भारत-अमेरिका संरक्षण धोरण समूहाची वॉशिंग्टन डीसी इथे बैठक.
भारताचे संरक्षण सचिव डॉ अजय कुमार आणि अमेरिकेच्या संरक्षण विभागाचे अवर सचिव, डॉ. कॉलिन कॅहल यांच्या सह-अध्यक्षतेखाली वॉशिंग्टन डीसी येथे 8 ऑक्टोबर 2021 रोजी भारत-अमेरिका संरक्षण धोरण समूहाची (डीपीजी)16 वी बैठक आयोजित करण्यात आली होती. द्विपक्षीय संरक्षण सहकार्याच्या सर्व बाबींचा सर्वसमावेशक आढावा घेण्यासाठी आणि मार्गदर्शन करण्यासाठी संरक्षण धोरण समूह हा भारताचे संरक्षण मंत्रालय आणि अमेरिकेचा संरक्षण विभाग यांच्यातील सर्वोच्च अधिकारी -स्तरीय यंत्रणा आहे.
भारत-अमेरिका प्रमुख संरक्षण भागीदारी, लष्कर ते लष्कर संबंध वाढवणे,मूलभूत संरक्षण करारांची अंमलबजावणी, संरक्षण सराव , तंत्रज्ञान सहकार्य आणि संरक्षण व्यापार करण्याबाबतच्या प्रगतीचा,या बैठकीत दोन्ही बाजूंनी आढावा घेण्यात आला. दोन्ही बाजूंनी प्रादेशिक सुरक्षा दृष्टीकोन आणि सहकार्य सामायिक करण्यात आले आणि भारत पॅसिफिक प्रदेशात सामायिक हितसंबंधांना प्रोत्साहन देण्याच्या दृष्टीने एकत्र काम करण्याचे मान्य करण्यात आले.
विविध द्विपक्षीय संरक्षण उपक्रम आणि यंत्रणांनी केलेल्या प्रगतीची माहिती सह-अध्यक्षांना देण्यात आली. संरक्षण तंत्रज्ञान आणि व्यापार उपक्रमाअंतर्गत हवाई- प्रक्षेपण मानवरहित हवाई प्रक्षेपक (यूएव्ही) सह-विकसित करण्यासाठी त्यांनी संयुक्त प्रकल्पाचा आढावा घेतला.उच्चस्तरीय संरक्षण औद्योगिक सहकार्य सुलभ करण्यासाठी भारतात आयोजित पहिल्या औद्योगिक सुरक्षा करार बैठकीचे उभय देशांनी स्वागत केले. संरक्षण उद्योगांमध्ये सह-विकास आणि सह-उत्पादनासाठी. विद्यमान नवोन्मेषी कार्यक्षेत्राचा वापर करण्याच्या दृष्टीने, खाजगी आणि सरकारी दोन्ही भागधारकांना प्रोत्साहन देण्यासाठी त्यांनी सहमती दर्शवली. अंतराळ, कृत्रिम बुद्धिमत्ता, सायबर आणि मानवरहित हवाई प्रक्षेपक तंत्रज्ञानासारख्या नवीन क्षेत्रातील सहकार्याचे दोन्ही देशांनी स्वागत केले.
आगामी 2+2 मंत्रीस्तरीय चर्चेच्या तयारीचा दोन्ही बाजूंनी आढावा घेण्यात आला. संरक्षण धोरण समूहाची पुढील बैठक परस्पर सोयीच्या तारखांना भारतात घेण्याबाबत यावेळी सहमती झाली.