पुणे विद्यापीठात स्वर्णिम विजय वर्ष मशालीचे स्वागत.
पुण्यात लष्कराच्या वतीने महिनाभर चालणाऱ्या कार्यक्रमांच्या मालिकेअंतर्गत, 14 ऑक्टोबर 2021 रोजी नामांकित पुणे विद्यापीठात स्वर्णिम विजय मशाल पोहोचली. विद्यापीठातील कर्मचारी आणि विद्यार्थी संघटनांनी विजय मशालीचे मोठ्या उत्साहात स्वागत केले. लष्कराच्या दक्षिण कमांडचे चीफ ऑफ स्टाफ लेफ्टनंट जनरल अरविंद वालिया आणि पुणे विद्यापीठाचे कुलगुरू प्राध्यापक (डॉक्टर) नितीन करमळकर यांनी विजय मशालीचे स्वागत केले. 1971च्या युद्धातील शौर्य पुरस्कार विजेत्यांच्या उपस्थितीत हा महत्त्वपूर्ण सोहळा साजरा करण्यात आला. यामध्ये ब्रिगेडियर पीएसएस राजन, कमोडोर भागवत बीपीनचंद्र भास्कर , वीरचक्र भारतीय नौदल आणि वीरनारी श्रीमती नंदा नातू – कमोडोर जयशील विश्वनाथ नातू यांच्या पत्नी आणि श्रीमती कलावती – मसाकर गोविंद शंकरराव यांच्या पत्नी यांचा समावेश होता.
जेव्हा शिक्षक कर्मचारी आणि विद्यार्थ्यांनी केलेल्या मानवी साखळीद्वारे ज्ञानेश्वर सभागृहामध्ये विजयी मशाल फिरवण्यात आली तेव्हा विद्यापीठातील वातावरण देशभक्तीने भारलेले होते. विद्यार्थी संघटनेने सादर केलेल्या शानदार सांस्कृतिक कार्यक्रमातुन भारतीय सैन्याप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यात आली. लष्कराच्या दक्षिण कमांडचे चीफ ऑफ स्टाफ लेफ्टनंट जनरल अरविंद वालिया यांनी या कार्यक्रमाला संबोधित करताना, देशासाठी सर्वोच्च बलिदान देणाऱ्या सैनिकांना श्रद्धांजली वाहिली आणि 1971 च्या युद्धातील माजी सैनिकांबद्दल कृतज्ञता व्यक्त केली.त्यानंतर कुलगुरूंनी 1971 च्या युद्धातील शौर्य पुरस्कार विजेते आणि वीर पत्नी यांचा सत्कार केला.