ब्रँड इंडियाला प्रोत्साहन देण्यासाठी 20 दूतावासांमध्ये पर्यटन अधिकाऱ्यांची नियुक्ती: केंद्रीय मंत्री जी किशन रेड्डी.
भारतातील आघाडीची 75 स्थळे आंतरराष्ट्रीय मानकांनुसार विकसित केली जाणार : पर्यटन मंत्री
“पर्यटन क्षेत्राला अधिक गतीने पुनरुज्जीवित करण्यासाठी पात्र व्यक्तींचे दोन्ही मात्रांचे लसीकरण पूर्ण करा”: केंद्रीय मंत्र्यांचे आवाहन
“गेल्या महिन्यात विविध देशांच्या 20 दूतावासांमध्ये पर्यटक अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे.” केंद्रीय पर्यटन, संस्कृती आणि विकास मंत्री जी किशन रेड्डी यांनी आज गोव्यात पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. ”भारताला एक पर्यटनस्थळ म्हणून उदयाला आणण्यासाठी तसेच ज्या देशातून भारतात सर्वाधिक पर्यटक येतात त्या देशातील पर्यटकांना अधिक सुविधा देण्यासाठी हे पाऊल उचलण्यात आले आहे.
ज्या देशातून पर्यटक भारतात येतात त्या सर्व देशांच्या दूतावासांमध्ये पर्यटन उपविभाग कार्यालये उघडण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. भारतात येणाऱ्या परदेशी पर्यटकांना मदत करण्यासाठी पर्यटन मंत्रालय हे आरोग्य विभाग, नागरी विमान वाहतूक विभाग, गृह आणि परराष्ट्र व्यवहार विभाग यांच्याशी समन्वय साधून काम करत आहे.”
गोव्यातील पर्यटन उपक्रम
“गोवा आपल्या मुक्तीची 60 वर्षे साजरी करत असताना, सरकार राज्यातील पर्यटन पायाभूत सुविधा विकसित करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करत आहे. बहुतांश जागतिक वारसा स्थळे असलेल्या पर्यटन क्षेत्रातील प्रमुख राज्यांपैकी गोवा हे एक आहे.
त्यामुळे पर्यटनाला चालना देण्यासाठी मंत्रालयाने गोव्याकडे विशेष लक्ष देण्याचे ठरवले आहे.” असे रेड्डी यांनी सांगितले. जास्तीत जास्त पर्यटक मग ते देशांतर्गत असोत किंवा आंतरराष्ट्रीय पर्यटक गोव्याला वारंवार भेट देतात. पर्यटनाचा एक क्षेत्र म्हणून राज्यावर कसा मोठा प्रभाव आहे, ते त्यांनी सांगितले.
सागरमाला प्रकल्पाअंतर्गत क्रूझ पर्यटनाला प्रोत्साहन देण्यासाठी पर्यटन मंत्रालय हे रेल्वे मंत्रालय, नागरी विमान वाहतूक आणि जहाजबांधणी मंत्रालयाच्या सहकार्याने काम करत असल्याचे रेड्डी यांनी सांगितले. ते म्हणाले, “क्रूझ पर्यटन अभियान स्तरावर विकसित केले जाईल ज्याचा गोव्याला खूप फायदा होईल.” क्रुझ पर्यटनाच्या माध्यमातून चेन्नई, विशाखापट्टणम आणि अंदमानला गोव्याशी जोडण्याची योजना असल्याची माहितीही त्यांनी दिली.
साहसी पर्यटन आणि पर्यावरण पर्यटनात असलेला वाव आणि दिल्या जाणाऱ्या प्रोत्साहनाविषयीही त्यांनी माहिती दिली.