कोणत्याही अभियानाने लोकचळवळीचे रूप घेतल्यानंतरच ते अभियान यशस्वी होते आणि ते मुंबईत घडताना मला दिसत आहे: केंद्रीय युवक व्यवहार सचिव.
पुनर्वापर करता येण्याजोग्या कापडी पिशव्या जवळ बाळगल्यास एक वेळ वापरून फेकून द्यायच्या प्लास्टिक पिशव्यांवरील आपले अवलंबित्व नाहीसे होईल: बृहन्मुंबई महानगरपालिकेतर्फे स्वच्छ भारत अभियान राबविण्याच्या विशेष कर्तव्यावर असलेले अधिकारी.
केंद्रिय युवक व्यवहार आणि क्रीडा मंत्रालय तसेच नेहरू युवा केंद्र संघटनेतर्फे देशव्यापी स्वच्छ भारत अभियानाचा भाग म्हणून आज मुंबईत वांद्रे परिसरातील बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या बगीचा परिसरात स्वच्छता मोहिमेचे आयोजन करण्यात आले होते.
आज सकाळी 9 वाजता सुरु झालेल्या या स्वच्छता अभियानात केंद्रीय युवक व्यवहार आणि क्रीडा मंत्रालयाच्या सचिव उषा शर्मा आणि केंद्रीय राखीव पोलीस दल व राष्ट्रीय सेवा योजनेतील स्वयंसेवक तसेच मुंबईतील 15 महाविद्यालयांतील विद्यार्थी स्वयंसेवक सहभागी झाले होते. केंद्रीय राखीव पोलीस दल, राष्ट्रीय सेवा योजना आणि नेहरू युवा केंद्र संघटना, सरकारी प्रतिनिधी यांतील एकूण 250 स्वयंसेवकानी आजच्या अभियानात भाग घेतला.
केंद्रीय युवक व्यवहार आणि क्रीडा मंत्रालयाच्या सचिव उषा शर्मा यांनी उपस्थितांना स्वच्छता शपथ देऊन आजच्या कार्यक्रमाची सुरुवात केली.
“या अभियानाद्वारे 75 लाख किलो कचरा, विशेषतः प्लॅस्टिक कचरा संकलित करण्याचे महत्त्वाकांक्षी लक्ष्य आम्ही निश्चित केले आहे. आणि कालपर्यंत (18 ऑक्टोबर) 60 लाख किलो प्लॅस्टिक कचरा गोळा करण्यात आला असून त्याचे निर्मूलन देखील करण्यात आले आहे हे सांगताना मला अत्यंत आनंद होत आहे,” अशी माहिती त्यांनी प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींना दिली“. या कार्यक्रमाला जनसहभागातून लोक चळवळीचे रूप देणे हा आमचा मुख्य हेतू आहे,” असे त्यांनी पुढे सांगितले.
आजच्या सुटीच्या दिवशी देखील आवडीने या अभियानात भाग घेणाऱ्या स्वयंसेवकांचे प्रयत्न आणि त्यांची उर्जा यांचे कौतुक करत उषा शर्मा म्हणाल्या, “कोणत्याही अभियानाने लोकचळवळीचे रूप घेतल्यानंतरच ते अभियान यशस्वी होते आणि तेच मुंबईत घडताना मला दिसत आहे.” स्वच्छता अभियान हे केवळ एखाद्या परिसराची स्वच्छता करण्याविषयी नसून आपले पर्यावरण स्वच्छ ठेवण्याबाबत नागरिकांमध्ये जाणीव निर्माण करण्याबाबतचे अभियान आहे हे देखील त्यांनी आवर्जुन सांगितले.
प्लॅस्टिकचा वापर कमी करण्यासाठीच्या सोप्या उपाययोजनांबद्दल बोलताना बृहन्मुंबई महानगरपालिकेतर्फे स्वच्छता अभियान राबविण्याच्या विशेष कर्तव्यावर असलेले अधिकारी सुभाष साळवी यांनी सुचविले की प्रत्येकाने स्वतःजवळ पुनर्वापर करता येण्याजोगी कापडी पिशवी बाळगली तर एकदा वापरून फेकून देण्याच्या प्रकारातील प्लॅस्टिकच्या पिशव्यांवरील आपले अवलंबित्व पूर्ण नाहीसे होईल. आपले शहर आणि निवासी परिसर स्वच्छ ठेवण्यासाठी सर्वसामान्यांच्या सहभागाच्या आवश्यकतेवर देखील त्यांनी भर दिला. “मुंबई महानगरपालिकेच्या सेवेतील सुमारे 30,000 सफाई कर्मचारी मुंबई शहर स्वच्छ ठेवण्यासाठी अहोरात्र काम करत आहेत. जर मुंबईतील लोकांनी स्वच्छता राखण्यासाठी सक्रीय पाठींबा दिला तर आपण मुंबईला स्वच्छतेचा स्वर्ग बनवू शकू,” असे दळवी यांनी सांगितले.
नेहरू युवा केंद्र संघटनेने कचरा निर्मूलन आणि स्वच्छता यासाठी विशेषतः एकदा वापरून फेकून देण्याच्या प्रकारातील प्लॅस्टिकचे संकलन करून त्यावर प्रक्रिया करण्यासाठी 1 ते 31 ऑक्टोबर 2021 या कालावधीत हा देशव्यापी स्वच्छ भारत अभियान कार्यक्रम आयोजित केला आहे. एक महिना कालावधीचा हा कार्यक्रम म्हणजे केंद्रीय युवक व्यवहार आणि क्रीडा मंत्रालयाने कचरा संकलन तसेच निर्मूलन, मुख्यतः प्लॅस्टिक कचरा निर्मूलन करण्याच्या उद्देशाने 1 ऑक्टोबर 2021 रोजी सुरु केलेल्या स्वच्छ भारत अभियानाचा एक भाग आहे. अशाच प्रकारचे अभियान काल मुंबईत गेटवे ऑफ इंडियाच्या परिसरात राबविण्यात आले.
या अभियानात 50 हून अधिक स्वयंसेवक सहभागी झाले होते. भारताच्या स्वातंत्र्य प्राप्तीला 75 वर्षे पूर्ण होत असल्यानिमित्त साजऱ्या होत असलेल्या स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवा निमित्त हे अभियान हाती घेण्यात आले आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 2014 मध्ये स्वच्छता अभियानाची सुरुवात केली आणि तेव्हापासून, या संदर्भात उल्लेखनीय प्रगती झाली आहे. स्वच्छ भारत कार्यक्रम म्हणजे पंतप्रधानांच्या नेतृत्वाखाली सुरु झालेल्या उपक्रमाचा नवे लक्ष्य आणि कटिबद्धतेसह पुढे करण्यात आलेला विस्तार आहे. देशातील युवा वर्ग आणि नागरिकांचे एकत्रित प्रयत्न तसेच सर्व भागधारकांकडून मिळालेला पाठींबा यांच्या बळावर आपल्या नागरिकांचे जगणे अधिक उत्तम स्वरूपाचे करता येऊ शकते. या अभियानाच्या पहिल्या 10 दिवसांमध्येच स्वच्छ भारत कार्यक्रमांच्या आयोजनातून देशभरात 30 लाख किलो कचरा संकलित करण्यात आला हे लक्षात घेण्यासारखे आहे.