केंद्रीय युवक व्यवहार आणि क्रीडा मंत्री अनुराग ठाकूर उत्तर प्रदेशातील प्रयागराज येथून महिन्याभराच्या राष्ट्रव्यापी स्वच्छ भारत कार्यक्रमाची सुरुवात करणार.
कचरा सफाईतील विशेषतः एकदा वापरून टाकून देण्याच्या प्लॅस्टिकचा कचरा साफ करण्यातील लोकांचा सहभाग सुनिश्चित करण्यासाठी स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाचा भाग म्हणून हे स्वच्छता अभियान चालविण्यात येणार.
भारत सरकारच्या युवा व्यवहार आणि क्रीडा विभागाने स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त 1 ऑक्टोबर 2021 ते 31 ऑक्टोबर 2021 या कालावधीत देशव्यापी स्वच्छ भारत कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. नेहरू युवा केंद्र संघटनेशी संलग्न युथ क्लब आणि राष्ट्रीय सेवा योजनेशी संलग्न संस्थांच्या जाळ्याच्या माध्यमातून देशभरातील 744 जिल्ह्यांतील 6 लाख गावांमध्ये या कार्यक्रमाची अंमलबजावणी होईल.
प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींना नवी दिल्ली येथे या अभियानाची माहिती देताना केंद्रीय युवा व्यवहार सचिव उषा शर्मा म्हणाल्या की उत्तर प्रदेशातील प्रयागराज येथून केंद्रीय युवक व्यवहार आणि क्रीडामंत्री अनुराग ठाकूर या स्वच्छता अभियानाची सुरुवात करतील. स्वच्छतेविषयी जनजागृती करणे, सामान्य जनतेला प्रोत्साहित करणे आणि कचरा स्वच्छ करण्यात, विशेषतः एकदाच वापरून टाकून देण्याच्या प्लॅस्टिकचा कचरा साफ करण्यात लोकांच्या सहभागाची सुनिश्चिती करणे हा या अभियानाचा उद्देश आहे. त्या पुढे म्हणाल्या की, या विशाल उपक्रमाच्या माध्यमातून 75 लाख किलो कचरा, मुख्यतः प्लॅस्टिक कचरा गोळा केला जाईल आणि नागरिकांची मदत आणि स्वयंस्फूर्त सहभागातून त्या कचऱ्याची विल्हेवाट लावली जाईल.
त्याआधी कार्यक्रमात बोलताना केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर म्हणाले की भारताच्या स्वातंत्र्य प्राप्तीचा अमृत महोत्सव साजरा करत असताना आपण आपला देश प्लॅस्टिकमुक्त करण्याची शपथ घेतली पाहिजे.