अखिल भारतीय सहकारी सप्ताहानिमित्त विशेष चर्चासत्र.
सामूहिक हिताला प्राधान्य दिल्यास सहकार क्षेत्राची वाढ.
– विद्याधर अनास्कर.
पुणे : व्यक्तिगत हितापेक्षा सामूहिक हिताला प्राध्यान्य देणे सहकार क्षेत्राच्या वाढीसाठी लाभदायक ठरेल, असे मत महाराष्ट्र राज्य सहकारी परिषदेचे अध्यक्ष विद्याधर अनास्कर यांनी व्यक्त केले.
सहकार नेते खासदार गुलाबराव पाटील यांच्या जन्मशताब्दीनिमित्त महाराष्ट्र राज्य सहकारी संघामार्फत एस.एम.जोशी सभागृहात ‘सहकारातून समृद्धी’ या विशेष चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले होते. अखिल भारतीय सहकार सप्ताहांतर्गत आयोजित या कार्यक्रमात ते बोलत होते. पुणे जिल्हा नागरी सहकारी बँक असोसिएशनचे अध्यक्ष ॲड.सुभाष मोहिते हे कार्यक्रमाच्या अध्यक्षपदी होते. माजी महापौर अंकुश काकडे, महाराष्ट्र राज्य सहकारी सहकारी संघाचे उपाध्यक्ष हिरामण सातकर आदी यावेळी उपस्थित होते.
श्री.अनास्कर यावेळी म्हणाले, समान गरजा आणि उद्दिष्टांच्या पूर्ततेसाठी व्यक्ती जेव्हा एकत्र येतात तेव्हा सहकाराची निर्मिती होते. आता सहकार क्षेत्र एका स्थित्यंतरातून जात असून त्यात काळाप्रमाणे बदल करणे आवश्यक आहे. आर्थिक वृद्धीसाठी बँकांनी व्यवस्थापनात कॉर्पोरेट क्षेत्राप्रमाणे अत्याधुनिकता आणणे आवश्यक आहे.
ॲड.मोहिते म्हणाले, सहकारी कार्यकर्त्यांनी सहकारासाठी एकत्र येऊन काम करणे गरजेचे आहे. सहकारातील दुर्गुण बाजूला सारून त्यातील चांगल्या बाबी वाढविण्याकडे अधिक लक्ष दिले पाहिजे. सहकार चळवळीसाठी एक ध्येय समोर ठेऊन सर्वांनी काम केल्यास या चळवळीला गती मिळेल.
कार्यक्रमात श्री.काकडे, श्री.सातकर, दि कॉसमॉस को-ऑप. बँकेचे संचालक डॉ. मुकुंदराव अभ्यंकर, अध्यक्ष मिलिंद काळे, विश्वेश्वर सहकारी बँकेचे ज्येष्ठ संचालक सुनिल रुकारी यांनी मनोगत व्यक्त केले.
यावेळी विश्वेश्वर सहकारी बँकेचे अध्यक्ष अनिल गाडवे, महाराष्ट्र राज्य सहकारी संघाच्या मुख्य कार्यकारी अधिकारी सोनाली रावल- ठाकूर आदी उपस्थित होते. जयराम देसाई यांनी सूत्रसंचालन आणि पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रतापसिंह चव्हाण यांनी आभार प्रदर्शन केले.