जिल्हा वार्षिक योजनेतून सातारा पोलीस दलासाठी १० कोटींचा निधी.

Maharashtra-Police. हडपसर मराठी बातम्या Hadapsar Latest News, Hadapsar News

जिल्हा वार्षिक योजनेतून सातारा पोलीस दलासाठी १० कोटींचा निधी – उपमुख्यमंत्री अजित पवार.

वडूज येथील पोलीस स्टेशनच्या नूतन इमारतीचे उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन.

Maharashtra-Police
Image Source
en.wikipedia.org

पोलिसांकडून चांगल्या कामाची अपेक्षा करीत असताना त्यांना उत्तम पायाभूत सुविधा देणे ही शासनाची जबाबदारी असून सातारा पोलीस दलाच्या गरजा पूर्ण करण्यासाठी जिल्हा वार्षिक योजनेंतर्गत 10 कोटींचा वाढीव निधी देण्यात येईल, असे प्रतिपादन राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले. वडूज येथील पोलीस स्टेशनच्या नूतन इमारतीच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते.

श्री.पवार म्हणाले, पोलीसांवर येणारा ताण लक्षात घेता पोलीस भरतीला परवानगी देण्यात आली आहे. पोलीसांचे प्रश्न सोडविण्याकडे विशेष लक्ष देण्यात येत आहे. पोलीसांनी ‘स्मार्ट पोलीसिंग’ च्या माध्यमातून जनतेच्या मनात विश्वासाचे वातावरण निर्माण करावे.

गुन्ह्यांचा वेगाने तपास, त्यातील अचूकता, नव्या तंत्रज्ञानाचा वापर, पायाभूत सुविधांचा क्षमतेने वापर, पोलीस पाटलांशी संवाद वाढविणे या माध्यमातून आपली चांगली प्रतिमा निर्माण करावी. पोलीस स्टेशनचे मानांकन निश्चित करावे.

पोलिसांनी आव्हान म्हणून जबाबदारी स्वीकारताना गुन्हेगारी प्रवृत्तीकडून जनतेला त्रास होणार नाही याची दक्षता घ्यावी आणि संघटित गुन्हेगारी मोडीत काढावी. जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्थेकडे विशेष लक्ष द्यावे. गुन्हेगारांना पोलीसांचा वचक वाटेल आणि सामान्यांना आधार वाटेल नागरिक विश्वासाने पोलीस स्टेशनला येतील आणि समाधाने परत जातील अशी कामगिरी पोलीस दलांनी करावी अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.

महिलांच्या सुरक्षेला सर्वोच्च प्राधान्य.

शासन महिलांच्या सुरक्षेला सर्वोच्च प्राधान्य देत असून महिलांवरील अत्याचाराच्या घटना ही चिंतेची बाब आहे समाज म्हणूनदेखील ही बाब योग्य नाही. गुन्हेगारांना कडक शिक्षा व्हावी असे प्रयत्न करण्यात येत आहेत. नागपूर अधिवेशनात ‘शक्ती’ कायदा आणण्याचा शासनाचा प्रयत्न असेल. नागरिकांनी याबाबत असलेल्या सूचना लोकप्रतिनिधींच्या माध्यमातून शासनापर्यंत पोहोचवाव्यात, महिलांविषयी आदर आणि समानतेची भावना निर्माण होण्यावर भर द्यावा आणि त्याची सुरुवात घरापासून करावी, असे आवाहन उपमुख्यमंत्री श्री.पवार यांनी केले.

पालकमंत्री श्री.पाटील म्हणाले, वडूज मधील विकास होत असताना लोकसंख्यादेखील वाढत आहे. या परिसराची शांततेसाठी ख्याती आहे. सुरक्षेच्यादृष्टीने चांगले वातावरण निर्माण व्हावे म्हणून पोलीस स्टेशनमधील नूतन इमातीमधील सुविधा उपयुक्त ठरतील. सातारा सैनिक स्कूल साठीदेखील 300 कोटीची तरतूद करण्यात आली असून जिल्ह्याच्या सर्वांगिण विकासासाठी आवश्यक कामे हाती घेतली जातील.

गृहराज्यमंत्री श्री.देसाई म्हणाले, पोलीस स्टेशनच्या बऱ्याच इमारती ब्रिटीशकालीन असल्याने त्यांचे नूतनीकरण आवश्यक आहे. शासनाने गेल्या दोन वर्षापासून पोलीस गृह निर्माण विभागाला त्यासाठी वाढीव तरतूद उपलब्ध करून दिली आहे. कोविड काळात कर्तव्य बजावताना मृत्युमुखी पडलेल्या पोलीस कर्मचाऱ्यांच्या कुटुंबियांना 50 लाखाचे आर्थिक सहाय्य देण्याच्या निर्णयामुळे अनेक कुटुंबांना दिलासा मिळाला आहे. पोलीसांच्या जुन्या वसाहतींचा दुरुस्तीच्या कामावरदेखील भर देण्यात असल्याचे त्यांनी सांगितले.

प्रास्ताविकात पोलीस अधिक्षक श्री.बन्सल यांनी पोलीस स्टेशनच्या नूतन इमारतीविषयी माहिती दिली.

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *