१९७१ च्या युद्धातील शूरवीरांच्या सन्मानार्थ ‘आझादी की विजय शृंखला’ आणि ‘संस्कृतियों का महासंगम’ या कार्यक्रमांचा एनसीसीकडून प्रारंभ.
स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवाचा एक भाग म्हणून एनसीसी अर्थात राष्ट्रीय छात्र सेनेने ‘आझादी की विजय शृंखला’ आणि ‘संस्कृती का महासंगम’ हे कार्यक्रम आयोजित केले आहेत. या कार्यक्रमातील पहिला उपक्रम म्हणजेच ‘आझादी की विजय शृंखला’ 28 नोव्हेंबर ते 10 डिसेंबर 2021 या कालावधीत होत असून यात देशभरातल्या 75 ठिकाणी 1971 च्या युद्धातील शूरवीरांना सन्मानित करण्यात येत आहे. या 75 पैकी पाच स्थाने शौर्य पुरस्कार पोर्टलवर (https://www.gallantryawards.gov.in/) थेट वेबकास्टसाठी निश्चित करण्यात आली आहेत.
दुसरा भाग म्हणजे, ‘संस्कृतियों का महासंगम’, हे एक विशेष राष्ट्रीय एकात्मता शिबिर दिल्ली येथे आयोजित केले जाईल. सांस्कृतिक आदानप्रदानाच्या या शिबिरात देशभरातील छात्र सहभागी होतील. समारोप राष्ट्रीय राजधानीतील एनसीसी कॅम्प ऑडिटोरियममध्ये होईल. समारोप कार्यक्रमात सीमा क्षेत्रातील आणि किनारी भागातील छात्र आपापल्या राज्यांमधील सुंदर स्थानिक नृत्य सादर करतील. कार्यक्रमात 22 भाषांमध्ये एकीकरण गीत गायले जाईल.
1971 च्या युद्धातील शूरवीरांच्या कुटुंबीयांचा 75 ठिकाणी सत्कार करणे आणि संपूर्ण राष्ट्राला तो दाखवणे हा या महोत्सवाचा उद्देश आहे. हा कार्यक्रम भारतातील सांस्कृतिक विविधतेचे दर्शन घडवेल आणि विशेषत: सीमावर्ती आणि किनारी भागातील विविधता दर्शवेल. या ठिकाणी अलीकडेच एनसीसीची ‘विविधतेतील एकता’ अधिक वृद्धिंगत करण्यासाठी सुरुवात झाली आहे.