्या सूचनेनुसार मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधीमध्ये विविध आजारांचा समावेश देखील करण्यात आला आहे. यामध्ये अँजिओप्लास्टी, बायपास सर्जरी, कर्करोगावरील शस्त्रक्रिया, केमोथेरपी, डायलिसिस, जन्मतः मूकबधिर लहान मुलांच्यासाठी अत्यावश्यक असणारी कॉकलीयर इनप्लांट शस्त्रक्रिया, सर्व प्रकारचे अवयव प्रत्यारोपण शस्त्रक्रिया, रस्ते अपघात, विद्युत अपघात, भाजलेले रुग्ण, जन्मतः लहान मुलांच्या हृदयशस्त्रक्रिया आदींचा समावेश आहे.
दुर्धर आजारांनी ग्रस्त रुग्णांनी मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधीचा जास्तीत जास्त लाभ घ्यावा असे आवाहन कक्ष प्रमुख श्री. चिवटे यांनी केले आहे.
Hadapsar News Bureau
हडपसर न्यूज ब्युरो
hadapsarinfomedia@gmail.com
हे ही अवश्य वाचा
One Comment on “मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता कक्षाचा रुग्ण सेवेचा चढता आलेख”