तुशील – P1135.6 युद्धनौकेचा अनावरण सोहळा.
भारतीय नौदलातील 7व्या युद्ध नौकेचे(विनाशिका) 28 ऑक्टोबर 2021 रोजी यांतर शिपयार्ड, कॅलिनीनग्राड, रशिया येथे जलावतरण करण्यात आले. यावेळी भारताचे मॉस्कोतील राजदूत डी बाला वेंकटेश वर्मा तसेच रशियन सरकारमधील वरिष्ठ मान्यवर आणि भारतीय नौदलाचे अधिकारी उपस्थित होते. या कार्यक्रमात या युद्ध नौकेचे ‘तुशील’ असे डाल्टा विद्या वर्मा यांनी औपचारिक नामकरण केले. तुशील हा संस्कृत शब्द असून त्याचा अर्थ संरक्षक ढाल असा आहे.
भारत आणि रशिया यांच्यात झालेल्या करारानुसार प्रोजेक्ट 1135.6 प्रकारच्या दोन युद्ध नौकाची बांधणी रशियात तर दोन युद्ध नौकाची बांधणी भारतात गोवा शिपयार्ड लिमिटेड येथे होणार आहे. भारत आणि रशियामध्ये दोन युद्ध नौका बांधणीसाठीचा करार 18 ऑक्टोबर रोजी करण्यात आला. युद्धाच्या तीनही प्रकारात – हवा, जमीन आणि जल – यासाठी भारताच्या विशेष गरजा लक्षात घेऊन या युद्ध नौकांची बांधणी होत आहे. भारत आणि रशियाच्या अत्याधुनिक शस्त्र आणि सेन्सर्सचा शक्तिशाली मिलाप यामुळे या युद्ध नौका समुद्राच्या किनाऱ्यावर तसेच खोल समुद्रात वापरता येतील. या नौका स्वतंत्रपणे तसेच नौसेनेच्या कृतीदलाचा भाग म्हणून देखील वापरल्या जाऊ शकतात. या नौकांमध्ये “विनाशिक तंत्रज्ञान” असल्याने त्या रडारच्या टप्प्यात येत नाहीत तसेच त्यांचा पाण्याखाली होणारा आवाज देखील कमी होतो. या नौकांवर मुखत्वे भारतातून पुरविण्यात आलेली, जमिनीवरून जमिनीवर मारा करणारी क्षेपणास्त्रे, सोनार व्यवस्था, जमीनीवर लक्ष ठेवण्यासाठी टेहळणी रडार, दळणवळण कक्ष आणि ASW व्यवस्था आहेत. त्याबरोबरच रशियन बनावटीची जमिनीवरून हवेत मारा करणारी क्षेपणास्त्रे आणि बंदूकीचे स्टँड बसविले आहेत.
यांतर शिपयार्ड, कॅलिनीनग्राडचे महासंचालक इल्या समारीन, यांनी आपल्या भाषणात युद्ध नौका बांधणीच्या किचकट प्रकल्पांना भेडसावणाऱ्या समस्यांचा उहापोह केला. जागतिक महामारीची आव्हाने असतांनाही जहाजांची निर्मिती सातत्याने सुरु राहिली. भारत सरकारने जहाज बांधणी प्रकल्प योग्य वेळेत अंमलबजावणी करण्यासाठी दिलेल्या पाठींब्याबद्दल, त्यांनी सरकारचे आभार मानले. भारताचे रशियातील राजदूत, बाला व्यंकटेश वर्मा यांनी यावेळी भारत आणि रशिया यांच्यातील लष्करी तंत्रज्ञान सहकार्याच्या दीर्घ परंपरेचे आवर्जून स्मरण केले.कोविड-19 ची आव्हाने असतांनाही, हे जहाज , करारातील निश्चित वेळेनुसार, पूर्ण व्हावे, यांसाठी ‘यांतर शिपयार्डाने’ घेतलेल्या परिश्रमांचाही त्यांनी उल्लेख केला.