व्यायामशाळा विकास अनुदानासाठी प्रस्ताव सादर करण्याचे आवाहन
पुणे : सर्वसाधारण योजना व अनुसूचित जाती उपाययोजनेअंतर्गत, व्यायामशाळा विकास अनुदान व क्रीडांगण विकास अनुदान योजनेचा लाभ घेण्यासाठी स्थानिक स्वराज्य संस्था, ग्रामपंचायत, नगरपंचायत, नगरपरिषद, महानगरपालिका व इतर पात्र विभागांनी; विहित नमुन्यातील अर्जासह प्रस्ताव 30 ऑक्टोबर 2021 पर्यंत सादर करण्याचे आवाहन जिल्हा क्रीडा अधिकारी राजेश बागुल यांनी केले आहे.
क्रीडा व युवक सेवा संचालनालयामार्फत व्यायामशाळा विकास अनुदान योजना राबविण्यात येत आहे. जिल्हा नियोजन समितीच्या निधीतून जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयाच्यावतीने, व्यायामशाळा विकास अनुदान योजनेंतर्गत जिल्ह्यातील स्थानिक स्वराज्य संस्था, अनुदानित माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा, शासकीय विभाग,अदिवासी व समाजकल्याण विभागातंर्गत शासकीय आश्रमशाळा व स्थानिक स्वराज्य संस्था, ग्रामपंचायत, नगरपंचायत, नगरपरिषद, महानगरपालिका यांना खुली व्यायामशाळा साहित्य व व्यायामशाळा साहित्य खरेदीसाठी रुपये 7 लाख रूपये इतके कमाल अनुदान देण्यात येते.
योजनेचा लाभ घेण्यासाठी; जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, द्वारा सर्व्हे क्रमांक 191, विभागीय क्रीडा संकुल, महाराष्ट्र हौसिंग बोर्ड, मोझे हायस्कूल समोर येरवडा, पुणे या पत्त्यावर प्रस्ताव पाठवावेत, असे आवाहन श्री बागुल यांनी केले आहे.