मुंबई-सिंधुदुर्ग दरम्यानच्या पहिल्या विमानाचे उड्डाण.
केंद्रीय नागरी हवाई वाहतूक मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया यांनी आभासी पद्धतीने सिंधुदुर्ग विमानतळावरुन, अलायन्स एअर विमानाला दाखवला हिरवा झेंडा.
येत्या पाच वर्षात प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षरीत्या सिंधुदुर्गासाठी 20 ते 25 विमानसेवा सुरु व्हाव्यात- केंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया यांची अपेक्षा.
सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या चिपी विमानतळावरुन, सिंधुदुर्ग- मुंबई दरम्यानच्या पहिल्या विमानाचे उड्डाण आणि चिपी विमानतळाचे उद्घाटन आज केंद्रीय हवाई वाहतूक मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते झाले. केंद्रीय मंत्री नारायण राणे देखील यावेळी उपस्थित होते. हायब्रीड म्हणजेच, आभासी आणि प्रत्यक्ष अशा पद्धतीने हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. ज्योतिरादित्य सिंधिया यांच्या हस्ते आभासी पद्धतीने सिंधुदुर्ग विमानतळावरुन, अलायन्स एअर विमानाला हिरवा झेंडा दाखवण्यात आला तर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सिंधुदुर्ग विमानतळावरुन विमानाला रवाना केले.
येत्या पाच वर्षात प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षरीत्या सिंधुदुर्ग विमानातळावरून, 20 ते 25 विमानांची वाहतूक सुरु व्हावी, अशी आपली इच्छा आहे, असे ज्योतिरादित्य सिंधिया यावेळी म्हणाले. महाराष्ट्रातील विमानतळाचा विकास आणि प्रगती करण्यासाठी हवाई वाहतूक मंत्रालय सर्वतोपरी सहकार्य करेल असे आश्वासन, सिंधिया यांनी यावेळी दिले. महाराष्ट्रासोबत आपले केवळ राजकीय संबंध नसून या राज्यासोबत आपले एक कौटुंबिक नाते असल्याची भावना त्यांनी व्यक्त केली.
छत्रपती शिवाजी महाराज यांचे स्मरण करत महाराष्ट्राला गौरवशाली इतिहास असल्याचं सिंधिया यांनी यावेळी सांगितलं. आपल्या आयुष्यातला हा एक भावूक क्षण असल्याचे देखील त्यांनी नमूद केलं. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील विमानतळाच्या उद्घाटनामुळे, गेल्या तीन दशकांचे स्वप्न पूर्ण झाले असून एक नवा अध्याय यामुळे रचला गेल्याचं त्यांनी स्पष्ट केलं. चिपी विमानतळाच्या उद्घाटनाबद्दल महाराष्ट्र राज्य सरकार आणि एमआयडीसी यांचे त्यांनी अभिनंदन केले आणि त्यांना शुभेच्छा दिल्या. कोकण आणि सिंधुदुर्ग प्रदेशाला लाभलेला गौरवशाली इतिहास आणि या भागाचे सौंदर्य आज या विमानतळ उद्घाटनाच्या माध्यमातून हवाई वाहतुकीच्या नकाशावर आले आहे, या प्रदेशाचे हे वैशिष्ट्य आता देशात प्रसिद्ध करण्याचा आपला संकल्प असल्याचं सिंधिया म्हणाले. आजच्या या उद्घाटनामुळे पाचशे तीस किलोमीटरचे अंतर हे केवळ 50 मिनिटात कापले जाणार असल्याचे सिंधिया यांनी संगीतले.
अलायन्स एअरचे मुख्य कार्यकारी अधिकारी विनीत सूद यांनी सिंधुदुर्ग पासूनचा पहिला बोर्डिंग पास केंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया यांना दिल्ली इथे सुपूर्द केला तर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते सिंधुदुर्ग इथे महाराष्ट्रचे उद्योगमंत्री सुभाष देसाई यांना बोर्डिंग पास सुपूर्द करण्यात आला.
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील चिपी विमानतळाचे उद्घाटन हा माझ्या आयुष्यातील एक अतिशय आनंदाचा क्षण असल्याची भावना केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी यावेळी व्यक्त केली. या विमानतळाचे उद्घाटन हे सिंधुदुर्ग जिल्ह्यासाठी अतिशय उपयुक्त आहे, या विमानतळाच्या उद्घाटनामुळे पर्यटनाच्या माध्यमातून या जिल्ह्याला आर्थिक समृद्धी प्राप्त व्हावी अशी आशा राणे यांनी यावेळी व्यक्त केली.
