केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते नाशिक जिल्ह्यातील 1678 कोटी रुपये खर्चाच्या 206 किलोमीटर लांबीच्या 12 राष्ट्रीय महामार्गाच्या प्रकल्पांचे भूमिपूजन आणि लोकार्पण.
नव्या महामार्गांच्या प्रकल्पामुळे नाशिकची कनेक्टीव्हिटी संपूर्ण देशात वाढणार : केंद्रीय मंत्री नितीन गडकरी.
मुंबई-नाशिक महामार्गासाठी 5 हजार कोटी रुपये खर्च करणार – केंद्रीय मंत्री नितीन गडकरी.
केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितिन गडकरी यांच्या हस्ते आज नाशिक येथे 1678 कोटी रुपये खर्चाच्या 206 किलोमीटर लांबीच्या राष्ट्रीय महामार्गाच्या 12 प्रकल्पांचे लोकार्पण आणि भूमिपूजन करण्यात आले.
मुंबई-नाशिक महामार्गासाठी 5 हजार कोटी रुपये खर्च करण्यात येणार असून येणाऱ्या दोन ते अडीच वर्षात नाशिक ते मुंबई हा प्रवास केवळ दोन तासात होणार असल्याचा विश्वास केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी यावेळी व्यक्त केला.
या प्रकल्पांमध्ये 1678 कोटी रुपये खर्चाच्या 206 किलोमीटर लांबीच्या 12 राष्ट्रीय महामार्ग प्रकल्पांचा समावेश आहे.
सद्यस्थितीत महाराष्ट्रातील जवळपास सर्व जिल्हा मुख्यालये राष्ट्रीय महामार्गाशी जोडण्यात आलेली आहेत. नव्या महामार्गांच्या प्रकल्पामुळे नाशिकची कनेक्टीव्हिटी संपूर्ण देशात वाढणार आहे. सूरत-नाशिक-अहमदनगर-सोलापूर ते चेन्नई पर्यंतच्या ग्रीनफील्ड एक्सप्रेसवे प्रकल्पाला भारतमाला परियोजना फेज-1अंतर्गत केंद्रीय रस्ते, वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाने मंजुरी दिली आहे. तसेच नाशिक ते मुंबई महामार्गाच्या दुरुस्तीसह त्याच्या नूतनीकरणासाठी पाच हजार कोटी रुपयांच्या मंजुरीसह पिंपरीसदो ते गोंदे या 20 किमी मार्गाचे सहा पदरीकरण व नाशिकरोड ते द्वारका ईलिव्हेटेड कॉरिडॉर करणार असल्याची घोषणाही केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी यावेळी केली.
कर्कश हॉर्नमुळे होणाऱ्या ध्वनी प्रदूषणाचा विचार करता येत्या काळात सगळ्या गाड्यांचे हॉर्न भारतीय वाद्यातच वाजले पाहिजेत यासंदर्भात नियम करणार असल्याचे त्यांनी सांगितले. महाराष्ट्रात रस्ते अपघातामुळे होणाऱ्या मृत्यूचे प्रमाण जास्त आहे, याबद्दल त्यांनी यावेळी चिंता व्यक्त केली. नाशिकमध्येही लॉजिस्टिक पार्क बांधायला आपण तयार असून महापालिकेने याकामी पुढाकार घ्यावा असे त्यांनी नमूद केले.
विकासाचा चौफेर दृष्टीकोन केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या कर्तुत्वातून उभा देश पाहतोय, अनुभवतोय असे प्रतिपादन यावेळी केंद्रीय पंचायतराज राज्यमंत्री कपिल पाटील यांनी केले.
राष्ट्रीय महामार्गांच्या विस्तारामुळे आज आदिवासी दुर्गम भागातील वाहतूक अत्यंत सुलभ झाली असून त्यामुळे वाडे-पाडे शहराशी जोडले गेले असून कोरोनाकाळात केवळ वेळच नाहीतर कितीतरी जीव या राष्ट्रीय महामार्गांच्या निर्मितीमुळे वाचले असल्याची भवना यावेळी केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ. भारती पवार यांनी व्यक्त केली. महाराष्ट्राचे कृषी मंत्री दादाजी भुसे, नाशिकचे पालकमंत्री छगन चंद्रकांत भुजबळ, आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते.
*सूरत-नाशिक-अहमदनगर-सोलापूर ते चेन्नई ग्रीनफील्ड एक्सप्रेसवे प्रकल्प*
हा द्रुतगती मार्ग (Access Control) असुन प्रकल्प पूर्णझाल्यांनतर सुरत ते सोलापूर दरम्यान 95 किलोमीटरचे अंतर कमी होईल आणि सुरत ते चेन्नई प्रवास करण्यासाठी सुमारे 200 किमीचे अंतर कमी होईल. नाशिक ते सुरत अंतर अवघ्या दिड तासात कापला येईल. हा प्रकल्प 3 वर्षाच्या कालावधीत पूर्ण होणे अपेक्षित आहे. या प्रकल्पामुळे मोठ्या प्रमाणात इंधनाची बचत होणार असुन प्रवसाचा कालावधी देखील कमी होणार आहे. तसेच ग्रामीण भागातुन एक्सप्रसवे जात असल्याने रोजगाराच्या संधी उपलब्ध होणार आहेत.
*पिंपरीसदो ते गोंदे मार्गाचे होणार सहापदरीकरण*
पिंपरीसदो ते गोंदे हे 20 कि.मी. सहापदरी केल्यानंतर नाशिककरांना मुंबईचा संपूर्ण प्रवास सहापदरी रस्त्याने होईल. अंदाजित खर्च 600 कोटी असेल. ह्यात 10 अंडरपासेस, 3 रोब आणि सर्व्हिस रोड चा समावेश असून या प्रकल्पामुळे मुंबई जलद आणि सुरक्षित कनेक्टिव्हीटी होईल. बहुमुल्य वेळ आणि इंधनाची बचत होणार आहे. परिसराचा सर्वागिण विकासाबरोबरच , नवे उद्योग आणि रोजगार निर्मिती गोंदे एम.आय.डी.सी. चा विस्तार आणि रोजगार वाढीस चालना मिळणार आहे.
*नाशिकरोड ते व्दारका चौक ईलिव्हेटेड कॉरिडोर होणार*
नाशिकरोड ते व्दारका चौक हा नाशिक- पुणे (रा.म.क्र. 50) चा भाग असुन नुकताच भारतमाला परियोजनेत समाविष्ट करण्यात आला आहे. या प्रकल्पामुळे व्दारका चौकातील वाहतुक कोंडी नामशेष होणार असून नाशिक रोड ते व्दारका प्रवास फक्त अर्ध्यां वेळेत होणार आहे. चौका चौकातल्या वाहतुक कोंडीचे निराकरणासोबत अपघातांची मालिका खंडीत होऊन प्रवास सुखद, सुरक्षित आणि सहज होईल.