बँक ऑफ महाराष्ट्र कडून अनेक नवीन उत्पादनांचे आरंभ व उत्तम कामगिरी करणाऱ्यांचा सत्कार.
सार्वजनिक क्षेत्रातील एक अग्रगण्य बँक असलेल्या बँक ऑफ महाराष्ट्रने पुणे येथील मुख्यालयात आयोजित एका दृकश्राव्य कार्यक्रमात अनेक नव्या योजनांची सुरवात केली.
बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी व व्यवस्थापकीय संचालक श्री ए एस राजीव यांनी नवीन योजनांचे उद्घाटन केले व बँकेच्या यापुढील डिजिटल प्रवासाला ह्या नवीन योजना एक नवीन आयाम देतील आणि ग्राहकांना सुद्धा अधिक उत्तम सेवा देता येईल असे प्रतिपादन केले. तसेच बँकेच्या प्रगती व वाढीसाठी महत्वपूर्ण योगदान देणाऱ्या बँकेच्या विविध स्तरावरील कर्मचाऱ्यांचा सत्कारही करण्यात आला. बँकेचे कार्यकारी संचालक श्री हेमंत टम्टा व श्री ए बी विजयकुमार यांच्यासह बँकेचे सर्व सरव्यवस्थापक या कार्यक्रमासाठी उपस्थित होते .
बँकिंग उद्योगासाठी डीजीटायझेशन हाच पुढील मार्ग असल्याचे बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी व व्यवस्थापकीय संचालक श्री ए एस राजीव यांनी या प्रसंगी सांगितले. तसेच बँकेला खऱ्या अर्थाने तंत्रस्नेही स्मार्ट बँक बनविण्यासाठी कसोशीने प्रयत्न करण्यावर भर दिला. बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी व व्यवस्थापकीय संचालक श्री ए एस राजीव यांनी बँकेच्या वाढीसाठी व विकासासाठी अहोरात्र परिश्रम घेणाऱ्या सर्व कर्मचाऱ्यांचे कौतुक केले. बँकेचे कार्यकारी संचालक श्री हेमंत टम्टा यांनी बँकेने सुज्ञपणाची नीती अवलंबून पत सुविधा पुरविण्याची संस्कृती रुजाविल्याचे सांगितले. उत्कटतेने व अनुकंपेने व्यवस्थापनाचा मूलमंत्र बँकेने स्वीकारला असल्याचे मत कार्यकारी संचालक श्री हेमंत टम्टा यांनी व्यक्त केले. कार्यकारी संचालक श्री ए बी विजयकुमार यांनी बँकेच्या वाढीचा व विकासाचा आलेख उलगडून दाखविताना बँकेच्या कर्मचाऱ्यांच्या कार्यतत्परतेमुळेच बँकेला इतक्या अल्पावधीत विकासाचा एवढा मोठा टप्पा साध्य करता आल्याचे आवर्जून सांगितले. बाजारपेठेच्या व ग्राहकांच्या बदलत्या गरजा लक्षात घेऊन बँक नाविन्यपूर्ण कल्पना व योजना सादर करीतच राहील असे त्यांनी ठामपणे सांगितले.
आज बँकेच्या हॉक आय, महाबँक डिजिटल रिवार्ड, विना (कॅशलेस) कार्ड रोख रक्कम सुविधा, ई – रुपी, व ऑनलाईन फॉर्म १६ या नवीन सुविधा आज सुरु करण्यात आल्या. बँकेने दिलेल्या कर्जांवर सातत्याने संनियंत्रण ठेवून त्यांच्या गुणवत्तेचे सुजाण विश्लेषण करण्यासाठी बँकेच्या कर्मचाऱ्यांना हॉक आय हे स्वयंचलित ताण विश्लेषक उपयोजन साहाय्य करेल. भारतीय राष्ट्रीय प्रदाने महामंडळाशी ( एन पी सी आय ) समन्वय साधून त्यांच्या एन्थ पुरस्कार संकेतस्थळावरून बँकेच्या ग्राहकांना डिजिटल सुविधांचा उपयोग करून विविध बँकिंग सेवांचा लाभ घेता येणार आहे. विना कार्ड रोख रक्कम
काढण्याच्या सुविधेत बँकेच्या भ्रमणध्वनी उपयोजनाच्या ( मोबाईल अॅप ) द्वारे रोख रक्कम काढण्याची सुविधा देण्यात आली आहे. बँकेने ई – रुपी सुविधा सुरु केल्यामुळे भारतीय राष्ट्रीय प्रदाने महामंडळाने ( एन पी सी आय ) निर्माण केलेल्या एकीकृत प्रदाने प्रणाली यूपीआई( UPI) द्वारे भारतभरातील कोणत्याही बँकेत रकमांचे व निधीचे जलद हस्तांतरण करता येईल. बँक ऑफ महाराष्ट्रच्या निवृत्तीवेतन धारकांना बँकेच्या शाखेत प्रत्यक्ष न जाता डिजिटल माध्यमाच्या द्वारे फॉर्म १६ सादर करण्याची सुविधा देऊ करण्यात आली आहे.
बँकेच्या संसाधन नियोजन विभागाचे सरव्यवस्थापक श्री व्ही एन कांबळे यांनी उपस्थितांचे स्वागत केले तर नियोजन विभागाचे उप सरव्यवस्थापक श्री प्रदीप मिश्रI यांनी आभार प्रदर्शन केले.