सार्स- कोविड-2 (SARS-CoV-2) विषाणूचा नवा प्रकार ओमायक्रॉन बद्दल वारंवार विचारले जाणारे प्रश्न आणि त्यांची उत्तरे.
कोविड-19 चा नव्या स्वरूपातील विषाणू- ज्याला जागतिक आरोग्य संघटनेने 26 नोव्हेंबर 2021 रोजी ओमायक्रॉन (B.1.1.529) म्हणून जाहीर केले आहे, या विषाणूविषयी वारंवार विचारल्या जाणाऱ्या प्रश्नांची उत्तरे केंद्रीय आरोग्य आणि कुटुंबकल्याण मंत्रालयाकडून जारी करण्यात आली आहेत.
ही वारंवार विचारली जाणारी प्रश्नावली आणि उत्तरे आरोग्य मंत्रालयाच्या संकेतस्थळावर उपलोड करण्यात आली आहेत.लिंक :
https://www.mohfw.gov.in/pdf/FAQsonOmicron.pdf
ओमायक्रॉन म्हणजे काय आणि हा कोविड विषाणूचा चिंताजनक प्रकार कशामुळे आहे?
ओमायक्रॉन या सार्स- कोव्ह-2 (SARS-CoV-2) चा नवा प्रकार असून, दक्षिण आफ्रिकेत 24 नोव्हेंबर 2021 रोजी त्याचे अस्तित्व पहिल्यांदा आढळले. या प्रकाराला, B.1.1.529 किंवा ओमायक्रॉन असे नाव आहे. ( ग्रीक मुळाक्षरे अल्फा, बिटा, डेल्टा इत्यादीप्रमाणे). या प्रकारच्या विषाणूचे म्युटेशन्स म्हणजेच, उत्परीवर्तन अत्यंत जलद गतीने होते असल्याचे आढळले आहे.विशेषतः कोरोना विषाणूच्या सभोवताल जे व्हायरल स्पाईक प्रोटीनचे काटेरी आवरण असते, त्यात या प्रकारच्या विषाणूमध्ये 30 पेक्षा अधिक उत्परीवर्तन झालेले आढळले आहे,आपल्या रोगप्रतिकरक शक्तिकडून विषाणू शरीरात आल्यावर त्याला प्रतिसाद देणारे हे महत्वाचे घटक असतात.
ओमायक्रॉन मध्ये होणाऱ्या या उत्परिवर्तनाचे एकूण संकलन बघता , जे याआधी, वाढत्या संसर्गाशी आणि/किंवा आपल्या रोगप्रतिकारक शक्तिला चकवा देऊ शकेल, असे वाटत असून दक्षिण आफ्रिकेत, कोविड रुग्णसंख्येत अचानक झालेली वाढ लक्षात घेऊन, जागतिक आरोग्य संघटनेने ओमायक्रॉन हा कोरोनाचा व्हेरीएन्ट ‘काळजीचे कारण’ (VoC) असल्याचे जाहीर केले आहे.
सध्या जी चाचणी करण्याची आणि निदानाची पद्धत आहे, ती ओमायक्रॉनचे निदान करण्यास सक्षम आहे का?
सध्या कोविडसाठी सर्वात जास्त मान्यताप्राप्त आणि सर्वाधिक वापरली जाणारी चाचणी पद्धत म्हणजे आरटी-पीसीआर हीच आहे. या पद्धतीत, विषाणूची काही विशिष्ट जनुके –असे की स्पाईक (S), एनव्हलोपड् (E) आणि न्यूक्लिओकॅपसिड (N) इत्यादी ओळखले जाऊ शकतात, ज्यातून विषाणूचे अस्तित्व असल्याचे सिद्ध होते. मात्र, ओमायक्रॉनच्या बाबतीत असे आढळले आहे की यात ‘एस’ या जनुकाचे उत्परिवर्तन अत्यंत वेगाने आणि अधिकवेळा होत असल्याचे आढळले आहे. त्यामुळे कदाचित काही प्राथमिक चाचण्यात, ‘एस’ जनुक नसल्याचे आढळू शकते. ( ज्याला शास्त्रीय भाषेत एस जीन ड्रॉप आऊट, असे म्हटले जाते). हे विशिष्ट ‘एस’ जनुक ड्रॉप आऊट होणे आणि इतर व्हायरल जनुके चाचणीत आढळणे, हे ओमायक्रॉनच्या निदानाचे एक लक्षण असू शकते. मात्र, ओमायक्रॉन व्हेरियंट असण्याची खात्री पटण्यासाठी, जिनोम सिक्वेनसिंग अर्थात जनुकीय क्रम निर्धारण चाचणीची आवश्यकता असते.
कोरोना विषाणूच्या या नव्या स्वरूपाबद्दल आपण किती काळजी घेण्याची गरज आहे?
