नारायण इंगळे अनाथ आरक्षण संवर्गातून पहिला अधिकारी.
महिला व बालविकास मंत्री ॲड.यशोमती ठाकूर यांनी केले कौतुक.
महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या नुकत्याच झालेल्या परीक्षेत अनाथ संवर्गातील आरक्षणातून नारायण इंगळे या तरुणाला प्रादेशिक वन अधिकारी म्हणून नियुक्ती मिळाली आहे. अनाथ संवर्गातील आरक्षणातून अधिकारी झालेला नारायण इंगळे हा पहिला असून त्याला शुभेच्छा देत त्याचे मी खूप खूप अभिनंदन करते, अशी प्रतिक्रिया महिला व बालविकास मंत्री ॲड.यशोमती ठाकूर यांनी व्यक्त केली आहे.
अनाथ बालकांसाठी नोकरी, शिक्षणात एक टक्का आरक्षण देण्यात यावे यासाठी राज्याच्या महिला व बालविकास विभागाने सातत्याने पाठपुरावा केला होता.
या आरक्षणाद्वारे नारायण इंगळे या तरुणाला नुकत्याच झालेल्या महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत प्रादेशिक वन अधिकारी पदावर नियुक्ती मिळाली आहे. याबाबत नारायणशी दूरध्वनीवरून संपर्क साधत महिला व बालविकास मंत्री ॲड.ठाकूर यांनी शुभेच्छा देत त्याचे अभिनंदन केले. तसेच भविष्यातही आपण कायम सोबत असल्याची ग्वाही त्यांनी नारायण याला दिली. यापुढे होतकरू अनाथ बालकांना आरक्षणाद्वारे नोकरीची संधी उपलब्ध होईल असा विश्वास ॲङ ठाकूर यांनी यावेळी व्यक्त केला आहे. तर नारायण इंगळे यांनी अनाथ आरक्षण संवर्गातून नियुक्ती मिळाल्याबद्दल महिला व बालविकास विभाग आणि मंत्री ॲड.यशोमती ठाकूर यांच्या बद्दल कृतज्ञता व्यक्त केली आहे.