मुंबईत उभे राहणार लष्करी संग्रहालय!

Swatantracha-Amrut-Mohostav स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव हडपसर मराठी बातम्या Hadapsar Latest News Hadapsar News

मुंबईत उभे राहणार लष्करी संग्रहालय!

संग्रहालयासाठी तातडीने जागा निश्चित करण्याचे मुख्यमंत्र्यांचे निर्देश. Swatantracha-Amrut-Mohostav

भारतीय लष्कराच्या गौरवशाली आणि अभिनास्पद कामगिरीचे दर्शन घडवणारे, शौर्य, पराक्रम, धैर्य आणि संयमाच्या काळातील अनुभूतीची प्रचिती देणारे राज्य युद्ध स्मारक आणि लष्कर संग्रहालय मुंबईत उभारण्यात येणार असून या संग्रहालयासाठी तातडीने जागा निश्चित करण्यात यावी असे निर्देश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज दिले. भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्ताने या संग्रहालयाचे काम वेगाने पूर्णत्वाला नेऊन येत्या १५ ऑगस्टपर्यंत यातील काही भाग नागरिकांसाठी सुरु करावा अशी अपेक्षाही त्यांनी यावेळी व्यक्त केली.

सल्लागार आणि‍ डिझाईनर समितीची स्थापना

हे संग्रहालय कसे असावे, यात कोणकोणत्या बाबींचा समावेश असावा हे निश्चित करण्यासाठी लष्करी अधिकाऱ्यांच्या सहभागासह एका सल्लागार आणि डिझाईनर समितीची स्थापना करण्यात यावी असे सांगून मुख्यमंत्री म्हणाले की, आपल्या आणि देशाच्या रक्षणासाठी सीमेवर प्रतिकूल परिस्थितीत काम करणाऱ्या आपल्या जवानांप्रती अधिक माहिती मिळण्याच्या दृष्टीने या संग्रहालयात काही गोष्टींची अनुभूती घेता येईल अशीही व्यवस्था करण्यात यावी. बंकर कसे असतात, सियाचीनसारख्या ठिकाणी उणे डिग्री सेल्सियसमध्ये आपले सैनिक कसे राहतात, जड शस्त्रास्त्रे सोबत घेऊन आपले सैनिक वाळवंटातून कसे चालतात, जंगलात त्यांचा वावर कसा असतो, यासारख्या गोष्टींची माहिती आणि अनुभव संग्रहालयाला भेट देणाऱ्या नागरिकांना मिळावा.

भारतीय लष्कराचे सामर्थ्य दर्शविणारी अनुभूती मिळावी

देशाचे लष्करी सामर्थ्य आणि गौरव दर्शविणाऱ्या या संग्रहालयाच्या माध्यमातून तीनही सैन्य दलाच्या पराक्रमाच्या यशोगाथा, विविध युद्धांची माहिती, यात वापरण्यात आलेले शस्त्रास्त्र आणि आयुध यासह तीन ही सैन्य दलामध्ये सहभागी असलेले महाराष्ट्रातील सैनिक, अधिकारी यांच्या पराक्रमाची माहिती, विविध युद्धात सहभागी होऊन शहीद झालेले राज्यातील सैनिक-अधिकारी, टँक, नौका, विमाने, पदके, लष्करी गणवेश, लष्करातील पदाधिकाऱ्यांचे रँक स्ट्रक्चर यासारख्या बाबी प्रदर्शित करण्यात याव्यात. युद्धात उपयोगात येणारी विमाने, नौका, हेलिकॉप्टर्स, रणगाडे यांच्या उभारणीसह इतर बाबींच्या प्रतिकृती येथे असाव्यात. येथे भारतीय स्वातंत्र्याची सर्व ऐतिहासिक माहिती मिळावी, हे राज्य संग्रहालय होत असल्याने यामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या लष्करी कौशल्यांची माहिती, त्यांचे नौदल नियोजन याची माहिती देणारे दालन असावे. ॲम्फी थिएटर, नागरी सुविधा, परमवीरचक्र, अशोक चक्र विजेत्यांची माहिती त्यांचा पराक्रम, त्यांचे मेडल्स अशी सर्व माहिती या ठिकाणी मिळावी.

याठिकाणी एक ॲक्टीव्हिटी एरियाही तयार केला जावा युवावर्गाला शारीरिक सुदृढतेसाठी काय करायला हवे, किमान सुरक्षिततेसाठी काय केले पाहिजे याची माहिती आणि मार्गदर्शन येथे मिळावे. भारतीय लष्करात सहभागी होण्यासाठी युवकांना प्रेरणा मिळावी यादृष्टीने त्यांना यासाठी करावयाची तयारी, याचे प्रात्यक्षिक ज्ञान देणारे काही कोर्सेस सुरु करता येतील का याचाही विचार केला जावा.

एकूणच भारतीय लष्कराच्या सामर्थ्याची सर्वंकष माहिती मिळताना या माध्यमातून नागरिकांना एक समृद्ध असा अनुभव मिळेल अशी व्यवस्था ही याठिकाणी असावी असेही मुख्यमंत्री यावेळी म्हणाले.

ब्रिगेडियर डॉ.शंकर यांनी देशभरातील राज्य लष्कर संग्रहालयाची माहिती देणारे सादरीकरण यावेळी केले.

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *