शोभेची दारु व फटाके विक्री परवान्यासाठी अर्ज करण्याचे आवाहन.
पुणे : आगामी दिवाळी उत्सवानिमित्त मावळ व मुळशी तालुक्याकरीता तात्पुरत्या स्वरुपात शोभेची दारु व फटाके विक्रीचे परवाने मिळण्यासाठी 1 नोव्हेंबरपर्यंत अर्ज करण्याचे आवाहन मावळ-मुळशी उपविभागीय दंडाधिकाऱ्यांनी केले आहे. हे परवाने मावळ व मुळशी तालुक्यातील पुणे शहर पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीबाहेरील क्षेत्रासाठी असतील.
परवान्यासाठी अर्जासोबत 10 रुपयांचा कोर्ट फी स्टॅम्प लावणे आवश्यक आहे. व्यवसाय करावयाच्या जागेचा मिळकत नोंदणी उतारा अथवा जागा दुसऱ्याची असेल तर जागेचा वापर करण्यास संबंधिताचे; 100 रुपयाच्या स्टॅम्प पेपरवर केलेले संमतीपत्र, पोलीस निरीक्षक अथवा उपनिरीक्षक यांचे दंड किंवा शिक्षा झाली आहे का याबाबतचे प्रमाणपत्र, ना-हरकत प्रमाणपत्र व व्यवसायाची जागा सुरक्षित असल्याबाबतचे प्रमाणपत्र, नगरपालिका हद्दीतील स्टॉलबाबत नगर पालिकेने दुकानासाठी जागा दिल्याच्या पत्राची प्रत, मागील वर्षी तात्पुरता फटाका स्टॉल परवाना घेतला असल्यास त्याची प्रत तसेच परवाना शुल्क सहाशे रुपये शासकीय कोषागारात जमा करुन त्याचे मुळ चलन अर्जासोबत जोडावे.
शोभेची दारु व फटाके विक्रीची मुदत ही 8 नोव्हेंबर 2021 पर्यंत राहील. परवान्याची मुदत संपल्यानंतर परवाना धारकांनी शिल्लक राहिलेला माल जवळ ठेवू नये. राहिलेला माल कायम स्वरुपाचा परवाना असलेल्या परवाना धारकांजवळ ठेवणे आवश्यक आहे. उपविभागीय दंडाधिकारी, मावळ-मुळशी उपविभाग, पुणे विभागीय महसूल प्रशिक्षण प्रबोधिनी, स.नं.23, बावधन बु. ता. मुळशी (जि. पुणे) यांच्यामार्फत हे परवाने देण्यात येणार आहेत.
दुकानांच्या परिसरात सुरक्षितता बाळगा
शोभेच्या दारु आणि फटाके व साठा केलेल्या दुकानापासून 100 मीटर परिसरात कोणीही धुम्रपान करु नये, तसेच दुकानापासून 100 मीटर परिसरात कोणत्याही प्रकारचे दारुकाम करु नये, फटाके उडवू नयेत. शोभेच्या दारुचे रॉकेट परीक्षणासाठी उडवू नयेत, असे आदेशही उप विभागीय दंडाधिकारी मावळ-मुळशी यांनी दिले आहेत.