सरकार एव्हीजीसी साठीच्या राष्ट्रीय उत्कृष्टता केंद्राच्या निर्मितीसाठी कार्यरत आहे

सरकार एव्हीजीसी अर्थात अॅनिमेशन, व्हिजुअल इफेक्टस, गेमिंग आणि कॉमिक्ससाठीच्या राष्ट्रीय उत्कृष्टता केंद्राच्या निर्मितीसाठी कार्यरत आहे : अपूर्व चंद्र.

प्रसारभारतीच्या सहकार्याने सीआयआय अर्थात भारतीय उद्योग महासंघाने आयोजित केलेल्या सीआयआय बिग पिक्चर शिखर परिषदेच्या 10 व्या भागाची आज 17 नोव्हेंबरला आभासी पद्धतीने शानदार सुरुवात झाली. ट्राय अर्थात भारतीय दूरसंचार नियामक मंडळाचे अध्यक्ष डॉ. पी.डी. वाघेला यांनी डिजिटल माध्यमांच्या ताकदीची प्रशंसा करून उद्योग जगताला देशातील 100 टक्के घरांमध्ये टीव्ही पोहोचेल याची सुनिश्चिती करण्याचा सल्ला दिला. साहित्य, सर्जकता आणि अभिनव शोध यांच्या बाबतीत नव्या क्षितिजांचा शोध  ही या परिषदेची संकल्पना आहे.

या कार्यक्रमाच्या उद्घाटनपर सत्रात बोलताना केंद्रीय माहिती आणि प्रसारण सचिव अपूर्व चंद्र यांनी भारताच्या माध्यम आणि करमणूक उद्योगाचा परीघ वाढवून परदेशात त्याचा विस्तार करण्याचा मनोदय जाहीर केला. ते पुढे म्हणाले की, प्रसारण सेवा पोर्टलच्या निर्मितीमुळे या क्षेत्रातील विविध भागधारकांना प्रसारण क्षेत्रासाठी कार्यक्षम आणि पारदर्शक कार्यपद्धती देऊ करणारी एककेन्द्री सुविधा प्राप्त झाली आहे. केंद्र आता एव्हीजीसी अर्थात अॅनिमेशन, व्हिजुअल इफेक्टस, गेमिंग आणि कॉमिक्स साठीच्या राष्ट्रीय उत्कृष्टता केंद्राच्या निर्मितीसाठी कार्यरत आहे आणि चित्रपट सुविधा कार्यालय , रंगभूमी सुरु करण्याबाबतच्या परवानग्या मिळवण्यासाठी मदत करत आहे. सर्व प्रकारच्या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवांमध्ये सहभागी होण्यासोबतच भारत 2022 सालापासून अॅनिमेशन, गेमिंग आणि व्हिजुअल इफेक्टस संदर्भातील आंतरराष्ट्रीय महोत्सवांमध्ये देखील भाग घेणार आहे असे अपूर्व चंद्र यांनी सांगितले. माध्यम आणि करमणूक उद्योगातील एव्हीजीसी क्षेत्राचा वाढता वाटा आहे याची जाणीव चंद्र यांनी उपस्थितांना करून दिली.

अत्यंत कमी प्रमाणात नियामकाची आणि अधिक प्रमाणात सुविधादात्याची भूमिका बजावण्याची सरकारची इच्छा आहे असे चंद्र यांनी पुढे सांगितले. गेल्या 20 वर्षांच्या काळात या उद्योगाची भरघोस वाढ झाली असून लवकरच आपण 100 अब्ज अमेरिकी डॉलर्सचा उद्योग होण्याच्या ध्येयापर्यंत पोहोचू असे ते म्हणाले.

भारतीय माध्यमे आणि करमणूक उद्योग आता देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर आर्थिक विकासाचा महत्त्वाचा प्रेरक म्हणून रुपांतरीत होत आहे, तसेच हा उद्योग लोकसंख्येच्या लक्षणीय भागाला रोजगार देखील पुरवत असून आता हा उद्योग भारतीय अर्थव्यवस्थेच्या केंद्रस्थानी आहे.

