कोविड-19 महामारीदरम्यान स्वच्छतेचे महत्त्व अधोरेखित झाले आहे – केंद्रीय मंत्री श्रीपाद नाईक.
जागतिक पर्यटनस्थळाच्या नकाशावर अग्रभागी असलेल्या गोव्यात स्वच्छता राखण्याची सर्वांची जबाबदारी.
कोविड-19 महामारीदरम्यान जगभर स्वच्छतेचे महत्त्व अधोरेखित झाले आहे. त्यामुळे वैयक्तिक स्वच्छता आणि परिसर स्वच्छता ही प्रत्येक नागरिकाची जबाबदारी आहे, असे प्रतिपादन केंद्रीय पर्यटन, बंदरे, नौवहन आणि जलमार्ग राज्यमंत्री श्रीपाद नाईक यांनी केले. श्रीपाद नाईक यांच्या हस्ते नेहरु युवा केंद्राकडून बॅसिलिका ऑफ बॉम जिसस चर्च या जागतिक वारसा स्थळावर आयोजित स्वच्छता मोहिमेचे उद्घाटन करण्यात आले, त्याप्रसंगी ते बोलत होते.
गोवा हे जागतिक पर्यटनस्थळ आहे. त्यामुळे राज्यातील प्रत्येक स्थळ स्वच्छ आणि टापटीप ठेवण्याची सर्वांची जबाबदारी आहे. सार्वजनिक ठिकाणी कचरा टाकू नये, खाद्यपदार्थांची पाकिटे टाकण्यासाठी कचरापेट्यांचा वापर करावा, अशाप्रकारे साध्यासोप्या बाबींमधून आपण स्वच्छता राखू शकतो, असे श्रीपाद नाईक म्हणाले. स्वच्छता हा दैनंदिन आयुष्याचा भाग झाल्यास बरेचसे आजार आपोआप नाहीसे, होतील असेही त्यांनी सांगितले.
नेहरु युवा केंद्र आणि राष्ट्रीय सेवा योजनेच्या माध्यमातून राज्यभर 1 ऑक्टोबरपासून स्वच्छता मोहीम राबवण्यात येत आहे. यात प्रामुख्याने प्लास्टीक कचरा संकलन, ऐतिहासिक आणि प्रमुख स्थळांचे सुशोभीकरण, पारंपरिक जलस्रोतांची निगा या बाबींवर लक्ष केंद्रीत करण्यात येत आहे. राज्यात 3,809 विद्यार्थ्यांचा स्वच्छ भारत मोहिमेत सहभाग आहे.
केंद्रीय युवा व्यवहार आणि क्रीडा मंत्रालयाने क्लीन इंडिया कार्यक्रमासाठी पुढाकार घेतला आहे. देशभर 744 जिल्ह्यातील सहा लाखांपेक्षा अधिक गावांमध्ये नेहरु युवा केंद्र, राष्ट्रीय सेवा योजना आणि युथ क्लबच्या माध्यमातून मोहीम राबवली जात आहे.