पुण्याला प्रदूषणमुक्त करण्यासाठी सामुहीक प्रयत्न करावे.

Union Road Transport and Highways Minister Nitin Gadkari.

पुण्याला प्रदूषणमुक्त करण्यासाठी सामुहीक प्रयत्न करावे – केंद्रीय मंत्री नितीन गडकरी.

पुणे शहराची ओळख सुंदर आणि प्रदूषणमुक्त शहर म्हणून होण्यासाठी सर्वांनी मिळून सामुहीक प्रयत्न करावे. पुण्यातील रिंगरोड तयार करण्यासाठी आवश्यक सहकार्य करण्यात येईल, असे प्रतिपादन केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितिन गडकरी यांनी केले.
पुणे येथील सिंहगड रस्त्यावरील राजाराम पुल ते फनटाईम थिएटर येथे नव्याने उभारण्यात येत असलेल्या उड्डाण पुलाचा भुमिपूजन सोहळा केंद्रीय मंत्री श्री.गडकरी यांच्या हस्ते आणि उपमुख्यमंत्री अजित पवार आणि विधान परिषदेच्या उपसभापती डॉ.निलम गोऱ्हे यांच्या प्रमुख उपस्थितीत झाला. Union Road Transport and Highways Minister Nitin Gadkari.

श्री. गडकरी म्हणाले, पुण्यात जल, वायू, ध्वनी प्रदूषण कमी करण्यासाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करुन प्रयत्न करणे आवश्यक आहे. त्यासाठी पेट्रोल ऐवजी इथेनॉलवर चालणाऱ्या वाहनांचा वापर करणे आवश्यक आहे. त्यामुळे ऊस उत्पादक शेतकऱ्यांनाही याचा लाभ होईल. नागरिकांना चांगल्या सोयीसुविधा देण्यासाठी शहराबाहेर नवीन शहरे विकसीत करणे आवश्यक आहे.
नव्याने उभारण्यात येणाऱ्या उड्डाण पुलामुळे वाहतूक समस्या सोडविण्यास मदत होणार आहे. या पुलावर डबल डेकर सारख्या आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून तेवढ्याच खर्चात वाहतूक समस्या सोडविण्यास मदत होईल. पुणे मुंबईसह राज्याला केंद्र सरकारकडून जेवढी मदत देता येईल तेवढी दिली जाईल. पुणे मेट्रोचे काम गतीने सुरू आहे ही चांगली बाब आहे. पुण्यातील नदी प्रकल्प, रोप-वे व अन्य विकासाचे प्रकल्प पुर्ण करण्यासाठी पुर्ण सहकार्य केले जाईल.
पुणे- कोल्हापूर, पुणे-सोलापूर, पुणे-नगर या ब्रॉडगेज रेल्वे मार्गावर मेट्रो सुरू केल्यास बेरोजगार तरुणांना रोजगार मिळण्यासोबत वाहतूक अधिक गतीमान होईल. पुण्यातील वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी रिंगरोडचाही विकास केला जाईल. राज्यातील विकासाचे जेवढे प्रकल्प सुरु आहेत त्यासाठी केंद्राकडून आवश्यक तो निधी व मदत देण्यात येईल. महाराष्ट्रात जास्तीत जास्त मार्गावर मेट्रो धावण्यासाठी प्रयत्न केला जाईल. त्यामुळे नागरिकांना कमी दरात प्रवासाची सुविधा मिळण्यासोबत पर्यावरणालाही फायदा होईल.

वाहतूकीच्या चांगल्या सुविधा असणारे शहर बनविण्यासाठी प्रयत्न करू-अजित पवार

उपमुख्यमंत्री श्री. पवार म्हणाले, पुणे शहरात सुरू असलेली विविध विकास कामे वेगाने पूर्ण करण्याचा प्रयत्न आहे .विकासाची कामे करताना नागरिकांच्या सुविधेचा प्राधान्याने विचार करावा. त्यांना समस्या येणार नाहीत याकडेही लक्ष द्यावे. केंद्र, राज्य आणि महापालिकेच्या समन्वायातून ही कामे करण्यात येणार आहेत. केंद्र सरकारतर्फे करण्यात येणारे विकास प्रकल्प लवकर पूर्ण होण्यासाठी राज्याकडूनही पूर्ण सहकार्य करण्यात येईल.
विकासकामे करताना लोकप्रतिनिधींना विश्वासात घेऊन या कामांमध्ये अडथळा येणार नाही याची दक्षता घ्यावी. राज्य सरकार शहराच्या विकासासाठी सर्व ती मदत सतत करीत आहे. शहरांची लोकसंख्या व आकार वाढत आहे त्याप्रमाणे रस्ते व अन्य सुविधा देण्यासाठी प्रयत्न केला जात आहे. संत ज्ञानेश्वर महाराज पालखी मार्ग व संत तुकाराम महाराज पालखी मार्गाचेही लवकरच भुमिपूजन करण्यात येईल.
विकास कामांबाबत कुठलेही राजकारण न आणता नागरिकांना चांगल्या सोयीसुविधा देवून वाहतूकीच्या चांगल्या सोयीसुविधा असणारे शहर बनविण्यासाठी प्रयत्न करू, असे त्यांनी सांगितले
यावेळी महापौर मुरलीधर मोहोळ यांनी पुणे शहरात सुरू असलेल्या विकासकामांची माहिती दिली.

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *