जागतिक आरोग्य संघटनेच्या अहवालानुसार कोविड-19 च्या नव्या ओमायक्रोन प्रकाराच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने सार्वजनिक आरोग्य विषयक सज्जतेविषयी राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांचा घेतला आढावा.
राज्यांनी ‘टेस्ट, ट्रॅक आणि ट्रीट’ धोरणावर पुन्हा भर देण्याचा केंद्राचा सल्ला
ओमायक्रोन विषाणू आरटीपीसीआर आणि आरएटी चाचण्यांमधून लक्षात येत असल्यामुळे कोणत्याही प्रकारे हयगय न करता चाचण्यांचे प्रमाण वाढविण्याचा राज्यांना सल्ला
वेळेवर आणि प्रभावी व्यवस्थापनासाठी नवीन स्थाने आणि विषाणू प्रसार होण्याची संभाव्य स्थाने यावर करडी नजर ठेवण्यात यावी
आवश्यक असणाऱ्या पायाभूत सुविधांची पुरेशी उपलब्धता, औषंधाचा पुरेसा साठा गृह विलगीकरण केले जात असल्याची खात्री करून घेण्याचा राज्यांना सल्ला
सर्व कोविड -19 पॉझिटिव्ह नमुने जनुकीय क्रमनिर्धारणासाठी आयएनएसएसीओजी प्रयोगशाळेत पाठविण्याचे निर्देश
राज्य प्रशासन, बीओआय, एपीएचओ यांच्यामध्ये प्रभावी आणि नियमित समन्वय ठेवण्यावर भर देण्याची आवश्यकता
‘हर घर दस्तक’ लसीकरण आता मोहीम 31 डिसेंबरपर्यंत चालणार असून संपूर्ण लसीकरणावर लक्ष केंद्रीत करण्यात येणार
जागतिक आरोग्य संघटनेच्या अहवालानुसार कोविड-19 च्या नव्या ओमायक्रोन प्रकाराच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने सार्वजनिक आरोग्य विषयक सज्जतेविषयी राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांचा आढावा घेतला. केंद्रीय आरोग्य सचिव राजेश भूषण यांच्या अध्यक्षतेखाली ही उच्च स्तरीय बैठक झाली. नवीन ओमायक्रोन विषाणूची बाधा झालेले रूग्ण काही देशात सापडले आहेत. त्यामुळे आपल्या देशामध्ये सतर्क राहण्याची आवश्यकता असल्याचे या बैठकीत सांगण्यात आले. यावेळी नीति आयोगाचे आरोग्य सदस्य डॉ. व्ही.के. पॉल उपस्थित होते.
या बैठकीमध्ये ग्राहक व्यवहार मंत्रालयाचे सचिव राजीव बन्सल, आयसीएमआरचे डॉ. बलराम भार्गव, संचालक डॉ. सुजीत के. सिंग, परराष्ट्र व्यवहार खात्याचे प्रतिनिधी, राज्य हवाई सार्वजनिक आरोग्य अधिकारी आणि इतर राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांचे संबंधित वरिष्ठ अघिकारी सहभागी झाले होते.
कोविड-19 चा नवीन प्रकार लक्षात घेऊन केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने सुधारित मार्गदर्शक तत्वे आणि सल्ले राज्यांना सामायिक केले आहेत. याचा पुनरूच्चार करून केंद्रीय आरोग्य सचिवांनी राज्यांनी आता ढिलाई देवून उपयोग नाही. आपल्या राज्यांत येणा-या आंतरराष्ट्रीय प्रवाशांवर कडक नजर ठेवण्याचा सल्ला दिला आहे. विमानतळे, बंदरे आणि रस्ते मार्गांनी सीमा ओलांडून देशात अनेक जण येतात, त्यांच्यावर करडी नजर ठेवण्याचा सल्ला देण्यात आला आहे.
