दिमाखदार सोहळ्यातून ९४ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे झाले शानदार उद्धाटन.
साहित्य संमेलनाला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शुभेच्छा दिल्या .
मी लेखक नाही मात्र वाचक जरूर आहे. लेखकाच्या स्वातंत्र्यावर कुणी निर्बंध लादणार असेल तर त्याचा पहिला विरोध करणारा मी असेल – स्वागताध्यक्ष छगन भुजबळ.
नाशिक : मी लेखक नाही मात्र वाचक जरूर आहे. लेखकाला लेखन स्वातंत्र्य असलेच पाहिजे या मताचा मी आहे. त्याच्यावर कुणी निर्बंध लादणार असेल तर त्याला पहिला विरोध करणारा मी असेन. लोकहितवादी मंडळ आयोजित अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाचे 94 वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन कुसुमाग्रज नगरी मेट भुजबळ नॉलेज सिटी नाशिक येथे उद्घाटन कार्यक्रम पार पडला. त्यावेळी ते बोलत होते.
यावेळी मराठी भाषा विभागाचे मंत्री सुभाष देसाई, कृषी मंत्री दादाजी भुसे, प्रमुख पाहुणे जावेद अख्तर, अखिल भारतीय मराठी साहित्य मंडळाचे अध्यक्ष कौतिकराव ठाले पाटील,उदघाटक विश्वास पाटील, डॉ.दादा गोऱ्हे,रामचंद्र साळुंखे, खासदार श्रीनिवास पाटील, शुभांगीणी राजे गायकवाड, ज्येष्ठ साहित्यिक नागनाथ कोत्तापल्ले, सदानंद मोरे, उत्तम कांबळे, लक्ष्मीकांत देशमुख, श्रीपाल सबनीस, हेमंत टकले, समीर भुजबळ, पंकज भुजबळ, जयप्रकाश जातेगावकर, विश्वास ठाकूर, प्रा.डॉ.शंकर बोऱ्हाडे, सुभाष पाटील, मिलिंद कुलकर्णी,प्राचार्य प्रशांत पाटील, संजय करंजकर, दिलीप साळवेकर, स्वानंद बेदरकर यांच्यासह पदाधिकारी व मान्यवर उपस्थित होते.
साहित्य संमेलनाची सांस्कृतिक-साहित्यिक पर्वणी मनाला उभारी देणारी – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे
अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन म्हणजे आपल्या सगळ्यांचाच जिव्हाळ्याचा विषय. यंदाचे हे ९४ वे संमेलन नाशिकच्या पवित्र भूमीत आणि कविश्रेष्ठ कुसुमाग्रज यांच्या नगरीत साहित्य संमेलन होत आहे, याचा विशेष आनंद आहे.
जगावर आलेले कोरोना महामारीचे संकट परतवून लावत असताना आता आपल्याला आपलं जगणं पुन्हा नव्या दमाने, जोमाने पूर्वपदावर आणायचे आहे. त्यासाठी साहित्य संमेलनाची ही सांस्कृतिक-साहित्यिक पर्वणी महत्त्वाची आणि मनाला उभारी देणारी ठरेल, असे मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी साहित्य संमेलनानिमित्त दिलेल्या शुभेच्छा संदेशात म्हटले आहे.
उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीही दिल्या साहित्य संमेलनाला शुभेच्छा
‘अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळा’चे 94 वे ‘अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन’ नाशिक येथे ज्येष्ठ खगोलशास्त्रज्ञ, विज्ञानकथा लेखक आदरणीय डॉ.जयंत नारळीकर साहेबांच्या अध्यक्षतेखाली होत असल्याचे समजून आनंद झाला. नाशिकच्या ‘लोकहितवादी मंडळा’च्या सहकार्यातून, जिल्ह्याचे पालकमंत्री, संमेलनाचे स्वागताध्यक्ष सन्माननीय श्री.छगन भुजबळ साहेबांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित 94 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनास उपस्थित सर्व सन्माननीय साहित्यिक, साहित्यरसिक बंधू-भगिनींचे सर्वप्रथम मी मन:पूर्वक स्वागत करतो.
आडगावच्या भुजबळ ज्ञाननगर आवारात उभारलेल्या कवीवर्य कुसुमाग्रजनगरीत 3 ते 5 डिसेंबर 2021 पर्यंत चालणाऱ्या या संमेलनाच्या आयोजनात सहभागी सामाजिक, शैक्षणिक, वाचन व ग्रंथ चळवळीतील संस्थांचे पदाधिकारी, कार्यकर्ते बंधू-भगिनींचे अभिनंदन करतो. आभार मानतो. संमेलन यशस्वितेसाठी शुभेच्छा देतो.