अमेरिकेचे नौदल प्रमुख ऍडमिरल मायकेल गिल्डे यांनी पश्चिमी नौदल कमांडच्या मुंबईस्थित मुख्यालयाला भेट दिली.
अमेरिकेचे नौदल प्रमुख मायकेल गिल्डे यांच्यासह लिंडा गिल्डे आणि उच्चस्तरीय अमेरिकन शिष्टमंडळाने काल (15 Oct 21) मुंबई येथील पश्चिमी नौदल कमांडच्या मुख्यालयाला भेट दिली आणि व्हाईस ऍडमिरल आर हरी कुमार, PVSM, AVSM, VSM, ADC,फ्लॅग ऑफिसर कमांडिंग-इन-चीफ, वेस्टर्न नेव्हल कमांड आणि कर्मचाऱ्यांशी संवाद साधला. यावेळी उभय देश आणि त्यांच्या नौदलांमधील वाढत्या सहकार्याला मजबूती देण्याचे मार्ग, सागरी आव्हानांचा सामना आणि हिंद महासागर प्रदेशात (IOR) सागरी सुरक्षा सुनिश्चित करण्यासाठी सहकार्य आणि आंतर -परिचालन क्षमता वाढवणे या मुद्द्यांवर चर्चा झाली.
अमेरिकेच्या नौदल प्रमुखांना प्रादेशिक सुरक्षा गतिशीलतेचा व्यापक आढावा आणि अलिकडच्या काळात पश्चिम नौदल कमांडने विविध मोहिमांद्वारे दिलेला प्रतिसाद, विशेषत: मित्र देशांना मानवतावादी सहाय्य आणि आपत्ती निवारण (एचएडीआर) संबंधी सहाय्य पुरवणे , समुद्री चाचेगिरी विरोधात कारवाई करणे, सागरी सुरक्षा आणि क्षेत्रातील सुरक्षा वाढवणे आणि भारत-अमेरिका सहकार्यावर विशेष भर देऊन परदेशी सहकार्य मजबूत करण्याबाबत माहिती देण्यात आली. देशात ऑक्सिजनची कमतरता असताना ऑपरेशन समुद्र सेतू II राबवून भारतीय नौदलाच्या जहाजांनी कंटेनर युक्त वैद्यकीय ऑक्सिजन मायदेशी आणण्यात महत्त्वपूर्ण भूमिका बजावून कोविड -19 विरूद्ध लढाईला बळ दिल्याचे यावेळी अधोरेखित करण्यात आले.
नौदल प्रमुखांनी पश्चिमी नौदल कमांड, दक्षिणी नौदल कमांड आणि भारतीय नौदलाच्या विविध प्रशिक्षण संस्थांच्या अधिकार्यांना व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे ‘युद्धाचे भवितव्य’ या विषयावर संबोधित केले. त्यांनी माझगाव गोदीलाही भेट दिली.
लिंडा गिल्डे यांनी पश्चिमी नौदल कमांड मुख्यालयाला भेट दिली आणि भारतीय नौदलाच्या महिला अधिकाऱ्यांशी संवाद साधला.
नौदल प्रमुखांची ही भेट भारत आणि अमेरिका यांच्यातील व्यापक जागतिक धोरणात्मक भागीदारी अधिक मजबूत करण्यासाठी सातत्यपूर्ण आणि नियमित संवादामधील एक महत्वाचा कार्यक्रम होता.