एका परम वीराने दुसऱ्या परम वीरला वाहिली श्रद्धांजली.
सेवारत परमवीर चक्र (पीव्हीसी) पुरस्कारप्राप्त सुभेदार मेजर (मानद कॅप्टन) योगेंद्र सिंह यादव यांच्यासह श्रीमती होशियार सिंग आणि लेफ्टनंट जनरल राजीव सिरोही, लष्करी सचिव आणि ग्रेनेडियर्सचे कर्नल यांनी संयुक्तपणे परमवीर चक्र कर्नल होशियार सिंग, यांच्या 23 व्या पुण्यतिथीनिमित्त जयपूर येथे शहीद स्मारक स्मारकावर ‘पुष्पहार’ अर्पण केला, तो खरोखरच एक ऐतिहासिक आणि धीरगंभीर क्षण होता.
महान योद्धे आणि सर्वोच्च शौर्य पुरस्कार विजेते कर्नल होशियार सिंग, पीव्हीसी हे 1971 च्या युद्धात कंपनी कमांडर होते, शत्रूच्या सततच्या हल्ल्या प्रतिहल्ल्यात, गोळीबारात, शकरगढ सेक्टरमधील बसंतर नदीच्या पलीकडचे जारपाल नावाचे पाकिस्तानी लष्कराचे ठाणे काबीज करण्यासाठी त्यांनी आपल्या शूर सैनिकांचे नेतृत्व केले. गंभीर जखमी असूनही, मेजर होशियार सिंग यांनी युद्धविराम घोषित होईपर्यंत ठाणे सोडण्यास नकार दिला.
या तुंबळ लढाईत, मेजर होशियार सिंग यांनी वैयक्तिक शौर्य दाखवले, मोठ्या संकटांना तोंड देत आपल्या वैयक्तिक सुरक्षेला पूर्ण गौण लेखत आणि भारतीय सैन्याच्या सर्वोच्च परंपरांचे पालन केले, ज्यासाठी त्यांना सर्वोच्च शौर्य पुरस्कार “परमवीर चक्र” देण्यात आला.
ग्रेनेडियर्स रेजिमेंटच्या इतर सेवारत लष्करी अधिकारी आणि दिग्गजांनीही या सोहळ्याला उपस्थिती लावली. 1971 च्या युद्धातील महान नायकाला आदरांजली वाहण्यासाठी, चेन्नई, महू, जबलपूर, पालमपूर आणि मुंबई येथेही ग्रेनेडियर रेजिमेंटच्या सर्व सेवारत जनरल अधिकाऱ्यांनी पुष्पहार अर्पण केला.