छत्रपती शिवाजी महाराज मैदानावरील कायमस्वरुपी विद्युत रोषणाई प्रकल्पाचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते लोकार्पण.
मुंबई : दादरमधील ऐतिहासिक अशा छत्रपती शिवाजी महाराज मैदानावर, छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा तसेच मैदान परिसरात कायमस्वरुपी विद्युत रोषणाई करण्यात आली असून या प्रकल्पाचे लोकार्पण मुख्यमंत्री श्री. उद्धव ठाकरे यांच्या हस्ते करण्यात आले.
मुख्यमंत्री श्री.उद्धव ठाकरे यांच्या आमदार निधीतून विद्युत रोषणाईचा हा प्रकल्प साकारला आहे. मुख्यमंत्री श्री.उद्धव ठाकरे यांनी छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्यास अभिवादन केले. त्यानंतर विद्युत रोषणाई प्रकल्पाचे लोकार्पण केले. मैदान परिसरातील जीर्णोद्धार केलेल्या प्याऊचे लोकार्पण व कोनशिला अनावरण पालकमंत्री श्री.आदित्य ठाकरे यांच्या हस्ते करण्यात आले. यानंतर मुख्यमंत्री श्री. ठाकरे व सर्व मान्यवरांनी शिवसेनाप्रमुख श्रीमान बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतिस्थळास अभिवादन केले. मैदान परिसरात केलेल्या विद्युत रोषणाईमध्ये उजळून निघणाऱ्या परिसराचे अवलोकन करतानाच सर्व रोषणाई स्वयंचलित पद्धतीने व रंगीबेरंगी कशी संचालित होते, त्याची प्रत्यक्ष पाहणीही मुख्यमंत्र्यांनी केली.
छत्रपती शिवाजी महाराज मैदान परिसरातील कबड्डी असोसिएशन येथे स्थित १०० वर्षांचा वास्तूवारसा असलेल्या पुरातन प्याऊचा देखील जीर्णोद्धार करण्यात आला आहे. छत्रपती शिवाजी महाराज मैदानावर येणारे खेळाडू तसेच परिसरात येणाऱया नागरिकांना पाणी पिण्याची सुविधा म्हणून ही प्याऊ उपयोगात येणार आहे. प्याऊमधून २४ तास शुद्ध व स्वच्छ पाणी मिळेल. प्याऊच्या जीर्णोद्धारासह या सुविधेसाठी एकूण २० लाख रुपये खर्च करण्यात आला आहे.