स्वर्णिम विजय वर्ष पुणे सोहळा : विजय मशालीचे साळुंखे विहार येथे स्वागत
1971 च्या भारत-पाक युद्धात भारतीय लष्कराच्या गौरवशाली विजयाची 50 वर्षे साजरी करण्यासाठी, पंतप्रधान नरेंद्र मोदींनी चार मुख्य दिशांना विजय मशाली रवाना करुन 16 डिसेंबर 2020 रोजी देशव्यापी सोहळा साजरा करण्यास सुरुवात केली. 01 ऑक्टोबर 2021 रोजी पुण्यात लष्कर आणि नागरिकांनी मशालीचे भव्य स्वागत केले. पुण्यात महिनाभर होत असलेल्या स्वर्णिम विजय वर्ष उत्सव कार्यक्रमांचा भाग म्हणून, विजय मशाल आज साळुंखे विहार येथे नेण्यात आली.
साळुंखे विहार येथे राहणारे मान्यवर आणि 1971 च्या भारत-पाक युद्धातील वीर यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते. लेफ्टनंट जनरल (निवृत्त) पंडित बीटी, पीव्हीएसएम वीर चक्र, कर्नल (निवृत्त) साळुंखे एस बळवंत , वीर चक्र आणि ब्रिगेडियर (निवृत्त) हरोळीकर अरुण यांच्या पत्नी श्रीमती हरोळीकर यांनी मशालीचे स्वागत केले. या कार्यक्रमात अनेक दिग्गज, वीर आणि सेवेतील लष्करी अधिकारी उपस्थित होते. सर्व मान्यवर आणि निवृत्त लष्करी अधिकाऱ्यांनी ही मशाल सन्मानपूर्वक मार्गस्थ केली.
स्टेशन कमांडर, अधिकारी आणि माजी लष्करी अधिकारी, आणि नागरिक या सोहळ्यात सहभागी झाले. सभागृहात आणण्यापूर्वी ही मशाल निवासी भागात फिरवली गेली. रहिवाशांनी त्यावेळी सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित केले होते. साळुंखे विहार इथे रहिवाशांनी विजयी मशालीचे उत्साहात स्वागत केले. 1971 च्या भारत-पाक युद्धात भारतीय सैन्य आणि त्याच्या ज्येष्ठ दिग्गजांच्या अमूल्य योगदानाबद्दल स्टेशन कमांडर, पुणे मिलिटरी स्टेशन यांनी कृतज्ञता व्यक्त केली.
या वीरांच्या योगदानामुळे त्यावेळी पूर्व पाकिस्तानी सैन्याने शरणागती पत्करली. भारताचा निर्णायक विजय झाला.