पालखी महामार्गाच्या दोन्ही बाजूला वारकऱ्यांसाठी सुविधा निर्माण कराव्यात – प्रधानमंत्री नरेंद्र मोदी.

Prime Minister Narendra Modi.

पालखी महामार्गाच्या दोन्ही बाजूला वारकऱ्यांसाठी सुविधा निर्माण कराव्यात – प्रधानमंत्री नरेंद्र मोदी.

पंढरपूर :- संत ज्ञानेश्वर व संत तुकाराम पालखी महामार्गाची लांबी अनुक्रमे 231 व 130 किलोमीटर इतकी असून यासाठी एकूण 12 हजार कोटीच्या निधीची तरतूद करण्यात आलेली आहे. या दोन्ही पालखी महामार्गाच्या बाजूला पंढरपूरला जाणाऱ्या वारकऱ्यांसाठी विशेष मार्ग तयार करावा व या महामार्गावर वारकऱ्यांसाठी आवश्यक विविध सोयी-सुविधा निर्माण कराव्यात, असे आवाहन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी केले. Prime Minister Narendra Modi.

पंढरपूर येथे केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्रालय, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण व सार्वजनिक बांधकाम विभाग, महाराष्ट्र राज्य यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित 13 विविध महामार्ग प्रकल्पाच्या कामांचे भूमिपूजन व लोकार्पण प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते रिमोटचे कळ दाबून आभासी प्रणालीद्वारे करण्यात आले; त्याप्रसंगी ते बोलत होते. यावेळी राज्यपाल भगत सिंह कोश्यारी, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हेही आभासी प्रणालीद्वारे उपस्थित होते. तर व्यासपीठावर केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितिन गडकरी, केंद्रीय रस्ते वाहतूक राज्यमंत्री व्ही. के. सिंह, केंद्रीय वाहतूक मंत्रालयाचे सचिव गंगाधर अरमाने, विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडवणीस, सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री दत्तात्रय भरणे व अन्य मान्यवर उपस्थित होते.

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी म्हणाले की, या पालखी महामार्गामुळे या भागातील विकासाला गती मिळण्याबरोबरच दक्षिण भारताशीही चांगला संपर्क निर्माण होणार आहे. या महामार्गाच्या दोन्ही बाजूला वारकऱ्यांसाठी विशेष मार्ग बनवले जाणार असून या मार्गावर वारकऱ्यांसाठी विविध सोयी-सुविधा निर्माण केल्या जाव्यात. पंढरपूरच्या वारीला अनेक वर्षांची परंपरा असून या ठिकाणी भरणारी यात्रा ही सर्वात मोठी यात्रा आहे. शेकडो वर्षाची गुलामी, नैसर्गिक आपत्तीमध्येही वारी सुरूच होती. आजही अविरत सुरु आहे. या वारीमध्ये कोणत्याही प्रकारचा भेदभाव केला जात नसून ही जगाला समानतेचा संदेश देणारी ही वारी असून या ठिकाणी प्रत्येक वारकरी हा समान असतो असे त्यांनी सांगितले.

केंद्र शासनाकडून देशभरात मोठ्या प्रमाणावर महामार्गाची निर्मिती केली जात असून प्रत्येक गाव व खेडे रस्त्यांनी जोडण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. त्याच अनुषंगाने दक्षिणेची काशी असलेल्या पंढरीलाही पालखी महामार्गाने जोडले जाऊन विकासाच्या मुख्य प्रवाहात आणले जाणार आहे. या रस्त्यामुळे सांस्कृतिक प्रगतीबरोबरच या भागाच्या विकासाला अधिक चालना मिळून येथे धार्मिक पर्यटन मोठ्या प्रमाणावर वाढेल. रोजगार निर्मितीही होणार असल्याने हे मार्ग म्हणजे विकासाचा नवा प्रवाह असल्याचे प्रतिपादन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी करून पंढरीची वारी ही स्त्री पुरुष समानतेचे प्रतिक असल्याचेही त्यांनी म्हटले.

यावेळी प्रधानमंत्री मोदी यांनी या भागातील नागरिकांकडून पालखी महामार्गाच्या दोन्ही बाजूला सावली देणारे वृक्ष लावणे, पालखी मार्गावर शुद्ध पाण्याची व्यवस्था करणे व भविष्यात पंढरपूर हे भारतातील सर्वात स्वच्छ तीर्थक्षेत्र झाले पाहिजे यासाठी प्रयत्न करण्याचे आवाहन केले. तसेच येथील जनसमुदायाशी काही वेळ मराठी भाषेतूनही त्यांनी संवाद साधला.

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *