Hail and rain forecast in the state: Agriculture Department appeals to farmers
राज्यात गारपीट आणि पावसाचा अंदाज: शेतकऱ्यांना कृषी विभागाचे आवाहन
खानदेश, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भातील शेतकऱ्यांनी हवामानाच्या अंदाजाची दखल घेऊन शेतीचे नियोजन करण्याचे कृषी विभागाचे आवाहन
हवामानाचा अंदाज: २७-२८ डिसेंबरदरम्यान गारपीट आणि मेघगर्जनेसह पाऊस
महाराष्ट्रातील खानदेश, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भातील शेतकऱ्यांसाठी कृषी विभागाने हवामानाचा अंदाज लक्षात घेऊन शेतीच्या नियोजनाचे आवाहन केले आहे.
२७-२८ डिसेंबरदरम्यान मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात गारपीट आणि मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज वर्तविण्यात आला आहे.
२७ डिसेंबरला दुपारपासून मेघगर्जनेसह पावसाची सुरुवात सर्वात प्रथम नंदुरबार, धुळे, जळगाव, अहिल्यानगर जिल्ह्यांसह, दक्षिण मराठवाडा, पुणे आणि नाशिक जिल्ह्यांतील पूर्व भागांमध्ये होईल. शुक्रवार रात्रीपर्यंत वादळी पाऊस पश्चिम विदर्भ आणि शेजारच्या मराठवाड्यात हजेरी लावेल, ज्यात बुलढाणा, अकोला, वाशीम, अमरावती, छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी, हिंगोली आणि बीड जिल्ह्यांचा समावेश आहे. या भागांमध्ये काही प्रमाणात गारपिटीची शक्यता देखील वर्तविण्यात आली आहे. मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्याच्या उर्वरित जिल्ह्यांतील काही भागांमध्ये मेघगर्जनेसह पाऊस पडण्याची शक्यता देखील आहे.
२८ डिसेंबरच्या पहाटेपर्यंत वादळी पाऊस पूर्वेकडे सरकेल आणि विदर्भातील इतर जिल्ह्यांत हजेरी लावेल. यात यवतमाळ, वर्धा, नागपूर, भंडारा, गोंदिया, आणि चंद्रपूर जिल्ह्यांचा समावेश आहे. या भागांमध्ये काही प्रमाणात गारपीट होण्याची शक्यता आहे. पश्चिम विदर्भ आणि शेजारच्या मराठवाड्यातील काही भागांमध्ये पावसाची स्थिती या दिवशी देखील कायम राहण्याची शक्यता आहे. या दिवशी एकंदरीत विदर्भात आणि मराठवाड्यात आभाळी हवामान अपेक्षित असल्यामुळे कमाल तापमानात थोडी घट होईल. मात्र खानदेश आणि मध्य महाराष्ट्रात हवामान स्थिर होण्यास सुरुवात होईल.
शेतकऱ्यांसाठी महत्त्वाचे सूचना
- शेतीची काळजी घ्या: काढणी केलेल्या पिकांना गारपीट आणि पावसापासून सुरक्षित ठेवा. प्राण्यांना सुरक्षित जागी ठेवा.
- वादळी हवामानात हे टाळा: झाडाखाली, मोकळ्या जागेत, टिनाच्या शेडखाली किंवा विद्युत रोहित्राजवळ आसरा घेऊ नका. विजेच्या तारांपासून दूर राहा.
- नियोजन : हवामानाचा अंदाज लक्षात घेऊन पेरणी, पाणी व्यवस्थापन, आणि खत देण्याचे नियोजन करा.
Hadapsar News Bureau
हडपसर न्यूज ब्युरो
hadapsarinfomedia@gmail.com
हे ही अवश्य वाचा