भारताची भविष्यातील वृद्धि ही विज्ञानाधारित अर्थव्यवस्थेवर अवलंबून : केंद्रीय मंत्री डॉ. जितेंद्र सिंह.
भूविज्ञान मंत्रालय आयोजित आजादी का अमृत महोत्सव सप्ताहाचे केले उद्घाटन
केंद्रीय विज्ञान आणि तंत्रज्ञान राज्यमंत्री (स्वतंत्र प्रभार); भूविज्ञान (स्वतंत्र प्रभार), पंतप्रधान कार्यालय, कार्मिक, सार्वजनिक तक्रारी, पेन्शन, अणुऊर्जा आणि अवकाश राज्यमंत्री डॉ. जितेंद्र सिंह आज म्हणाले की, भारताची भविष्यातील वृद्धि ही विज्ञानाधारित अर्थव्यवस्थेवर अवलंबून आहे.
भूविज्ञान मंत्रालयाच्या वतीने आयोजित आजादी का अमृत महोत्सव सप्ताहाच्या उद्घाटन प्रसंगी “रोल ऑफ रिसर्च टेक्नॉलॉजी अँड स्टार्ट अप्स इन ब्लू इकॉनॉमी” या चर्चात्मक सत्राला संबोधित करताना डॉ. जितेंद्र सिंह म्हणाले, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्त्वाखाली भारताने स्वातंत्राचा 75 वा वर्धापनदिन साजरा केला. भारताच्या सर्वसमावेशक वृद्धीसाठी विज्ञान आणि तंत्रज्ञान हे मुख्य चलन ठरणार आहे याची प्रकर्षाने जाणीव ठेवून पुढील 25 वर्षांची योजना यानिमित्त आखल्या जात आहेत.
डॉ. जितेंद्र सिंग म्हणाले, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना विज्ञानावर आधारित घडामोडींबाबत विशेष दृष्टी आहे, ज्यामुळे सर्व वैज्ञानिक कार्यक्रमांना सामान्य माणसाच्या जीवनाशी संबंधित असलेल्या अनुप्रयोगांवर लक्ष केंद्रित करता आले आहे.
डॉ जितेंद्र सिंग म्हणाले, भारताची नील अर्थव्यवस्था ही राष्ट्रीय अर्थव्यवस्थेचा एक उपसमूह समजली जाते. ज्यामध्ये संपूर्ण महासागर संसाधने प्रणाली आणि देशाच्या कायदेशीर अधिकार क्षेत्रातील सागरी आणि सागरी किनारपट्टीच्या क्षेत्रांमध्ये मानवनिर्मित आर्थिक पायाभूत सुविधा यांचा समावेश आहे. ते म्हणाले, ही व्यवस्था अशा वस्तू आणि सेवांच्या उच्पादनामध्ये मदत करीत असते ज्यांचा आर्थिक विकास, पर्यावरणीय स्थिरता आणि राष्ट्रीय सुरक्षा यांच्याशी थेट संबंधित आहे. नील अर्थव्यवस्था ही भारतासारख्या मोठी सागरी किनारपट्टी असलेल्या राष्ट्रांसाठी सामाजिक लाभासाठी जबाबदारीने सागरी संसाधनांचा वापर करण्याची एक विस्तृत सामाजिक – आर्थिक संधी आहे, असेही मंत्र्यांनी नमूद केले.
ते म्हणाले, भारताचे महासागर हा आपला खजिना आहे आणि म्हणून मोदी सरकारने सुरू केलेले “डीप ओशन मिशन” हे “नील अर्थव्यवस्था” अधिक समृद्ध करण्यासाठी विविध संसाधनांचा वापर करण्यासाठी आणखी एका विस्तृत क्षितीजाची घोषणा करीत आहे.
वेगवेगळ्या स्तरातील भागधारकांपर्यंत पोहोचण्याच्या आवश्यकतेवर भर देत डॉ. जितेंद्र सिंह यांनी यावेळी स्मरण करून दिले की, उद्योजकतेला जोडले जाणे हे आजादी का अमृत महोत्सव कार्यक्रमाचा एक भाग आहे. त्यामुळे आजच्या कार्यक्रमात स्वदेशी स्टार्ट अप किंवा स्वनिर्मित स्टार्ट – अप सक्रीयपणे सहभागी होत आहेत, याची खात्री करणे आवश्यक आहे, असेही ते म्हणाले.