शासकीय, निमशासकीय, तसेच खाजगी क्षेत्रातील आस्थापनांनी सर्व कर्मचाऱ्यांची सांख्यिकी माहिती सादर करण्याचे आवाहन.
पुणे : जिल्ह्यातील सेवायोजन कार्यालये,सर्व सार्वजनिक क्षेत्रातील शासकीय, निमशासकीय, तसेच खाजगी क्षेत्रातील कायद्यांतर्गत असणाऱ्या आस्थापनांनी त्यांच्या आस्थापनेवर असणाऱ्या पुरुष, स्त्री व एकूण अशी सर्व कर्मचाऱ्यांची सांख्यिकी माहिती कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता विभागाच्या संकेतस्थळावरुन ऑनलाईन पध्दतीने सादर करावी, असे आवाहन कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता विभागाच्या सहायक आयुक्त अनुपमा पवार यांनी केले आहे.
सप्टेंबर २०२१ अखेर संपणाऱ्या तिमाहीची त्रैमासिक सांख्यिकी माहिती संकलन जिल्हा कौशल्य विकास कार्यालयाद्वारे सुरू आहे. सर्व आस्थापनांना या कार्यालयाकडून यापूर्वीच युझर नेम व पासवर्ड देण्यात आले आहेत. त्याचा वापर करुन प्रत्येकाने या विभागाच्या www.rojgar.mahaswayam.gov.in या संकेतस्थळावर आपली अचूक माहिती सादर करावी.
तिमाही विवरणपत्र सादर करण्याची अंतिम तारीख ३० ऑक्टोबर २०२१ आहे. तिमाही विवरणपत्र विहीत मुदतीत ऑनलाईन पध्दतीने सादर करावे व आपला नोंदणी तपशील देखील आवश्यक ती सर्व माहिती नोंदवून तात्काळ अद्ययावत करावा, असे आवाहनही सहायक आयुक्त पवार यांनी केले आहे.