अनुराग ठाकूर यांनी माय पार्किंग्स (MyParkings) ॲपचा केला प्रारंभ
केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री श्री अनुराग सिंह ठाकूर यांनी आज माय पार्किंग्स (MyParkings)ॲपचा प्रारंभ केला. वाहनांचे पार्किंग ही एक कठीण समस्या आहे आणि हे ॲप, वाहने पार्किंग साठीचा ताण कमी करण्याचा आणि लोकांना त्यांच्या प्रवासाचे अधिक चांगले नियोजन करण्यात मदत करण्याचा प्रयत्न आहे. ॲपद्वारे किंवा कार्डद्वारे ‘स्मार्ट पार्किंग’ उपाययोजना हा त्रासमुक्त पार्किंगच्या दिशेने एक सोपा उपाय आहे आणि ऑनलाईन पार्किंग स्लॉटच्या नोंदणीमुळे लोकांची गैरसोय न होता त्यांना त्यांची वाहने पार्क करण्यास मदत होईल, असे श्री. अनुराग ठाकूर यांनी यावेळी सांगितले.
ॲपद्वारे मिळणाऱ्या पार्किंगच्या सोयीमुळे पार्किंगची ठिकाणे शोधण्यासाठी लागणारा वेळ कमी होईल आणि वाहनांमधून होणारे प्रदूषण कमी करण्यास मदत होईल.हे ॲप प्रत्येक भारतीयांसाठी एक यशस्वी उपाय आहे.अन्य महानगरपालिका ‘माय पार्किंग्स’ ॲपचा अनुभव घेतील आणि तत्सम उपायांचा अवलंब करतील, अशी अपेक्षा मंत्र्यांनी व्यक्त केली.
दक्षिण दिल्ली महानगरपालिका हद्दीतील सर्व अधिकृत पार्किंग डिजीटल करण्याच्या उद्देशाने, ब्रॉडकास्ट इंजिनीअरिंग कन्सल्टंट्स इंडिया लिमिटेड (बीईसीआयएल) ने दक्षिण दिल्ली महानगरपालिकेच्या सहकार्याने हे ॲप विकसित केले आहे. ही सुविधा भविष्यात संपूर्ण भारतातील इतर महानगरपालिका क्षेत्रामध्ये आणली जाईल.