इलेक्ट्रोनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाने आयोजित केली भारताला जगातील सर्वाधिक कनेक्टेड देश बनवण्याच्या रणनीती संदर्भात कार्यशाळा.
देशाच्या इंटरनेट सुविधेपासून अद्याप वंचित किंवा ही सेवा कमी असलेल्या भागात इंटरनेट पोहोचवण्याला वेग देण्यासाठीच्या पथदर्शी आराखड्यावर चर्चा.
इलेक्ट्रोनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाने, सर्व भारतीयांना संपर्काद्वारे जोडण्या संदर्भातल्या ‘कनेक्टिंग ऑल इंडियन्स’ या विषयावर कार्यशाळा आयोजित केली होती. संपर्काद्वारे सर्वात जास्त जोडलेला देश म्हणून भारत नावारूपाला या दृष्टीने या कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले. देशातल्या सार्वजनिक आणि खाजगी इंटरनेट सुविधा पुरवठादाराना या कार्यशाळेत निमंत्रित करण्यात आले होते. जिओ,एअरटेल कंपन्यांसह इलेक्ट्रोनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाचे अधिकारी, दळणवळण मंत्रालयाचा दूर संवाद विभाग यामध्ये सहभागी झाला. देशाच्या ज्या गावांमध्ये इंटरनेट सुविधा जाळे कमी आहे किंवा जे भाग या सेवेपासून अद्याप वंचित आहेत अशा भागांमध्ये इंटरनेट सुविधा वेगाने पोहोचवण्यासाठीच्या पथदर्शी आराखड्यावर यावेळी चर्चा करण्यात आली. जगातला सर्वात मोठी फायबर आधारित ग्रामीण ब्रॉडबॅंड कनेक्टीविटी प्रकल्प भारत नेट चा आढावाही यावेळी घेण्यात आला. इंटरनेट पासून वंचित भागांना तातडीने या सेवा पोहोचवण्याच्या रणनीतीवर या कार्यशाळेत चर्चा झाली.
केद्रीय इलेक्ट्रोनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान राज्य मंत्री राजीव चंद्रशेखर यांच्या अध्यक्षतेखाली ही कार्यशाळा झाली. सर्व भारतीयांना खुले,सुरक्षित आणि विश्वासार्ह तसेच उत्तरदायी इंटरनेट द्वारे जोडण्याचे विद्यमान सरकारचे उद्दिष्ट असल्याचे त्यांनी सांगितले. डिजिटल इंडिया द्वारे,इंटरनेटच्या बळावर सर्व नागरिकांना सक्षम करून त्याच्या बरोबरीने डिजिटल अर्थव्यवस्था आणि रोजगार विस्ताराची पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची दूर दृष्टी असल्याचे ते म्हणाले.
या कार्यशाळेने सार्वजनिक आणि खाजगी अशा दोन्ही संबंधिताना सार्वत्रिक इंटरनेट जाळ्याबाबत आपले विचार सामायिक करण्याची संधी देऊ केली.