राज्यांना देण्यात आलेल्या विशेष सूचना –
1.आंतरराष्ट्रीय प्रवाशांचे निरीक्षणाचे काम प्रभावीपणे करावे – ज्या देशांमध्ये या विषाणूचा प्रसार झाला आहे, त्या देशांमधून येणा-या सर्व प्रवाशांना ‘जोखीम असलेले’ प्रवासी समजून त्या सर्व प्रवाशांचे पहिल्या दिवशी चाचणीसाठी नमूने घेतले जावेत. तसेच त्यांची आठव्या दिवशी पुन्हा एकदा चाचणी करणे गरजेचे आहे. ‘जोखीम असलेल्या’ देशातल्या आंतरराष्ट्रीय प्रवाशांच्या आरटी-पीसीआर चाचणीचा अहवाल येईपर्यंत त्यांना विमानतळावर थांबण्याची व्यवस्था करावी. ज्या प्रवाशांना देशात आल्यानंतर त्याला जोडूनच विमानाने जावे लागणार असेल (कनेक्टिंग विमानाने प्रवास करायचा असेल ) तर त्यांनी आधी तिकीट काढू नये असा सल्ला देण्यात आला आहे.
2.जनुकीय क्रमनिर्धारण तपासण्यासाठी सर्व पॉझिटिव्ह नमुने आयएनएसएसीओजी प्रयोगशाळेत त्वरित पाठविण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. राज्यांनी पॉझिटिव्ह व्यक्तींच्या संपर्कांतील व्यक्तींची माहिती जमा करण्याचे आणि 14 दिवस त्याचा पाठपुरावा करण्याचे काम हाती घेण्यास सांगितले आहे.
3.चाचण्यांची व्याप्ती वाढविणे – चाचणीच्या पायाभूत सुविधा मजबूत करण्यात याव्यात आणि चाचणीच्या मार्गदर्शक तत्वांची काटेकोर अंमलबजावणी करण्यात यावी. आरटी-पीसीआरचा गुणोत्तर लक्षात घेवून प्रत्येक जिल्ह्यांमध्ये पुरेशा चाचण्या होत असल्याचे सुनिश्चित करावे.
4.रोगाचा प्रसार होणारी स्थाने -हॉटस्पॉटस्चे प्रभावी निरीक्षण – अलिकडच्या काळामध्ये पॉझिटिव्ह प्रकरणे ज्या भागातून जास्त आहे, त्या क्षेत्रांचे वरचेवर निरीक्षण करण्यात यावे. जनुकीय क्रमनिर्धारण यासाठी सर्व नमूने ताबडतोब आयएनएसएसीओजी प्रयोगशाळेत पाठविण्याचे निर्देश
5.‘जोखीम असलेल्या’देशातून आलेल्या प्रवाशांच्या निवासीस्थानी प्रत्यक्ष भेट देऊन ‘गृह विलगीकरणाची प्रभावी पालन केले जात आहे की नाही, याचे नियमित निरीक्षण करणे. तसेच आठव्या दिवशी चाचणीनंतर निगेटिव्ह आलेल्या प्रवाशांची माहितीही राज्य प्रशासनाच्या प्रत्यक्ष देखरेखी खाली घेतली जावी.
6. आरोग्य विषयक पायाभूत सुविधांमध्ये वाढ सुनिश्चित करणे – आरोग्य विषयक पायाभूत सुविधांची व्याप्ती वाढविण्यासाठी तयारी सुनिश्चित करण्यात यावी. (यामध्ये अतिदक्षता विभाग, ऑक्सिजनसुविधेची खाट, व्हँटिलेटर इत्यादींची उपलब्धता) ईसीआरपी-दोन लागू करणे, ग्रामीण भाग आणि बालरूग्णांवर लक्ष केंद्रीत करणे, औषधे, ऑक्सिजन सिलेंडर यांचा पुरवठा विनाखंड होईल हे सुनिश्चित करणे तसेच मंजूर झालेल्या पीएसए प्रकल्पांचे काम लवकर सुरू करणे.
7. सर्व आंतरराष्ट्रीय प्रवाशांच्या तपशीलांसह पॉझिटिव्ह प्रवाशांच्या सूचीसाठी सर्व एपीएचओ यांच्याबरोबर समन्वय साधणे आणि सर्वांवर पाळत ठेवण्यासाठी त्यांच्याबरोबर चांगले सहकार्य ठेवणे.
