Indian Knowledge Tradition’s Potential to Change the World – Shri. Raghav Krishna
भारतीय ज्ञान परंपरेत जग बदलण्याची क्षमता- श्री. राघव कृष्ण
भारतीय संस्कृतीवर विद्यापीठात दोन दिवसीय राष्ट्रीय चर्चासत्र
प्रत्येक विद्यापीठात भारतीय संस्कृतीशी, ज्ञान परंपरेशी निगडीत एक विभाग असायला हवा
पुणे : आपल्याकडे सर्व चांगल्या गोष्टी असूनही सध्या आपले भविष्य घडवणारी पिढी भरकटल्याचे दिसते. ही परिस्थिती चिंताजनक असून या समस्येवर आपल्यालाच उपाय शोधावा लागेल आणि भारतीय ज्ञान परंपरेत ही परिस्थिती बदलण्याची, जग बदलण्याची क्षमता आहे, असे प्रतिपादन ‘बृहत्’चे संस्थापक श्री. राघव कृष्ण यांनी केले.
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात ‘भारतीय संस्कृतीची ओळख’ या विषयावर दोन दिवसीय राष्ट्रीय चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले होते. या चर्चासत्राच्या उद्धाटन प्रसंगी ते बोलत होते. याप्रसंगी कुलगुरू प्रा. (डॉ) सुरेश गोसावी, श्री वेंकटेश्वर वैदिक विद्यापीठ, तिरुपतीचे कुलगुरू डॉ. आर. सदाशिव मुर्ती, व्यवस्थापन परिषदेचे सदस्य आणि या चर्चासत्राचे आयोजक श्री. रविंद्र शिंगणापूरकर, प्रबोधन मंच, पुणेचे श्री. हरीभाऊ मिरासदार, संस्कृत आणि प्राकृत विभाग प्रमुख डॉ. देवनाथ त्रिपाठी उपस्थित होते.
कुटुंब, गुरू-शिष्य परंपरा आणि मंदिर भारतीय संस्कृतीतील या तीन महत्त्वाच्या संस्था आहेत. मात्र कुटुंबाकडून, समाजातून मिळणारी माहिती, ज्ञान सध्याच्या पिढीला फेसबुक, इन्सटाग्रावरून मिळत आहे. याचा परिणाम म्हणजे आपापसातला दूरावा वाढत चालला आहे. यामुळे भारतीय कुटुंब संस्थेला धोका निर्माण झाला असल्याचे श्री. राघव कृष्ण म्हणाले. तसेच ग्लोबल सिटीजन बनायच्या नादात आपण आपली संस्कृती विसरत चाललो अल्याचेही ते यावेळी म्हणाले. तर भारताची सांस्कृतिक ओळख ही पुराण, वेद, ग्रंथ, स्मृती आणि रामायण, महाभारत यांच्यामुळे होते. मात्र आपल्याला सुसंस्कृत बनविणाऱ्या या ग्रंथांचा आपल्याला विसर पडत चालला असल्याची चिंता डॉ. आर. सदाशिव मुर्ती यांनी यावेळी व्यक्त केली. तसेच प्रत्येक विद्यापीठात भारतीय संस्कृतीशी, ज्ञान परंपरेशी निगडीत एक विभाग असायला हवा , अशी इच्छा त्यांनी व्यक्त केली. यावेळी कुलगुरू प्रा.(डॉ.) सुरेश गोसावी यांनी भारतीय ज्ञान परंपरेविषयी माहिती देत पुरातण काळात भारतात झालेल्या गणिताविषयीच्या शोधाबद्दल उपस्थितांना सांगितले.
संस्कृत आणि प्राकृत (सी. ए. एस.एस.) विभाग आणि प्रबोधन मंच, पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने या चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले आहे. विद्यापीठाच्या ज्ञानेश्वर सभागृहात होत असलेल्या या चर्चासत्रात शभरातील विविध मान्यवर भारतीय तत्वज्ञान आणि आध्यात्मिक परंपरा, भारताची साहित्यिक आणि सांस्कृतिक ओळख, परंपरा, चालीरीती आणि भारतीय सांस्कृतिक एकात्मता, भारतीय संत परंपरा, भारतीय उत्सव परंपरा, प्राचीन भारतातील विज्ञान आणि तंत्रज्ञान, सामाजिक आध्यात्मिक चळवळ आणि भारत, संस्कृत साहित्य यांसारख्या विविध विषयावर आपले विचार मांडणार आहेत.
Hadapsar News Bureau
हडपसर न्यूज ब्युरो
hadapsarinfomedia@gmail.com
हे ही अवश्य वाचा
कोलकाता येथे 15,400 कोटी रुपयांच्या बहुविध ‘कनेक्टिव्हिटी’ प्रकल्पांचे लोकार्पण आणि पायाभरणी
One Comment on “भारतीय ज्ञान परंपरेत जग बदलण्याची क्षमता”