आकाशवाणीसाठी इलेक्ट्रिक वाहने – हरित आकाशवाणी.
केंद्राच्या हरित उपक्रमांच्या अनुषंगाने आणि इलेक्ट्रिक वाहतुकीच्या दृष्टीकोनातून, आकाशवाणीने सर्व वाहतूक गरजांसाठी आपल्या वाहनांचा संपूर्ण ताफा इलेक्ट्रिक वाहनांमध्ये परावर्तित केला आहे. प्रसार भारतीचे मुख्य कार्यकारी अधिकारी शशी शेखर वेमपती आणि आकाशवाणीचे महासंचालक एन वेणुधर रेड्डी यांनी आज नवी दिल्लीतील आकाशवाणी भवन येथे 26 इलेक्ट्रिक वाहनांच्या ताफ्याला हिरवा झेंडा दाखवला.
भारताची पर्यावरणीय उद्दिष्टे साध्य करण्याच्या दृष्टीने एक छोटे पण महत्त्वाचे योगदान म्हणून याकडे पाहिले जाऊ शकते, दिल्लीत तैनात होणारा हा इलेक्ट्रिक वाहनांचा दुसरा सर्वात मोठा ताफा आहे. इलेक्ट्रिक वाहनांमध्ये रूपांतरित करण्याचा हा महत्त्वाचा निर्णय आहे, असे प्रसार भारतीचे मुख्य कार्यकारी अधिकारी शशी शेखर वेमपती यांनी सांगितले. जिथे पर्यावरण देखील स्वच्छ आहे तो स्वच्छ भारत साकारणे हे पंतप्रधानांचे ध्येय आहे.
आकाशवाणी भवनातील या ई-वाहनांच्या अनुभवाच्या आधारे, आकाशवाणीच्या इतर केंद्रांसाठी इलेक्ट्रिक वाहने आणली जातील, अशी अपेक्षा आकाशवाणीचे महासंचालक एन वेणुधर रेड्डी यांनी व्यक्त केली आहे. आकाशवाणीने पुढील पाच वर्षांसाठी ई-वाहनांसाठी कन्व्हर्जन्स एनर्जी सर्व्हिसेस लिमिटेड (सीइएसएल) सोबत करार केला आहे, अशी माहिती त्यांनी दिली.
ऊर्जा मंत्रालयाच्या अंतर्गत सार्वजनिक क्षेत्रातील कंपन्यांचा संयुक्त उपक्रम असलेल्या सीइएसएलकडून आकाशवाणीने सर्व इलेक्ट्रिक वाहने भाडेतत्त्वावर घेतली आहेत. इलेक्ट्रिक वाहनांसाठी चार्जिंग नेटवर्क प्रसार भारतीच्या स्थापत्य बांधकाम विभागाने तयार केले आहे.