अविरत कार्यरत सेवावृत्तीचा सन्मान सोहळ्याचे आयोजन.
जातीय विषमता नष्ट होवून सामाजिक समता निर्माण होणे गरजेचे-राज्यपाल भगत सिंह कोश्यारी.
समाजात जातीय विषमता नष्ट होवून सामाजिक समता निर्माण होणे गरजेचे असून युवा पिढीने मनात सामाजिक समतेच्या भावनेची जोपासना करीत समाजातील उपेक्षित घटकांना पुढे नेण्याचे काम करावे, असे मत राज्यपाल भगत शिंह कोश्यारी यांनी व्यक्त केले.
प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त समर्थ युवा प्रतिष्ठान आयोजित कोरोना संकटकाळात अविरत कार्यरत सेवावृत्तीचा सन्मान सोहळा राज्यपाल श्री. कोश्यारी यांच्या प्रमुख उपस्थितीत भांडारकर इन्स्टिट्यूट येथील नवलमल फिरोदिया सभागृहात पार पडला. यावेळी ते बोलत होते.
यावेळी खासदार गिरीष बापट, महापौर मुरलीधर मोहोळ, आमदार चंदकांत पाटील, जगदीश मुळीक, माधुरी मिसाळ, समर्थ युवा प्रतिष्ठानचे अध्यक्ष राजेश पांडे आदी उपस्थित होते.
राज्यपाल श्री. कोश्यारी म्हणाले, कोरोनाच्या काळात डॉक्टर, पोलीस, सामाजिक संस्था, उद्योजक, अशा विविध घटकांनी केलेली कामगिरी अतुलनीय आहे. अशा पद्धतीने चांगली कामगिरी सतत केल्यास देश प्रगतीपथावर जाण्यास मदत होते. निष्कलंक, निष्पाप, निःस्वार्थी नेतृत्वाच्या शब्दाला महत्व असते असे त्यांनी सांगितले.
खासदार श्री.बापट म्हणाले, सत्कार हा सतप्रवृत्तीचा होत असतो. कोरोनाच्या काळात सामान्य माणसाला मदत करुन अनेकांनी समाजापुढे आदर्श निर्माण केला आहे. सर्वजण मिळून समाजासाठी काम करावे, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.
राज्यपाल श्री.कोश्यारी यांच्या हस्ते सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलगुरु प्रा.डॉ.नितीन करमळकर, डी.वाय. पाटील विद्यापीठाचे कुलपती डॉ. पी.डी. पाटील, दलित इंडियन चेंबर ऑफ कॉमर्सचे अध्यक्ष पद्मश्री मिलिंद कांबळे, पुणे प्लॅटफॉर्म फॉर कोविड-१९ चे मुख्य समनव्यक सुधीर मेहता, पुणे श्रमिक पत्रकार संघाचे अध्यक्ष मंगेश कोळपकर, इस्कॉनचे संजय भोसले, पुणे मनपाचे आरोग्य व स्वच्छता विभागासाठी महापौर मुरलीधर मोहोळ, सहायक आरोग्य प्रमुख डॉ.संजीव वावरे व आरोग्य निरीक्षक कविता शिसोलकर यांचा एकत्रित तसेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघ जनकल्याण समितीचे प्रतिनिधी अश्विनीकुमार व महेश कर्पे यांचा सत्कार करण्यात आला.