भारत आणि अमेरिका यांच्यात 11 वी संरक्षण तंत्रज्ञान आणि व्यापार पुढाकार गट आभासी बैठक.
मुख मुद्दे:
- संरक्षण तंत्रज्ञान सहकार्यावरील संवाद मजबूत करण्यासाठी सुधारित उद्दिष्टाच्या विधानावर दोन्ही देशांच्या गटाची सहमती
- हवाई प्रणाली सह कार्यकारी गटाअंतर्गत मानवरहित हवाई वाहनाच्या प्रक्षेपणासाठी पहिला प्रकल्प करार
- विशिष्ट तंत्रज्ञानाच्या विकासास प्रोत्साहन देण्यासाठी संरक्षण उद्योग सहयोग मंच आभासी प्रदर्शन आयोजित
- संरक्षण उपकरणांचे सह-उत्पादन आणि सह-विकासासाठी संधी निर्माण करणे, हे डीटीटीआय गटाचे उद्दिष्ट
भारत आणि अमेरिका (यूएस) यांच्यातील 11 वी संरक्षण तंत्रज्ञान आणि व्यापार पुढाकार (डीटीटीआय) गटाची बैठक 09 नोव्हेंबर 2021 रोजी आभासी पद्धतीने आयोजित करण्यात आली होती. या बैठकीचे सह-अध्यक्षपद भारत सरकारच्या संरक्षण मंत्रालयातील सचिव (संरक्षण उत्पादन) राज कुमार आणि अमेरिकेच्या संरक्षण विभागात अधिग्रहण आणि स्थैर्य यासाठीचे पीटीडीओ अंडर सेक्रेटरी ऑफ डिफेन्स ग्रेगरी कौसनर यांनी भूषवले.
डीटीटीआय गटाच्या बैठका साधारणपणे वर्षातून दोनदा होतात. मात्र कोविड-19 महामारीमुळे ही बैठक सलग दुसऱ्यांदा व्हिडिओ टेलिकॉन्फरन्सिंगद्वारे आयोजित करण्यात आली.
द्विपक्षीय संरक्षण व्यापार संबंधांमध्ये निरंतर नेतृत्व लक्ष केंद्रित करणे आणि संरक्षण साधनांचे सह-उत्पादन आणि सह-विकासासाठी संधी निर्माण करणे हे डीटीटीआय समूहाचे उद्दिष्ट आहे. डीटीटीआयअंतर्गत जमीन, नौदल, हवाई आणि विमानवाहू तंत्रज्ञानावर लक्ष केंद्रित करणारे चार संयुक्त कार्यकारी गट त्यांच्या क्षेत्रातील परस्पर सहमती असलेल्या प्रकल्पांना चालना देण्यासाठी स्थापन करण्यात आले आहेत. या गटांनी सह-अध्यक्षांना चालू गतिविधी आणि सहयोगी संधींबद्दल अहवाल दिला, ज्यात अनेक नजीकच्या मुदतीचे प्रकल्प प्राधान्याने पूर्ण करण्याचे लक्ष्य आहे.
डीटीटीआयचे यश प्रदर्शित करण्याच्या वचनबद्धतेचा पुरावा म्हणून, सह-अध्यक्षांनी सुधारित आशयाच्या निवेदनावर सहमती दर्शविली ज्यामध्ये पुढील हेतू जाहीर करण्यात आला आहे. तो असा आहे, ”डीटीटीआयच्या अनेक विशिष्ठ प्रकल्पांमध्ये तपशीलवार नियोजन करून आणि उल्लेखनीय प्रगती करून संरक्षण तंत्रज्ञान सहकार्याबाबत संवाद मजबूत करणे. ”
सप्टेंबर 2020 मध्ये डीटीटीआय गटाच्या शेवटच्या बैठकीनंतर संयुक्त कार्यकारी गट हवाई प्रणाली अंतर्गत मानवरहित हवाई वाहनासाठीच्या प्रक्षेपणासाठी पहिल्या प्रकल्प करारावर स्वाक्षरी करण्यात आली. डीटीटीआयसाठी हे मोठे यश असून त्याबाबत सह-अध्यक्षांनी आनंद व्यक्त केला.
डीटीटीआय गटाअंतर्गत अमेरिकी आणि भारतीय उद्योगांना विशिष्ट तंत्रज्ञान विकसित करण्यासाठी प्रोत्साहन देण्याकरिता, संरक्षण उद्योग सहयोग मंच (डीआयसीएफ) आभासी प्रदर्शन 08 नोव्हेंबर 2021 रोजी आयोजित करण्यात आले होते. संयुक्त सचिव (संरक्षण उद्योग प्रोत्साहन) अनुराग बाजपेयी आणि औद्योगिक धोरणासाठीचे डेप्युटी असिस्टंट सेक्रेटरी ऑफ डिफेन्स, जेसी सालाझार यांनी डीआयसीएफचे संयोजन केले होते. हा मंच भारतीय आणि अमेरिकी उद्योगांना डीटीटीआयमध्ये थेट सहभागी होण्याची संधी देतो आणि औद्योगिक सहकार्यावर परिणाम करणाऱ्या मुद्द्यांवर सरकार आणि उद्योग क्षेत्र यांच्यात संवाद साधण्यास मदत करतो. चर्चेच्या फलिताबाबत डीटीटीआय गटाच्या सह-अध्यक्षांना माहिती देण्यात आली.