किफायतशीर दरात उपलब्ध, प्रदूषणमुक्त आणि स्वदेशी अशा पर्यायी इंधनांचा अवलंब करा : केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी .
केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी पेट्रोल तसेच डिझेल यांचा इंधन म्हणून वापर करण्यापासून परावृत्त होण्याचा सल्ला देत आयात इंधनाला पर्याय असलेल्या, किफायतशीर दरात उपलब्ध, प्रदूषणमुक्त आणि स्वदेशी असे पर्यायी इंधन स्वीकारण्यावर भर दिला. ‘पर्यायी इंधने-भविष्यातील मार्ग’ या विषयावर इस्मा अर्थात भारतीय साखर कारखाने संघटनेने आयोजित केलेल्या परिषदेत ते बोलत होते. बायो-इथेनॉल पर्यायी इंधन म्हणून वापरण्याचा सर्वात मोठा फायदा हा आहे की ते स्वच्छ इंधन असून त्याच्या वापरामुळे अत्यंत कमी प्रमाणात हरितगृह वायूंचे उत्सर्जन होते असे त्यांनी सांगितले. बायो-इथेनॉल उत्पादनातून मिळणारे अतिरिक्त उत्पन्न थेट शेतकऱ्यांकडे वळविले जाणार असून त्यामुळे ग्रामीण आणि मागास अर्थव्यवस्थेचे सशक्तीकरण होईल असे त्यांनी सांगितले.
केंद्रीय मंत्री गडकरी म्हणाले की आपल्या देशातील इथेनॉल उत्पादन क्षमता आणि इंधन म्हणून त्याचा होत असलेला स्वीकार लक्षात घेऊन केंद्र सरकारने इंधनविषयक कार्यक्रमाची पुनर्रचना केली आणि 2025 सालापर्यंत सर्वत्र पेट्रोलमध्ये 20% बायो-इथेनॉलचे मिश्रण करून वापर होणे सुनिश्चित करण्यासाठी ई-20 इंधन कार्यक्रमाची देखील सुरुवात केली.
उपलब्ध साधनसंपत्ती वापरून इथेनॉलचे उत्पादन वाढविण्यासाठीचे मार्ग शोधण्याच्या दृष्टीने आपण सतत संशोधन करत असून बी-हेवी मळीमध्ये 15% ते 20% साखर मिसळणे हा एक मार्ग आपल्याला सापडल्याची माहिती गडकरी यांनी दिली.
अशा अनेक उपाययोजनांमुळे इथेनॉलचे उत्पादन वाढेल आणि त्यामुळे एका राज्यात अतिरिक्त प्रमाणात उत्पादित इथेनॉल ईशान्य प्रदेशातील राज्ये किंवा जम्मू-काश्मीर आणि लडाखसारख्या इथेनॉलची कमतरता असणाऱ्या इतर राज्यांना पुरविता येईल असे चित्र देखील निर्माण होईल अशी अशा केंद्रीय मंत्र्यांनी व्यक्त केली.
बायो-इथेनॉल वापराने हरितगृह वायूंचे 80% कमी उत्सर्जन शक्य असल्यामुळे तसेच कोणत्याही अतिरिक्त बदलाविना विमानांच्या पारंपरिक इंधनामध्ये 50% मिश्रण करून या इंधनाचा वापर होऊ शकल्यामुळे बायो-इथेनॉल विमानांसाठी शाश्वत इंधन म्हणून वापरता येणे शक्य आहे अशी माहिती त्यांनी दिली. भारतीय हवाई दलाने यापूर्वीच या इंधनाची चाचणी घेतली असून त्याच्या वापराला मान्यता दिली आहे. पेट्रोल/डिझेल आणि बायो-डिझेल असा लवचिकतेने इंधन वापर करणाऱ्या वाहनांच्या कार्यान्वयनानंतर लगेचच इथेनॉलची मागणी 4 ते 5 पट वाढेल असे केंद्रीय मंत्री गडकरी यांनी या प्रसंगी सांगितले.