8. राज्य प्रशासन, इमिग्रेशन अधिकारी, एपीएचओ, बंदर आरोग्य अधिकारी आणि लँड बॉर्डर क्रॉसिंग ऑफिसर (एलबीसीओ) यांच्यामध्ये प्रभावी आणि योग्यवेळी समन्वयावर भर देणे.
9. नवीन मार्गदर्शक तत्वांची अंमलबजावणी आज मध्यरात्रीपासून होत आहे. आंतरराष्ट्रीय प्रवाशांसाठी ही तत्वे लागू करतानाच त्यांची अंमलबजावणी सुरळीत होणे सुनिश्चित करण्यासाठी बीओआय अर्थात इमिग्रेशन विभाग , एपीएचओ, पीएचओ आणि इतर संबंधित अधिका-यांसमवेत बैठका घेण्याचा सल्ला देण्यात आला आहे.
10. देशात होणाऱ्या कोविड प्रसाराचा मागोवा घेण्यासाठी राज्यांनी पाठत ठेवणे, दक्षता बाळगणे गरजेचे आहे. त्यासाठी दैनंदिन निरीक्षण, तसेच अगदी अलिकडच्या काळात पॉझिटिव्ह अहवाल आलेले रूग्ण नेमके कोणत्या भागातले आहेत, याकडे लक्ष देणे आवश्यक आहे.
11. प्रसार माध्यमांना साप्ताहिक संवाद कार्यक्रमातून जनतेबरोबर सामायिक केल्या जाणा-या सर्व परिस्थितीविषयी पुरावे, शास्त्रीय आधार असलेली माहिती नियमित प्रसारित करण्यावर पुन्हा भर देण्यात यावा.
कोविड-19 चा जो नवीन प्रकार उदयाला आला आहे, त्याला ‘महामारी अंतर्गतमहामारी’असे संबोधन देवून डॉ. व्ही.के पॉल म्हणाले, देशाने कोविड-19 चे ज्याप्रकारे व्यवस्थापन केले आहे, त्या ज्ञानाने देश आता समृद्ध झाला आहे. सर्वांनी कोविड योग्य वर्तनाचे पालन निरंतर करण्याचे महत्वही त्यांनी अधोरेखित केले. मोठ्या प्रमाणात एकत्रित जमणे, मेळावे घेणे टाळण्याबरोबरच लसीकरणाचा वेग वाढविण्याची गरज आहे. कोविड-19 विरोधात शक्तिशाली कवच म्हणजे लसीकरण आहे, त्यामुळेच ‘हर घर दस्तक’ योजनेतून लसीकरण मोहिमेत 100 टक्के पहिली मात्रा देण्याचे लक्ष्य साध्य केले पाहिजे. तसेच लसीकरणाचा अनुशेष पूर्ण करण्यासाठी दुसरी मात्रा देण्यावरही लक्ष दिले पाहिजे. यासाठी लसीकरण मोहिमेचा कालावधी 31 डिसेंबरपर्यंत वाढविण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. राज्यांनी लसीकरणाचा वेग आणि व्याप्तीही वाढवावी, असा सल्ला यावेळी देण्यात आला आहे.
ओमायक्रोनचा विषाणू आरटीपीसीआर आणि आरएटी या चाचण्यांमुळे पकडणे शक्य आहे. त्यामुळे कोणालाही विषाणूचा संसर्ग झाला आहे, हे जितक्या लवकर समजेल तितके चांगलेच आहे. त्यामुळे राज्यांनी चाचण्यांचे प्रमाण वाढवावे, असा सल्ला देण्यात आला आहे. राज्यांनी चाचण्यांच्या कामाचा एक भाग म्हणजे, जोखीम नसलेल्या देशांतल्या प्रवाशांच्याही चाचण्या करण्याचा सल्ला दिला आहे. लसीकरण वाढविणे तसेच कोविड योग्य वर्तन ठेवणे याबरोबर मोठ्या संख्येन एकत्र जमण्याचे टाळण्यावर भर देण्यात यावा, असेही बैठकीत सांगण्यात आले.