पुणे जिल्ह्यात ‘प्रोजेक्ट उद्यमिता’ घडविणार २०० उद्योजक.
पुणे : कौशल्य विकास, रोजगार आणि उद्योजकता आयुक्तालय, व लेट्स इंडोर्स यांच्या संयुक्त विद्यमाने जिल्ह्यात २०० उद्योजक घडविण्याकरिता ‘प्रोजेक्ट उद्यमिता’ प्रकल्प सुरू करण्यात आला आहे.
महाराष्ट्र शासनाच्या कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता आयुक्तालय, आणि लेट्स इंडोर्स संस्था यांच्या भागीदारीतून उद्यमिता हा प्रकल्प रायगड, नाशिक, पुणे, यवतमाळ, नांदेड आणि चंद्रपूर जिल्ह्यात राबविण्यात येत आहे. या माध्यमातून शेकडो अतिसूक्ष्म, सूक्ष्म, लघू उद्योजकांना उपजीविकेचे साधन उपलब्ध करुण देण्याचे लक्ष्य आहे.
पुणे जिल्ह्यात २०० उद्योजक
पुणे जिल्ह्यात२०० उद्योजक घडविणाराचा ‘प्रकल्प उद्यमिता’ हा अनोख्या शैलीमध्ये इच्छुक उद्योजकांना सर्वतोपरी सहकार्य करण्याच्या उद्देशाने उभी केलेली यंत्रणा आहे. यामध्ये स्थानिक पातळीवरील व्यवसाय, बचत गटांचे लघुउद्योग, गृहोद्योग, जोड-व्यवसाय आणि इतर उपजीविकेची साधने उभी करून उद्योजकांची उत्पादनवाढ करण्यासाठी नियोजन आणि प्रयत्न केले जाणार आहेत.
योजनांचा लाभ घेण्याकरिता विनामूल्य मार्गदर्शन
शासनाच्या प्रधानमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम तसेच मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम, पंतप्रधान मुद्रा योजना, अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळ, व अशा इतर सर्व आर्थिक मागास विकास महामंडळे यासारख्या राज्य व केंद्र शासनाच्या विविध योजनांचा लाभ घेण्याकरिता विनामूल्य मार्गदर्शन करण्यात येणार आहे.
उद्योजकांना प्रकल्प अहवाल देण्यासोबतच त्याचे प्राथमिक स्वरूपात मार्गदर्शनही करण्यात येणार आहे. व्यवसाय मार्गदर्शन करून बँकेकडून कर्ज उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्न केले जातील व त्यासाठी आवश्यक कागदपत्रांची पूर्तता करून त्याचा वेळोवेळी पाठपुरावा करण्यात येईल. चांगली बाजारपेठ उपलब्ध करून देण्यासाठीसुद्धा संस्था प्रयत्न व मार्गदर्शन करणार आहे. प्रोजेक्ट उद्यमिता या प्रकल्पाचे वैशिष्ट्य म्हणजे कोणत्याही अर्जदाराकडून कोणतेही शुल्क आकारले जाणार नाही म्हणजेच या सर्व सेवा मोफत दिल्या जातील.
प्रकल्पाचा लाभ घेण्यासाठी जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, पुणे, सर मुदलियार रोड, एमएसईबी मागे, रास्तापेठ, पुणे किंवा कार्यालयाचा दूरध्वनी ०२०-२६१३३६०६ किंवा लेट्स इंडोर्स या संस्थेचे जिल्हा कार्यक्रम अधिकारी कु.स्वप्नाली झटाळ यांना ८३२९०१७२५१ (टोल फ्री) क्रमांकावर संपर्क साधावा असे आवाहन जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राच्या सहाय्यक आयुक्त अनुपमा पवार त्यांनी केले आहे.