कॅन्सरग्रस्त रुग्णांसाठी टाटा मेमोरियल सेंटर येथील इन्फोसिस फाऊंडेशनच्या ‘आशा’ धर्मशाळेचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन.
रुग्णांची जगण्याची उमेद वाढवणाऱ्या कामाबद्दल मुख्यमंत्र्यांकडून सुधा मूर्ती यांचा गौरव.
मुंबई : आजपासून आपण राज्यातली मंदिरे उघडली आहेत. टाटा मेमोरियल सेंटरच्या परिसरात उद्घाटन होत असलेल्या ‘आशा’ धर्मशाळेमुळे आरोग्य मंदिराचे दारदेखील सर्वसामान्य गरीब रुग्ण आणि नातेवाईकांसाठी खुले झाले आहे अशा शब्दांत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. ते आज नवी मुंबईच्या खारघर येथे इन्फोसिस फाऊंडेशनने बांधलेल्या ‘आशा’ निवास धर्मशाळेच्या लोकार्पणप्रसंगी बोलत होते. यावेळी रुग्णांची जगण्याची उमेद जिवंत ठेवणारी सुधा मूर्ती यांच्यासारखी देवमाणसे आपल्यासोबत असणे हे निश्चित आपले भाग्य आहे असे गौरवोद्गार मुख्यमंत्र्यांनी काढले.
दूरदृश्य प्रणालीद्वारे झालेल्या या कार्यक्रमात इन्फोसिस फाऊंडेशनच्या अध्यक्ष सुधा मुर्ती यांच्यासह नंदन निलकेणी, मुख्यमंत्र्यांचे अपर मुख्य सचिव आशिषकुमार सिंह, प्रधान सचिव विकास खारगे, परमाणू ऊर्जा विभागाचे सचिव के एन व्यास, सहसचिव संजय कुमार, टाटा मेमोरियल सेंटर संचालक डॉ. आर.ए. बडवे, यांच्यासह इन्फोसिस व टाटा मेमोरियल सेंटरचे इतर मान्यवर उपस्थित होते. खारघर येथे बांधण्यात आलेली ही १३ मजली अूसन इमारतीत २६० खोल्या आहेत.
नवरात्रीच्या पहिल्याच दिवशी आरोग्य मंदिराचे लोकार्पण करण्याचे भाग्य आपल्याला लाभले आहे असे सांगून मुख्यमंत्री श्री.ठाकरे म्हणाले की, श्रीमती सुधा मूर्ती या महाराष्ट्राच्या कन्या आहेत, पण त्यांच्यातील ‘आई’ आज आपल्याला पाहायला मिळाली, सुखी माणसाचा सदरा कुणालाच सापडत नाही, प्रत्येकाला नेहमी काही ना काही हवं असतं या स्थितीत श्रीमती मूर्ती यांची दातृत्वाची वृत्ती विरळी आहे. हा खऱ्या अर्थाने लक्ष्मी नारायणाचा जोडा आहे. जेव्हा कॉम्प्युटर किंवा कुठलेही सॉफ्टवेअर विकसित झाले नव्हते तेव्हा नारायण मूर्तींनी आपल्या उद्योगाचा विकास आणि विस्तार केला. तेवढ्यावरच ते थांबले नाहीत तर हे करत असताना आपण समाजाचे काही देणे लागतो ही भावनादेखील त्यांनी जपली.
सहकार्याचे अनमोल हात
आपण आज मंदिरे खुली केली आहेत पण यापूर्वीही डॉक्टरांच्या रुपाने देव आपल्या आसपास, सोबत वावरत होते याकडेही मुख्यमंत्र्यांनी लक्ष वेधले. ते म्हणाले की उपचारासाठी मुंबईत किंवा मोठ्या शहरात कर्करोगाच्या उपचारासाठी येणाऱ्या रुग्णांना आणि नातेवाईकांना खर्च परवडत नाही मग ते मिळेल तिथे राहतात, त्यांच्यासाठी हा ‘आशा’ निवास खूप महत्त्वाचा आधार ठरणार आहे. शासन राज्यातील आरोग्य सेवा सक्षम करत आहेच त्यात टाटा मेमोरियल सेंटर आणि इन्फोसिससारख्या संस्थांच्या सहकार्याच्या हाताने या कामाला अधिक बळकटी मिळते. मुख्यमंत्र्यांनी याठिकाणी येणारा रुग्ण खडखडीत बरा होऊन सुखरूप घरी जावो, अशी सदिच्छाही यावेळी व्यक्त केली.
अनुभवातून आलेला संदेश
श्रीमती सुधा मुर्ती यांची पुस्तके ही केवळ चाळता येत नाहीत तर ती लक्ष देऊन वाचावी लागतात. यात कुठलाही कल्पनाविलास नाही तर अनुभवातून आलेला संदेश आणि विचार आहे, हे विचारधन तुम्ही वाटत आहात असेही मुख्यमंत्र्यांनी सुधा मुर्तींच्या पुस्तकावर आपली प्रतिक्रिया देतांना म्हटले.
आशा निवासामुळे गरीब रुग्णांना मदत – सुधा मूर्ती
नवी मुंबई-खारघर येथे टाटा मेमोरियल सेंटर येथे उभारण्यात आलेल्या आशा निवास धर्मशाळेमुळे शहरात उपचारासाठी येणाऱ्या गोरगरीब जनतेला मदत होईल असे सांगून श्रीमती मूर्ती यांनी टाटा मेमोरियल सेंटरतर्फे देण्यात येत असलेल्या रुग्णसेवेचे कौतूक केले.इन्फोसिस फाऊंडेशन आणि कंपनी सर्वसामान्य जनतेच्या मदतीसाठी पुढे येऊन काही करू शकत असल्याचा आनंद व्यक्त करतांना त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वात महाराष्ट्रात आरोग्य क्षेत्रात उत्तम काम होत असल्याचेही सांगितले.