नाबार्डकडून अधिकाधिक अर्थसहाय्यासाठी विभागांनी क्षेत्रांचा प्राधान्यक्रम निश्चित करावा – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे.
मुख्यमंत्र्यांची नाबार्डच्या अध्यक्षांसमवेत चर्चा.
मुंबई :राज्याच्या विकासासाठी विविध क्षेत्रातील प्रकल्प, योजनांना अर्थसहाय्याची गरज असते. त्यासाठी नाबार्डकडून अधिकाअधिक अर्थसहाय्य मिळवणे आवश्यक आहे. यासाठी राज्यातील विविध विभागांनी त्यांच्याशी निगडीत क्षेत्रांबाबतचा प्राधान्यक्रम निश्चित करण्याचे निर्देश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज येथे दिले.
नाबार्डचे अध्यक्ष डॉ जी आर चिंताला यांच्या नेतृत्वाखालील वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या शिष्टमंडळाने मुख्यमंत्री श्री.ठाकरे यांची भेट घेतली. या भेटीप्रसंगी झालेल्या चर्चेत मुख्यमंत्री बोलत होते.
मुख्यमंत्री श्री.ठाकरे म्हणाले,’ राज्यातील महत्वपूर्ण योजना, प्रकल्प यांना वित्तीय सहाय्याची आवश्यकता भासते. त्यासाठी नाबार्ड आणि विविध विभागांचा समन्वयही आवश्यक आहे. राज्यातील पायाभूत सुविधा तसेच विविध योजना, प्रकल्पांना नाबार्डकडून वित्तीय सहकार्य मिळावे यासाठी त्या-त्या क्षेत्रांचा आढावा घेऊन, प्राधान्यक्रम आणि निश्चित असा आराखडा तयार करण्यात यावा. यासाठी नाबार्डच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांशी समन्वय राखण्यात यावा.’
यावेळी झालेल्या चर्चेत नाबार्डकडून प्राधान्याने वित्तीय सहाय्यता देण्यात येणाऱ्या क्षेत्रांसह, जलसंपदा, रस्ते बांधणी, कृषी, सहकार, महिला सबलीकरण, स्वयंसहायता बचत गट, कृषी निर्यात यांच्यासह पर्यावरणीय बदलांना तोंड देण्यासाठीचे विविध प्रकल्प यांच्या अनुषंगानेही चर्चा झाली.