राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीला मुख्यमंत्र्यांची ऑनलाईन उपस्थिती.
मुंबई : आज सह्याद्री अतिथीगृह येथे झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची ऑनलाईन उपस्थिती होती. मुख्यमंत्री हे एच.एन.रिलायन्स रुग्णालयातून दूरदृश्य प्रणालीद्वारे सहभागी झाले होते. बैठकीच्या प्रारंभी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सर्वांच्या वतीने मुख्यमंत्र्यांना शुभेच्छा दिल्या.
यावेळी मुख्यमंत्र्यांनी आपल्या भावना देखील व्यक्त केल्या. ते म्हणाले की, या आजारपणात आपण सर्वजण सहकार्य करीत आहात त्यासाठी मनापासून धन्यवाद. शस्त्रक्रियेनंतर डॉक्टरांच्या देखरेखीखाली फिजीओथेरपी व्यवस्थित सुरू आहे, असेही ते म्हणाले.
यावेळी मंत्रिमंडळ बैठकीत कोविड परिस्थिती, लसीकरण, पीक पाणी परिस्थिती आदी विषयांवर चर्चा झाली. परिवहन मंत्री अनिल परब यांनी एसटी संपासंदर्भात राज्य शासनाने उचललेल्या पावलांची माहिती मंत्रीमंडळास दिली.
कोविड परिस्थिती युरोपमध्ये बिकट होत असून आपण देखील महाराष्ट्रात पुरेशी आवश्यक ती काळजी घेण्याची गरज आहे, कमी लसीकरण झालेल्या जिल्ह्यांत लवकरात लवकर लसीकरण पूर्ण करावे तसेच चाचण्या वाढवाव्यात. कोविडचा धोका पूर्णपणे गेलेला नाही त्यामुळे आरोग्याचे नियम पाळण्यासाठी सर्वानी कसोशीने प्रयत्न केले पाहिजेत यावर चर्चा झाली.