कोकणच्या विकासासाठी सिंधुदुर्गचे विमानतळ निर्माण होणे अत्यंत महत्त्वपूर्ण असल्याचं केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी यावेळी सांगितलं.
या विमानतळामुळे, कोकणाचे वैभव जगासमोर जाणार आहे, असा विश्वास मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केला. कोकणात पर्यटनाला चालना द्यायची असेल, तर इथे, सुविधा यायला हव्यात विकासकामे व्हायालां हवीत, त्या विकासाकामांची सुरुवात आजपासून झाली आहे, असेही ठाकरे म्हणाले. इथे आणखी सुविधा निर्माण करण्याचे आश्वासन त्यांनी यावेळी दिले.
महाराष्ट्राचे उद्योग मंत्री सुभाष देसाई, बाळासाहेब थोरात, आदित्य ठाकरे, अदिती तटकरे आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते.
सिंधुदुर्ग विमानतळ
सिंधुदुर्ग विमानतळ हे एक ग्रीनफिल्ड विमानतळ आहे.
सिंधुदुर्ग हे केंद्र सरकारने मंजूर केलेल्या देशातल्या 21 ग्रीनफिल्ड विमानतळांपैकी एक विमानतळ आहे.
ग्रीनफिल्ड विमानतळ म्हणजे, टाकावू समजल्या गेलेल्या गोष्टी, साहित्यापासून तयार करण्यात आलेले नवीन, पर्यावरणपूरक विमानतळ.
- सिंधुदुर्ग जिल्ह्यात चिपी-परुळे इथे एकूण 271 हेक्टर्स भूमीवर हे ग्रीनफिल्ड विमानतळ बांधण्यात आले आहे.
- या एकूण प्रकल्पासाठी लागणारा अंदाजे खर्च 520 कोटी रुपये इतका आहे.
- महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाअंतर्गत आयआरबी इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपर्स, लिमिटेडने ने 19 फेब्रुवारी 2013 रोजी विमानतळाचे बांधकाम सुरु केले.
- यापैकी एका टर्मिनलचे आज उद्घाटन करण्यात आले.
सिंधुदुर्ग विमानतळाच्या उदघाटनदिनी उड्डाण करणाऱ्या पहिल्या विमानात इंडियन ऑइलचे इंधन
महाराष्ट्रातील सिंधुदुर्ग जिल्ह्यातील नव्या ग्रीनफिल्ड विमानतळाचे आज उदघाटन झाले असून, इथून उड्डाण करणाऱ्या पहिल्या विमानात इंडियन ऑइल एव्हीएशनने इंधन भरले आहे. केंद्र सरकारच्या ‘उडान’ योजनेअंतर्गत सिंधुदुर्ग विमानतळाला प्रादेशिक दळणवळण योजनेनुसार अधिसूचित केले आहे. तसेच सिंधुदुर्ग विमानतळावर इंधनाची व्यवस्था करण्याचे काम, इंडियन ऑइलला देण्यात आले आहे.
त्यानुसार, इंडियन ऑइलच्या हवाई इंधन विभागाने, सिंधुदुर्ग विमानतळावर अत्याधुनिक अशी इंधन भरण्याची व्यवस्था केली आहे. सर्व निर्धारित आणि भविष्यातील विमान वाहतुकीसाठी इंधन भरण्याची व्यवस्था इथे करण्यात आली आहे.
कोविड महामारीच्या काळातही, सर्व प्रतिबंधक नियमांचे पालन करुन सिंधुदुर्ग विमानतळ परिसरात नव्या विमान इंधन केंद्राचे बांधकाम पूर्ण करण्यात आले आणि ही सुविधा वेळेत कार्यरत होईल, याची व्यवस्था करण्यात आली. सिंधुदुर्ग विमानतळावरच इंधन भरण्याची सुविधा उपलब्ध झाल्याने सिंधुदुर्गला येणारी पर्यटकांची चार्टर्ड विमाने इथूनच उड्डाण करु शकतील आणि थेट सिंधुदुर्ग विमानतळावरच उतरु शकतील.
हवाई वाहतूक क्षेत्रात, इंडियन ऑइल आजही आघाडीची कंपनी म्हणून ओळखली जाते. सिंधुदुर्ग एव्हीएशन फ्युएल स्टेशन सुरु झाल्यानंतर इंडियन ऑइलच्या देशभरातील एकूण हवाई इंधन केंद्रांची संख्या 124 इतकी झाली आहे.
देशभरातील 42 विमानतळांवर इंडियन ऑइलची इंधन भरणा केंद्रे कार्यरत आहेत.