संग्रहित सामग्रीचे आधुनिक पद्धतीच्या सामायिक करता येण्याजोग्या स्वरुपात रूपांतरण करून सरकारी प्रसारण संस्था घेत असलेल्या साहित्य, सर्जकता आणि अभिनव शोध यांच्यासंदर्भातील नव्या क्षितिजांच्या शोधांबाबत  प्रसार भारतीचे मुख्य कार्यकारी अधिकारी शशी शेखर वेम्पती या कार्यक्रमात विस्ताराने बोलले. टीव्ही आणि रेडीओ यांच्या सामग्रीचे तंत्रज्ञानाच्या माध्यमातून रूपांतरण ही भविष्यकाळाची मागणी आहे असे ते म्हणाले.

भारतीय माध्यम आणि मनोरंजन क्षेत्राला प्रोत्साहन देण्यासाठी धोरणात्मक उपक्रमांवर लक्ष केंद्रित करून भारताने स्वतःसाठी निश्चित केलेले 100 अब्ज अमेरिकी डॉलर्सच्या उलाढालीचे उद्दिष्ट गाठण्यासाठी सशक्त आणि समग्र वातावरण निर्माण करून  सीआयआय बिग पिक्चर शिखर परिषदेच्या 10 व्या भागाने मनोरंजन उद्योगातील सर्व भागधारकांना एकत्र येण्यासाठीचा मंच उपलब्ध करून दिला आहे.

दरवर्षी प्रमाणेच या दोन दिवसीय शिखर परिषदेत माध्यम आणि मनोरंजन उद्योगाचा एकूण पसारा सामावून घेणारी अनेक चर्चासत्रे होणार आहेत. यामध्ये प्रसारण आणि टेलीव्हिजन, ओटीटी, चित्रपट, अॅनिमेशन आणि व्हिजुअल इफेक्टस, गेमिंग, जाहिरात क्षेत्र, बातम्या आणि प्रकाशने यांचा समावेश आहे. या क्षेत्राच्या समोर असलेल्या सामायिक समस्या आणि प्रत्येक घटकाच्या विशिष्ट समस्या अशा दोन्हींवर या चर्चासत्रांमध्ये  विचारविनिमय होईल.

जाणीव आणि संवेदनशीलता यांसारख्या घटकांमध्ये योग्य समतोल साधणे, नवी उंची गाठण्यासाठी धोरण, उद्योगातील प्रतिभेची समस्या आणि त्याची टंचाई कमी करण्यासाठीचे मार्ग, माध्यम आणि मनोरंजन क्षेत्रातील क्लाऊड तंत्रज्ञानाचे वाढते महत्त्व, टेलीव्हिजन साठी दूरदृष्टी, रंगभूमीचे भविष्य, डिजिटल माध्यमांचे डिजिटल भरणा मार्ग, ओटीटी हा टेलीव्हिजनचा नवा चेहेरा, प्रादेशिक साहित्याची ताकद, एव्हीजीसी आणि ई-क्रीडा यांचे मूल्य वर्धन यासारख्या मुद्द्यांवर 80 हून अधिक वक्ते चर्चा करतील.तसेच प्रकाशक अप्रकाशित आणि संग्रहित सामग्रीच्या सोन्याच्या खाणी दडवून बसले आहेत का याची चर्चा करतील.

माध्यम आणि मनोरंजन यासंदर्भातील सीआयआय राष्ट्रीय समितीचे अध्यक्ष आणि देशातील व्यवस्थापक, वॉल्ट डिस्ने कंपनी (भारत) आणि स्टार इंडिया यांचे अध्यक्ष के. माधवन यांनी सीआयआयची भारतातील माध्यम आणि मनोरंजन उद्योगाची विस्तृत कार्यकक्षा समजावून दिली.

सिद्धार्थ रॉय कपूर यांनी सांगितले कि जर कोरिया त्यांच्या के-पॉप संस्कृतीच्या माध्यमातून जगावर राज्य करू शकतो तर चित्रपट आणि मनोरंजन क्षेत्राचा 100 वर्षांचा इतिहास असलेल्या भारताला अशाच प्रकारे जग पादाक्रांत करणे अशक्य नाही.

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *