सामान्य आणि विद्वान यातील दरी कमी होण्याची गरज – नितीन गडकरी.
भारतीय संस्कृतीत मंदिरांना विशेष महत्त्व आहे, मंदिरे हा फक्त श्रध्देचा आणि धार्मिक विषय नाही तर ती आमची प्रेरणा आहे आणि त्यातही विज्ञान दडलेले आहे. विज्ञान सोपे करुन सांगितले तर सामान्य आणि विद्वान यातील दरी कमी होऊ शकेल, असे प्रतिपादन केंद्रीय रस्ते व वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी आज येथे केले. भांडारकर प्राच्यविद्या संशोधन संस्थेचा पहिल्या भांडारकर स्मृती पुरस्कार ज्येष्ठ पुरातत्वज्ञ डॉ.गो.बं.देगलूरकर यांना त्यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला तेंव्हा ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे अध्यक्ष अभय फिरोदिया होते तर शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांची व्यासपीठावर विशेष उपस्थिती होती. भांडारकरी पगडी, मानपत्र, रोख एक लाख रुपये व शाल, श्रीफळ असे पुरस्काराचे स्वरुप होते.
यावेळी गडकरी पुढे म्हणाले की, देगलूरकरांना देण्यात येणारा हा पुरस्कार देखील धन्य झाला आहे. मंदिरांबरोबरच मूर्तींना देखील इतिहास आहे आणि त्यातील भावार्थाबरोबरच विज्ञान उलगडून त्यावर संशोधन करणारे देगलूरकर एक समर्पित व्यक्तिमत्व आहे, यासाठी हा गौरव करण्याचे भाग्य मला मिळाले याचा आनंद वाटतो आहे. इंग्रजांनी इतिहासाची मोडतोड केली, त्यांना हवा तसा इतिहास लिहीला गेला. आता त्याचे पुनर्लेखन करण्याची आवश्यकता आहे. विदेशात ज्याप्रकारे संशोधन होत असते, त्याचे रेकॉर्ड केले जाते. तसेच भारतात देखील इतिहासातील विज्ञान शोधून त्यावर संशोधन केले पाहिजे. त्यासाठी राजाश्रयाबरोबच लोकाश्रय देखील मिळण्याची आवश्यकता आहे. महाराष्ट्र ही प्रेरणादायी भूमी आहे, छत्रपती शिवाजी महाराजांच्या व संतांची भूमी आहे. त्यासाठीच भारतात सर्वदूर भ्रमंती केली पाहिजे आणि त्यासाठीच मोठे, चांगले रस्ते बांधण्याचा मी चंग बांधला आहे, असेही यावेळी गडकरी म्हणाले. भांडारकर संस्था करीत असलेल्या संशोधनाबद्दल व संस्कृती, वारसा जपत असल्याबद्दल त्यांनी यावेळी समाधान व्यक्त केले.
सत्काराला उत्तर देतांना देगलूरकर म्हणाले की, माझा सन्मान होत आहे, ही आनंदाची बाब असली तरी मी इतका मोठा नाही, याची मला जाणीव आहे. वारकरी कुटुंबातील मी असल्याने हा प्रसाद समजून अधिक कार्य करण्यासाठी पुरस्कार मला मिळाला आहे, अशीच माझी भावना आहे. मूर्तींचा अभ्यास झाल्याशिवाय भारताची संस्कृती समजणार नाही, यासाठी अधिक संशोधक निर्माण व्हायला हवेत.
अध्यक्षीय मनोगतात यावेळी फिरोदिया म्हणाले की, संस्थेच्या सुधारणांसाठी आणि विविध प्रकल्पांसाठी निधीची आवश्यकता असते. शतकमहोत्सवी संस्थेला केंद्र आणि राज्य सरकारने अर्थसहाय्य केले पाहिजे. संस्था आज स्वबळावर अनेक गोष्टी करीत आहेच, पुढेही करीत राहील. शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांनी यावेळी रुपये एक लाखांची देणगी देत असल्याचे जाहीर केले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक संस्थेचे कार्याध्यक्ष भूपाल पटवर्धन यांनी केले. सर्वांचे स्वागत संस्थेचे मानद सचिव प्रा.सुधीर वैशंपायन यांनी केले तर संस्थेचे विश्वस्त अॅड. सदानंद फडके यांनी उपस्थितांचे आभार मानले. श्रीनंद बापट यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले.