कौशल्य विकास विभागातर्फे नि:शुल्क प्रशिक्षण कार्यक्रमांचे आयोजन.
पुणे : कोविड-19 विषाणू प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर हेल्थकेअर क्षेत्रामध्ये कुशल मनुष्यबळाची उभारणी करण्याकरीता जिल्ह्यामध्ये वर्ष 2021 साठी ‘प्रधानमंत्री कौशल्य विकास योजना 3.0 अंतर्गत हेल्थकेअर क्षेत्रविषयक विशेष प्रकल्प’ राबविण्यात येत आहे. या कार्यक्रमाच्या अंतर्गत जिल्ह्यात सहा अभ्यासक्रमांचे प्रशिक्षण आयोजन केले आहे.
या कार्यक्रमाच्या माध्यमातून आरोग्य क्षेत्रात काम करण्यास इच्छुक असलेल्या 18 ते 45 वयोगटातील युवक- युवतींना हेल्थकेअर क्षेत्रामध्ये जिल्ह्यातील विविध शासकीय व खाजगी रुग्णालये तसेच वैद्यकीय शिक्षण संस्था यांच्यामार्फत ‘कोविड फ्रंटलाईन वर्कर- सॅम्पल कलेक्शन सपोर्ट’, ‘इमर्जन्सी केअर सपोर्ट’, ‘होम केअर सपोर्ट’, ‘बेसिक केअर सपोर्ट’, ‘मेडीकल इक्विपमेंट सपोर्ट’, ‘ॲडव्हान्स केअर सपोर्ट’ अशा विविध 6 अभ्यासक्रमांचे संस्थात्मक तसेच प्रत्यक्ष कामाच्या ठिकाणी प्रशिक्षण (ऑन जॉब ट्रेनिंग) देण्यात येणार आहे. हा प्रशिक्षण कार्यक्रम पूर्णपणे नि:शुल्क असून प्रशिक्षण पश्चात प्रमाणीकरणासह रोजगारदेखील सहजपणे उपलब्ध होऊ शकतो.
या कार्यक्रमात सहभागी होण्याकरीता उमेदवारांनी https://forms.gle/cwncj2iBZuaSoin67 या लिंकवर उपलब्ध असणाऱ्या गुगल फॉर्मच्या माध्यमातून आपली नोंदणी करणे आवश्यक आहे. तसेच ऑफलाईन नोंदणीसाठीचे अर्ज जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उदयोजकता मार्गदर्शन केंद्र, 481, रास्ता पेठ, पुणे या कार्यालयात उपलब्ध आहेत. अधिक माहितीकरिता कार्यालयाच्या 020-26133606 या दूरध्वनी क्रमांकावर अथवा punerojgar@gmail.com या ईमेलवर संपर्क साधावा.
जिल्ह्यातील अधिकाधिक उमेदवारांनी या प्रशिक्षण कार्यक्रमामध्ये आपला सहभाग नोंदवावा, असे आवाहन कौशल्य विकास, रोजगार व उदयोजकता विभागाच्या सहायक आयुक्त अनुपमा पवार यांनी केले आहे.