भारतीय टपाल विभागाने स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवानिमित्त ई-पीएलआय बाँड/टपाल खात्याच्या जीवन विमा पॉलिसी च्या डिजिटल स्वरूपाची सुरुवात केली.
ई-पीएलआय बाँड डिजीलॉकरवर उपलब्ध.
केंद्रीय दळणवळण मंत्रालयाच्या टपाल विभागाने स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवानिमित्त टपाल खात्याकडून दिल्या जाणाऱ्या विमा पॉलिसीच्या कागदपत्रांचे डिजिटल स्वरूप म्हणजेच ई-पीएलआय बाँडची आज सुरुवात केली. टपाल सप्ताहामध्ये 12 ऑक्टोबर हा दिवस टपाल जीवन विमा दिवस म्हणून साजरा केला जातो. टपाल विभागाचे सचिव विनीत पांडे, टपाल विभागाचे महासंचालक आलोक शर्मा, टपाल जीवन विमा विभाग सदस्य संध्या रानी, आणि राष्ट्रीय ई-प्रशासन विभागाचे अध्यक्ष आणि मुख्य कार्यकारी अधिकारी (अतिरिक्त प्रभार) अभिषेक सिंग या कार्यक्रमाला उपस्थित होते.
ई-पीएलआय बाँडची सुरुवात करताना टपाल विभागाचे सचिव विनीत पांडे म्हणाले की ई-पीएलआय बाँड हा उपक्रम म्हणजे डिजीलॉकर सोबत टपाल विभागाचा पहिला डिजिटल एकत्रित कार्यक्रम आहे. या अर्थपूर्ण सुविधेमुळे नागरिकांना विम्याच्या कागदपत्रांची सुलभ हाताळणी तसेच दावे जलदगतीने मिळणे शक्य होईल.
केंद्रीय इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान विभागाच्या राष्ट्रीय ई-प्रशासन विभागाच्या डिजीलॉकर सुविधेशी सहकार्य स्थापित करून ई-पीएलआय बाँड सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. डिजीलॉकर सुविधेद्वारे विविध संस्थांकडून दिल्या गेलेल्या कागदपत्रांची आणि प्रमाणपत्रांची पडताळणी, साठवणूक आणि सामायिकीकारण यासाठी सुरक्षित क्लाऊड आधारित मंचाची सोय झाली आहे.
डिजीलॉकर सुविधेत सुरक्षितपणे लॉग इन करून वापरकर्त्याला मोबाईल फोनचा वापर करून विमा पॉलिसीच्या मूळ दस्तावेजाची डिजिटल नक्कल हवी तिथे उपलब्ध होऊ शकेल. टपाल जीवन विमा आणि ग्रामीण टपाल जीवन विमा अशा दोन्ही योजनांचे दस्तावेज इलेक्ट्रॉनिक स्वरुपात उपलब्ध आहेत. 8 फेब्रुवारी 2017 ला प्रसिध्द झालेल्या वैध शासन परिपत्रक क्र. 711(E) नुसार माहिती तंत्रज्ञान (डिजिटल लॉकर सुविधा पुरवठादारांकडून माहितीचे संरक्षण आणि धारण) नियम 2016 अन्वये डिजिटल स्वाक्षरी असलेले ई-पीएलआय बाँड हा वैध पुरावा मानण्यात येईल आणि पीएलआय तसेच आरपीएलआयशी संबंधित सर्व प्रकारच्या आर्थिक आणि बिगर आर्थिक कारणांसाठी पॉलिसीच्या मूळ कागदपत्रांसमान मानले जाईल.
जर वापरकर्त्याकडे टपाल आणि ग्रामीण टपाल विभागाच्या एंडॉवमेंट, होल लाइफ अशा विविध प्रकारच्या विमा पॉलिसी असतील तर टपाल विभागाने पीएलआय बाँड जारी केल्यानंतर लगेचच त्या डाऊनलोड करता येतील. पीएलआय बाँडची प्रत्यक्ष मूळ प्रत मिळण्याची वाट बघत राहण्याची आवश्यकता नाही. ही सुविधा जुन्या तसेच नवीन अशा सर्व पॉलिसीधारकांसाठी उपलब्ध आहे.
पॉलिसीची परिपक्वता रक्कम मिळण्याच्या वेळी पॉलिसीधारकाला डिजिलॉकर मोबाईल अॅपचा वापर करून टपाल कार्यालयात पॉलिसीची डिजिटल प्रत जमा करता येईल. टपाल विभागातर्फे ही डिजिटल प्रत वैध पॉलिसी दस्तावेज मानण्यात येईल. त्याचप्रमाणे, पॉलिसी दस्तावेजातील नामनिर्देशनात अथवा निवासी पत्त्यात बदल करण्यासारख्या गोष्टी देखील भौतिक प्रत जवळ न बाळगता डिजिटल माध्यमातून करता येतील आणि ते वैध मानण्यात येतील.
भारतीय टपाल विभागाच्या विमा क्षेत्रात अत्यंत आवश्यक डिजिटल परिवर्तन घडवून आणण्यासाठी टपाल विभागाने सुरक्षित सर्व्हर प्रमाणीकरण, डिजिटल स्वाक्षऱ्यांचे अंतर्भूतीकरण आणि कूटबद्ध क्यूआर संकेतांत अशा काही विशिष्ट यंत्रणा विकसित केल्या आहेत. या यंत्रणांमुळे, प्रशासनावरील ताण कमी होईल, इतकेच नव्हे तर दस्तावेजांची तत्क्षणी वास्तव आणि सुरक्षित पडताळणी शक्य होईल.
विमा दावे आणि परिपक्वता दावे यांच्या कामांसाठी नागरिकांना कार्यालयांमध्ये खेटे घालण्याचे प्रमाण कमी करण्याच्या उद्देशाने टपाल विभागाने हा उपक्रम सुरु केला आहे. या नागरिक-स्नेही वैशिष्ट्याला पूरक म्हणून टपाल विभागाचे जीवन विमा दावे कोणत्याही अडचणीविना आणि विशिष्ट कालमर्यादेत मिळण्यासाठी इतर विविध प्रशासकीय यंत्रणांची देखील सोय केली जात आहे.