भारत आणि अमेरिका संरक्षणविषयक औद्योगिक सुरक्षेसाठी संयुक्त कृती गटाची स्थापना करणार
ठळक मुद्दे:
- दोन्ही देशांतील संरक्षणविषयक सामग्री निर्मिती उद्योगांच्या दरम्यान वर्गीकृत माहितीची देवाणघेवाण करण्यासाठीची नियमावली विकसित करण्यासाठी परिषदेचे आयोजन
- भारत-अमेरिका सुरक्षाविषयक संयुक्त कृतीगटाची स्थापना करण्यास तत्वतः मंजुरी
- अत्यंत महत्त्वाच्या संरक्षणविषयक तंत्रज्ञानाच्या बाबतीत एकत्र काम करण्याच्या दृष्टीने संरक्षण उद्योगांसाठी धोरणे निश्चित करण्यासाठी या गटाच्या नियमितपणे बैठका होतील
भारत आणि अमेरिका या देशांची आयएसए अर्थात औद्योगिक सुरक्षा करारविषयक परिषद 27 सप्टेंबर ते 01 ऑक्टोबर 2021 या कालावधीत नवी दिल्ली झाली. दोन्ही देशांच्या संरक्षण विषयक उत्पादनांच्या निर्मिती विभागाशी संबंधित उद्योगांच्या दरम्यान वर्गीकृत माहितीची देवाणघेवाण करण्यासाठी नियमावली विकसित करण्याच्या उद्देशाने या परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. या परिषदेचे नेतृत्व करण्यासाठी भारतातर्फे अनुराग वाजपेई आणि अमेरीकेतर्फे डेव्हिड पॉल बॅग्नती यांची अधिकृत सुरक्षा अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली होती.
भारत आणि अमेरिका या देशांच्या संरक्षण सामग्रीच्या उत्पादनाशी संबधित उद्योगांदरम्यान वर्गीकृत माहितीची देवाणघेवाण सुलभतेने होण्यासाठी डिसेंबर 2019 मध्ये औद्योगिक सुरक्षा करार करण्यात आला. या कराराच्या अंमलबजावणीची आराखडा प्रक्रिया निश्चित करण्यासाठी या परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. दोन्ही देशांच्या अधिकृत सुरक्षा अधिकाऱ्यांनी आराखडा निश्चित करण्याच्या दृष्टीने भारतीय संरक्षण सामग्री उत्पादन उद्योगाला देखील भेट दिली. या परिषदेदरम्यान, भारत-अमेरिका संरक्षणविषयक औद्योगिक सुरक्षेबाबत संयुक्त कृती गटाची स्थापना करण्यास दोन्ही देशांनी तत्वतः मंजुरी दिली. याविषयीची धोरणे आणि प्रक्रिया तातडीने मार्गीकृत करण्यासाठी या गटाच्या नियमित बैठका होतील आणि त्यामुळे दोन्ही देशांच्या संरक्षणविषयक उद्योगांना संरक्षण क्षेत्रातील अत्याधुनिक तंत्रज्ञानाबाबत एकत्र येऊन कामे करता येईल.