कोविड विषाणूचा हा नवा प्रकार समोर आल्यानंतर, ज्यावेळी संक्रमणात वाढ झाली तसेच कोविड महामारीच्या प्रमाणात, धोकादायक बदल लक्षात येऊ लागले, त्यावेळी, सर्व बाबींचे मूल्यांकन करुन, हा विषाणू ‘काळजीचे कारण’ असल्याचे जाहीर केले आहे. किंवा विषाणूची तीव्रता वाढणे किंवा वैद्यकीय आजाराच्या स्वरुपात बदल, किंवा सार्वजनिक आरोग्याला धोका निर्माण होण्याची शक्यता, किंवा सध्या अस्तित्वात असलेल्या निदान पद्धती, लसी, उपचारात्मक पद्धती पुरेशा नसल्यास, जागतिक आरोग्य संघटना, अशा स्वरूपाच्या विषाणूला. ‘चिंताजनक’ म्हणून जाहीर करते. (स्त्रोत: WHO)
ओमायक्रॉनला ‘काळजीचे कारण/‘चिंताजनक’असलेला विषाणूचा प्रकार म्हणून जाहीर करण्यामागे, त्यात होणाऱ्या उत्परिवर्तनाचा अभ्यास, वाढत्या संक्रमणशक्तिविषययी व्यक्त करण्यात आलेला अंदाज, कोविड-19 महामारीचा धोका अधिक वाढण्याची चिन्हे, जसे की पुन्हा संक्रमणाचा धोका, असलेले काही प्राथमिक पुरावे या सगळ्यांच्या आधारावर, या स्वरूपाचा विषाणू, ‘काळजीचे कारण’ असू शकेल, असे आरोग्य संघटनेने म्हटले आहे. मात्र, ओमायक्रॉन चा धोका अधिक वाढू शकतो का, किंवा आपल्या रोगप्रतिकारशक्तिला तो चुकवू शकेल, याचा ठोस पुरावा अद्याप मिळालेला नाही.
आपण अशावेळी काय काळजी घ्यायला हवी?
आपण याआधी कोविडपासून बचाव करण्यासाठी जी काळजी घेत होतो, तीच काळजी आताही घ्यायला हवी. आपण सर्वांनी योग्यप्रकारे मास्क लावला पाहिजे, लसीच्या दोन्ही मात्रा घ्यायला हव्यात. शारीरिक अंतर राखायला हवे, तसेच सभोवतालच्या वातावरण हवा खेळती असायला हवी,
तिसरी लाट येण्याची शक्यता आहे का?
ओमायक्रॉन विषाणूचे रुग्ण दक्षिण आफ्रिकेबाहेरही वाढत असल्याचे, दिसून येत आहे.आणि त्याची वैशिष्ट्ये बघता, तो भारतासह आणखी काही देशात पसरण्याची शक्यता आहे. मात्र, रुग्णसंख्येत होणाऱ्या वाढीची संख्या आणि गांभीर्य तसेच या स्वरूपाच्या विषाणूचा संसर्ग कितपत गंभीर असू शकेल, हे मात्र अद्याप स्पष्ट नाही.
त्यापुढे, भारतात, ज्या झपाट्याने लसीकरण होत आहे ते बघता, तसेच डेल्टा व्हेरियंटच्या बाबतीत, भारतात करण्यात आलेल्या सिरो सर्वेक्षणात अनेकांमध्ये सामूहिक रोगप्रतिकारशक्ति विकसित झाल्याचे निदर्शनास आले आहे. या सगळ्या पार्श्वभूमीवर, येणाऱ्या आजाराची तीव्रता कमी राहील असा अंदाज आहे. मात्र, असे असले तरीही, याबाबतीत शास्त्रीय पुरावे अद्याप विकसित होत आहेत.
सध्या असलेल्या लसी, ओमायक्रॉला प्रतिबंध करण्यास सक्षम आहेत का?
सध्या असलेल्या लसी ओमायक्रॉन पुढे प्रभावी नाहीत, असे कुठलेही पुरावे अद्याप आढळलेले नाहीत. मात्र काही स्पाईकवरील उत्परिवर्तित स्वरुपाची जनुके, सध्याच्या लसींचा प्रभाव कमी करु शकतील असा अंदाजही व्यक्त केला जात आहे. मात्र, लसीमध्ये असलेले संरक्षक कवच, प्रतिजैविके आणि पेशींमधील रोगप्रतिकारक्षमता या दोन्हीसाठी आहे, त्यामुळे, ही लस संरक्षण करण्यास पुरेशी ठरेल, अशी अपेक्षा आहे. त्यामुळेच, गंभीर आजारापासून लस अद्याप संरक्षक कवच म्हणून उपयुक्त ठरेल, तसेच, उपलब्ध लसीचे लसीकरण करुन घेणे अत्यंत महत्वाचे आहे. त्यामुळे सर्व पात्र व्यक्तीनी लवकरात लवकर लसीकरण करुन घेणे आवश्यक आहे.
भारत याचा प्रतिकार कशाप्रकारे करत आहे?
भारत सरकार या परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवून आहे, आणि त्यानुसार वेळोवेळी आवश्यक त्या मार्गदर्शक सूचना दिल्या जात आहेत.
दरम्यान, वैज्ञानिक आणि वैद्यकीय क्षेत्राने या नव्या स्वरूपाच्या विषाणूचे निदान करण्यासाठी कंबर कसली असून, जनुकीय क्रमनिर्धारण, विषाणू आणि त्याच्या संसर्गाच्या स्वरूपाविषयी पुरावे गोळा करण्याचे काम, तसेच त्यानुसार उपचारपद्धतीत बदल करण्याचे काम वेगाने सुरु झाले आहे.
विषाणूचे असे नवनवे स्वरुप का विकसित होत जाते?
विषाणूचे उत्परिवर्तन ही एक सामान्य प्रक्रिया आहे, जोपर्यंत विषाणूची संसर्ग करण्याची, स्वरूप बदलण्याची आणि संक्रमणाची क्षमता कायम असते , तोपर्यंत हे उत्परिवर्तन देखील होत राहते. मात्र, प्रत्येक उत्परिवर्तित स्वरूप धोकादायक असेलच असे नाही, उलट अनेकदा ते तसे नसते,असेच आढळले आहे. जेव्हा ते अधिक संसर्गजन्य असतात, किंवा ते लोकांना पुनःपुन्हा संक्रमित करु शकतात, त्यावेळी त्यांना महत्त्व दिले जाते. विषाणूमधील उत्परिवर्तन टाळण्यासाठी सर्वात महत्वाचा उपाय म्हणजे, संसर्गाचे प्रमाण कमी करणे.